फिरकीत अडकले यजमान, चहलचे ५ तर यादवचे ३ बळी; द. आफ्रिकेचा ११८ धावांत खुर्दा

लेगस्पिनर यझुवेंद्र चहलने आपल्या कारकिर्दीतील केलेली सर्वोत्तम कामगिरी आणि त्याला मिळालेली कुलदीप यादवची महत्त्वाची साथ या जोरावर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सलग दुस-या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवत सहा सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:12 AM2018-02-05T01:12:48+5:302018-02-05T01:13:05+5:30

whatsapp join usJoin us
Twenty-five-wicketkeeper, Chawla's 5 and Yadav's 3 wickets; D. South Africa's 118 runs | फिरकीत अडकले यजमान, चहलचे ५ तर यादवचे ३ बळी; द. आफ्रिकेचा ११८ धावांत खुर्दा

फिरकीत अडकले यजमान, चहलचे ५ तर यादवचे ३ बळी; द. आफ्रिकेचा ११८ धावांत खुर्दा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

सेंच्युरियन : लेगस्पिनर यझुवेंद्र चहलने आपल्या कारकिर्दीतील केलेली सर्वोत्तम कामगिरी आणि त्याला मिळालेली कुलदीप यादवची महत्त्वाची साथ या जोरावर भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा सलग दुस-या एकदिवसीय सामन्यात धुव्वा उडवत सहा सामन्यांच्या मालिकेत २-० अशी आघाडी घेतली. चहलच्या भेदक फिरकीपुढे यजमानांचा डाव ३२.२ षटकांत अवघ्या ११८ धावांत संपुष्टात आल्यानंतर भारताने आवश्यक धावांचे लक्ष्य २०.३ षटकांमध्ये केवळ एका फलंदाजाच्या मोबदल्यात पार करत दणदणीत विजय मिळवला.
सुपरस्पोर्ट पार्कवर झालेल्या या सामन्यात भारताने ‘सुपर’ कामगिरी केली. भारताने १७७ चेंडू राखून बाजी मारली असून, विदेशामध्ये सर्वाधिक चेंडू राखून मिळवलेला हा टीम इंडियाचा सर्वांत मोठा विजय ठरला. याचप्रमाणे दक्षिण आफ्रिकेचा आपल्याच मैदानावरील हा सर्वांत मोठा पराभवही ठरला. डर्बन येथे झालेल्या पहिल्या सामन्यातही फिरकी गोलंदाजांची कामगिरी निर्णायक ठरली होती. तोच कित्ता फिरकी गोलंदाजांनी या सामन्यातही गिरवला.
नाणेफेक जिंकून कर्णधार विराट कोहलीने यजमानांना प्रथम फलंदाजीस निमंत्रित केल्यानंतर सर्वप्रथम वेगवान गोलंदाजांनी नियंत्रित मारा करून फलंदाजांना जखडवून ठेवले. यानंतर चहल- कुलदीप यांनी आपला जलवा दाखवताना फलंदाजांना आपल्या तालावर नाचवले. या दोघांनी मिळून १४.२ षटके गोलंदाजी करत केवळ ४२ धावांच्या मोबदल्यात ८ बळी घेत दक्षिण आफ्रिकेची दाणादाण उडवली. चहलने यजमानांच्या फलंदाजीला खिंडार पाडताना २२ धावांत ५ गडी बाद केले. कुलदीपनेही त्याला चांगली साथ देताना २० धावांत ३ गडी बाद केले.
एडेन मार्करमच्या कर्णधारपदाच्या पहिल्याच सामन्यात संघाची दारुण अवस्था झाली. ९९ धावांत अर्धा संघ बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाज केवळ १९ धावांत तंबूत परतले. हाशिम आमला (२३), क्विंटन डीकॉक (२०), जेपी ड्युमिनी (२५), खायेलिहले झोंडो (२५) आणि ख्रिस मॉरिस (१४) केवळ यांनाच दुहेरी धावसंख्या गाठता आली.
माफक धावसंख्येचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सहजपणे विजय मिळवला. आक्रमक सलामीवीर रोहित शर्मा (१५) झटपट बाद झाल्यानंतर शिखर धवन आणि ‘रनमशिन’ विराट कोहली यांनी नाबाद ९३ धावांची विजयी भागीदारी करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केले. दरम्यान, भारताला विजयासाठी केवळ दोन धावांची आवश्यकता असताना आयसीसीच्या नियमावलीनुसार पंचांना विश्रांतीसाठी खेळ थांबविण्यास भाग पाडले. आफ्रिकेचा पहिला डाव ३२.२ षटकांत संपुष्टात आल्यानंतर लगेच भारताच्या डावास सुरुवात झाली होती. धवनने ५६ चेंडूत ९ चौकारांसह नाबाद ५१ धावा फटकावल्या. कोहलीने त्याला चांगली साथ देताना ५० चेंडूंत ४ चौकार व
