मिशन पॅकअप पवार !

By सचिन जवळकोटे | Published: April 14, 2019 06:19 AM2019-04-14T06:19:30+5:302019-04-14T06:21:06+5:30

लाडक्या लेकीच्या मतदारसंघातून बारामतीकरांना बाहेर पडू न देण्याची व्यूहरचना

Mission packing Pawar! | मिशन पॅकअप पवार !

मिशन पॅकअप पवार !

Next

- सचिन जवळकोटे


‘थोरले काका बारामतीकर’ यांना त्यांच्या लाडक्या लेकीच्या मतदारसंघातच अडकवून इतर ठिकाणच्या साम्राज्याचे बुरूज उद्ध्वस्त करण्यासाठी ‘देवेंद्रपंतां’नी आखलीय एक जबरदस्त मोहीम.. याचाच एक भाग म्हणून ‘अकलूजकरां’च्या खांद्यावर बंदूक ठेवून ‘बारामतीकरां’चा निशाणा साधण्यासाठी पुढं सरसावलेत ‘कोल्हापूरचे ‘चंदूदादा’.. माढा, बारामती अन् शिरूरमध्ये बिनधास्तपणे डरकाळी फोडत निघालेला ‘अकलूजचा मोठा सिंह’ आता कोणत्याही क्षणी घुसू शकतो म्हणे ‘मावळ’च्याही जंगलात...कारण मुंबईतल्या ‘पंतां’च्या या खास मोहिमेचं नावच ठेवलं गेलंय ‘मिशन पॅकअप पवार’...

शत्रूचा जीव कशात.. ओळखा !

लहानपणी एक गोष्ट सांगितली जायची. समोरच्या महाकाय अन् बलाढ्य शत्रूला नामोहरम करण्यासाठी केवळ शक्तीचा नव्हे, तर युक्तीचा वापर करावा. त्या शत्रूचा जीव ज्याच्यात अडकलाय, त्याला त्रास दिला की बस्स... काम म्हणे फत्ते. हेच ओळखलंय ‘वर्षा’वरच्या ‘देवेंद्रपंतां’नी. म्हणूनच त्यांच्या ‘टीम’नं पूर्णपणे लक्ष केंद्रीत केलंय बारामतीवर. कधी ‘रणजितदादा’ इंदापूरच्या पाटलांना भेटून येतात, तर कधी ‘कूल’ पुरुष अकलूजमध्ये ‘विजयदादां’शी चर्चा करतात.

...मात्र तरीही ‘थोरले काका’ लऽऽय जिगरबाज. चारही बाजूनं गनिमाकडून वेढलं गेल्यानंतरही ते थेट सांगोल्यात येतात. इथल्या गावागावात ‘विजयदादां’नी लावलेल्या ‘फिल्डिंग’ला खिळखिळं करण्याचा डाव अत्यंत चाणाक्षपणे मांडतात. ‘संजयमामां’ना ताकद (अन् धीरही !) देण्याचा प्रयत्न करतात; कारण माढ्यात त्यांनी ज्या पद्धतीनं शेवटच्या क्षणी ‘मामां’सारख्या नव्या गड्याला मैदानावर उतरविलं, अगदी तस्साऽऽच प्रयोग दोन वर्षांपूर्वी सातारा-सांगली विधान परिषदेलाही केला होता. माणदेशातल्या ‘जयाभाव’च्या बंधूला म्हणजे ‘शेखरभाऊ’ला तिथं उभं केलं होतं. मात्र मतदारसंघात बहुमत असूनही ‘भाऊं’ची जशी धोबीपछाड झाली होती; तोच कित्ता माढ्यात गिरविला जाऊ नये म्हणून ‘थोरले काका’ डोळ्यात तेल घालून सावध. सोलापूर विधानपरिषदेलाही ‘दीपकआबां’च्या पाठीत जो वार झालेला, त्याचा सूड घेण्याचा प्रयत्न सांगोल्यात केला जाऊ नये, यासाठी ते जागरूक...कारण ‘दीपकआबां’च्या मनात काय, हे फक्त त्यांनाच ठावूक. लगाव बत्ती...

इकडच्या ‘दादां’च्या इलाक्यात तिकडच्या ‘दादां’ची सभा

‘विजयदादा’ अन् ‘अजितदादा’ एकाच पार्टीत असेपर्यंत भांड्याला भांडं लागलं तरीही आवाज ऐकू येत नव्हता. मात्र ‘अकलूजकर’ बाहेर पडताच ‘बारामतीकरांना’ही चेव आला. ‘अजितदादां’ची माळशिरसमध्ये तुफान सभा झाली. प्रचंड गर्दी जमविली गेली. जोरदार बॅटिंग केली गेली. आपल्या समोरचा विरोधी उमेदवार जणू ‘अकलूजकर’च आहेत, या आवेशात ‘अजितदादां’नी उकाळ्या-पाकळ्या काढल्या. समोरून जोरदार टाळ्याही मिळाल्या. सभा संपली. माणसं भरभरून शेकडो गाड्या पुन्हा आपापल्या गावी निघाल्या; तेव्हा हे सारं तटस्थपणे पाहणाºया दोन चाणाक्ष माळशिरसकरांमध्ये मात्र तिरकस कुजबुज झाली, ‘लगाऽऽ माढ्याकडचीच माणसं इथं आणायची हुती तर सभाच तिकडं निमगावात घ्यायची हुती कीऽऽ उगाच का पायी डिझेल-पेट्रोलवरती येवढा पैसा का उधळत्याती ?’ आता बोला...लगाव बत्ती...

‘थोरले दादा अकलूजकर’ अत्यंत संयमी अन् सहनशील, अशी त्यांची आजपर्यंत प्रतिमा; मात्र ‘रणजितदादां’नी हातात ‘कमळ’ धरल्यापासून त्यांचं नवं रूप जगाला पहायला मिळतंय. भलेही ते अद्याप ‘कमळ’वाल्यांच्या पार्टीत गेले नसले तरी माढ्याची सारी सूत्रं आता त्यांच्याच ताब्यात. गेल्यावेळी स्वत:साठीही फिरले नसतील एवढ्या स्पीडनं पळताहेत त्यांच्या गाड्या. या जिल्ह्यातून ‘घड्याळ्याचा एकेक काटा’ उखडून टाकण्याची त्यांची तीव्र ईर्षा होतेय स्पष्टपणे उघड. अकलूजच्या ‘मोहित्यां’ची ही नवी आक्रमकता पाहताना लोकांना आठवतेय गावातल्या पाटलिणीची जुनी गोष्ट. आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या जगानं बघाव्यात म्हणून आपल्याच घराला आग लावणाºया पाटलिणीची ती लोकप्रिय कथा... आलं का लक्षात... नसेल तर जाऊ द्या... कामाला लागा.. लगाव बत्ती...

जाता-जाता :
महाराज म्हणे ‘बी प्रॅक्टिकल’ 

‘शहर उत्तर’ची विधानसभा स्वत: जिंकणं अन् ‘नम्म आप्पावरू’साठी लोकसभेची खिंड लढविणं, यात जमीन-अस्मानचा फरक असतो याची जाणीव झालीय ‘विजूमालकां’ना. म्हणूनच तेही आता गावा-गावात पळू लागलेत. गल्ली-बोळ पिंजून काढायला लागलेत. आपल्यासाठी एवढं सारं करणाºया ‘नम्म मनशा’ची ही धडपड पाहून ‘महाराजां’नाही भरून आलंय. त्यांनी आता यापुढे भाषणात एकही शब्द इकडचा तिकडं होऊ न देण्याची म्हणे शपथ घेतलीय. होय...अगदी देवाशप्पथ ! इतके दिवस ‘हेळरीऽऽ मला लीड कितीचा देणार ?’ या जोशात ‘अक्कलकोट-दक्षिण’मध्ये प्रश्न विचारणारे ‘महाराज’ आता ‘बी प्रॅक्टिकल’ झालेत. ‘माझ्यासाठी काय करणार ?’ असा सवाल ‘मोहोळ अन् पंढरपूर’च्या लोकांना करू लागलेत. यालाच म्हणतात लोकशाही. लगाव बत्ती...

- सचिन जवळकोटे

(लेखक 'सोलापूर लोकमत'चे निवासी संपादक आहेत.)

Web Title: Mission packing Pawar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.