एका षटकारासह नाबाद ४६ धावांची खेळी केली. (वृत्तसंस्था)
>महत्त्वाचे...
दक्षिण आफ्रिकेने घरच्या मैदानावर नोंदवली सर्वांत नीचांकी धावसंख्या.
चेंडूंच्या बाबतीत भारताने विदेशामध्ये नोंदवला सर्वांत मोठा विजय. तसेच द. आफ्रिकेचा घरच्या मैदानावरील सर्वांत मोठा पराभव.
याआधी द. आफ्रिकेने घरच्या मैदानावरील २००९ साली इंग्लंडविरुद्ध ११९ धावांचा नीचांक उभारला होता.
दक्षिण आफ्रिकेत चहल
सर्वोत्तम कामगिरी करणारा भारतीय फिरकी गोलंदाज ठरला. याआधी युवराज सिंगने २००३ साली पीटरमॉरित्सबर्ग येथे ६ धावांत ४ बळी घेतले होते.
दक्षिण आफ्रिकेच्या मैदानावर अर्धा संघ बाद करणारा चहल केवळ दुसरा भारतीय गोलंदाज ठरला. याआधी २००३च्या विश्वचषक स्पर्धेत आशिष नेहराने इंग्लंडविरुद्ध २३ धावांत ६ बळी घेतले होते.
>मी चेंडू फ्लाइट करून बळी मिळवण्यावर लक्ष केंद्रित करतो. मला कल्पना आहे की, अशा चेंडूवर षटकारही लागू शकतो; पण जेव्हा कर्णधार आणि संघ व्यवस्थापक आपल्या सोबत असतात, तेव्हा आत्मविश्वास मिळतो. ड्युमिनीचा बळी माझ्यासाठी महत्त्वाचा ठरला. कारण, तो डावखुरा आहे आणि मी त्याच्यासह खेळलो असून, अखेरच्या षटकांमध्ये त्याने चित्र पालटले असते. - युझवेंद्र चहल
>नक्कीच हा आमच्यासाठी डोळे उघडणारा पराभव होता, मात्र कदाचित यामुळे संघ आपला सर्वोत्तम खेळ करेल आणि आम्ही आव्हान उभे करू शकू. आता या परिस्थितीतून खेळाडू कसे पुढे वाटचाल करतील हे पाहावे लागेल. प्रत्येक खेळाडू पुढे वाटचाल करण्यास सज्ज आहे.
एडेन मार्करम, कर्णधार
>कठीण गोष्ट अशी आहे की, फलंदाजांना दोन फिरकी गोलंदाजांचा सामना करावा लागत आहे व बहुतांश खेळाडूंनी अशा आक्रमणाचा सामना केलेला नाही. भारताच्या गोलंदाजीतील विविधतेला समजण्यासाठी थोडा वेळ लागेल. जाहीर आहे की, त्यांचे फिरकी गोलंदाज खूप चांगले आहेत. - डेल बेंकनस्टीन, फलंदाजी प्रशिक्षक
>धावफलक :
दक्षिण आफ्रिका : हाशिम आमला झे. धोनी गो. भुवनेश्वर २३, क्विंटन डीकॉक झे. हार्दिक गो. चहल २०, एडेन मार्करम झे. भुवनेश्वर गो. कुलदीप ८, जेपी ड्युमिनी पायचीत गो. चहल २५, डेव्हिड मिलर झे. रहाणे गो. कुलदीप ०, खायेलिहले झोंडो झे. हार्दिक गो. चहल २५, ख्रिस मॉरिस झे. भुवनेश्वर गो. चहल १४, कागिसो रबाडा पायचित गो. कुलदीप १, मॉर्नी मॉर्केल पायचित गो. चहल १, इम्रान ताहिर त्रि. गो. बुमराह ०, तबरेझ शाम्सी नाबाद ०. अवांतर - १. एकूण : ३२.२ षटकांत सर्व बाद ११८ धावा. गोलंदाजी : भुवनेश्वर कुमार ५-१-१९-१; जसप्रीत बुमराह ५-१-१२-१; हार्दिक पंड्या ५-०-३४-०; यझुवेंद्र चहल ८.२-१-२२-५; कुलदीप यादव ६-०-२०-३; केदार जाधव ३-०-११-०.
भारत : रोहित शर्मा झे. मॉर्केल गो. रबाडा १५, शिखर धवन नाबाद ५१, विराट कोहली नाबाद ४६. अवांतर - ७. एकूण : २०.३ षटकांत १ बाद ११९ धावा. गोलंदाजी : मॉर्नी मॉर्केल ४-०-३०-०; कागिसो रबाडा ५-०-२४-१; ख्रिस मॉरिस ३-०-१६-०; इम्रान ताहिर ५.३-०-३०-०; तबरेझ शाम्सी ३-१-१८-०.

Web Title: Twenty-five-wicketkeeper, Chawla's 5 and Yadav's 3 wickets; D. South Africa's 118 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.