दोन्ही कर्णधारांचे संघ अपयशी ठरले

सर्वांची अपेक्षा होती की, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स प्ले आॅफमध्ये कूच करतील, पण तसे झाले नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 12:21 AM2018-05-22T00:21:41+5:302018-05-22T00:21:41+5:30

whatsapp join usJoin us
The team of both the captains failed | दोन्ही कर्णधारांचे संघ अपयशी ठरले

दोन्ही कर्णधारांचे संघ अपयशी ठरले

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाझ मेमन


अखेर प्ले आॅफमधील चारही संघ निश्चित झाले आहेत. सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांनी खूप आधीच आपली जागा निश्चित केली होती, पण बाकीचे दोन संघ म्हणजे कोलकाता नाइट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनी नुकतेच आपले स्थान निश्चित केले. राजस्थानने सर्वांचे अंदाज चुकीचे ठरविताना आगेकूच केली. त्यांनी निर्णायक सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बँगलोरला मोठ्या फरकाने नमविले. त्याचबरोबर मुंबई इंडियन्सचा अखेरच्या सामन्यातील दिल्ली डेअर डेव्हिल्सविरुद्धचा पराभवही राजस्थानच्या पथ्यावर पडला. सर्वांची अपेक्षा होती की, आरसीबी आणि मुंबई इंडियन्स प्ले आॅफमध्ये कूच करतील, पण तसे झाले नाही. यामागच्या कारणांचा विचार करावा लागेल.

मुंबईच्या बाबतीत म्हणायचे झाल्यास त्यांच्या प्रवासात खूप चढ-उतार पाहावयास मिळाले. एप्रिल महिन्यात त्यांनी खूप सामने गमावले होते, तर मे महिन्यात त्यांनी कामगिरीत सुधारणा केली. गेल्या २-३ वर्षांतही मुंबईची सुरुवात अडखळती झाल्याचे आपण पाहिले आहे आणि त्यानंतर ते पकड मिळवतात. या वेळी मात्र असे झाले नाही आणि याचे कारण म्हणजे कर्णधार आणि मुख्य खेळाडू रोहित शर्माचा फॉर्म यंदा निराशाजनक ठरला. दिल्लीविरुद्धच्या अखेरच्या सामन्यात त्याने पोलार्डला वरच्या स्थानावर पाठविण्याऐवजी स्वत: वरच्या स्थानी फलंदाजीस का नाही आला, याचे आश्चर्य वाटले. पोलार्ड फिरकी चांगल्याप्रकारे खेळत नसल्याचे माहीत असूनही त्याला दिलेली बढती खटकणारी होती. बेन कटिंग, एविन लेविस आणि हार्दिक पांड्या यांची खेळी वगळली, तर मुंबईकडून खास फलंदाजी झाली नाही. एकूण पाहिले तर, जसप्रीत बुमराह, पांड्या बंधू, लेविस आणि सूर्यकुमार यादव यांनी शानदार कामगिरी केली. माझ्या मते अशा संघाला प्ले आॅफमध्ये यायलाच पाहिजे होते, पण रणनीतीमध्ये कुठेतरी हा संघ मागे पडला.
दुसरीकडे कोहली, एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डिकॉक, ब्रेंडन मॅक्क्युलम, टिम साऊदी असे दिग्गज खेळाडू असताना आरसीबी संघ पुढे का जाऊ शकला नाही, असा प्रश्न पडतो. मुख्य कारण म्हणजे हा संघ मोठ्या प्रमाणात कोहली व डिव्हिलियर्स यांच्यावर अवलंबून असल्याचे गेल्या २-३ सत्रांपासून पाहण्यास मिळत आहे. ज्या वेळी हे दोन्ही खेळाडू फॉर्ममध्ये असतात तेव्हा हा संघ बहरात असतो. यंदा त्यांची गोलंदाजी कमजोर होती. तसेच कोहलीसाठी हे सर्वोत्तम सत्र नक्कीच नव्हते.
त्याचवेळी यंदाच्या लिलाव प्रक्रीयेमध्ये आरसीबीने लोकेश राहुलला सोडले आणि हे त्यांना खूप महागात पडले. कारण ज्याप्रकारे राहुल पंजाबकडून खेळला ते लक्षवेधी ठरले. गोलंदाजीत युझवेंद्र चहल, उमेश यादव चमकले. एकूणच संघाची कामगिरी ठीकठाक राहिली. विशेष म्हणजे भारताच्या दोन्ही कर्णधारांचे संघ प्ले आॅफमध्ये पोहोचू शकले नाहीत.

प्ले आॅफचा पहिला सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांच्यात रंगणार असून या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. या सामन्यात पराभूत होणाऱ्या संघाला अंतिम फेरीसाठी आणखी एक संधी मिळेल, तर विजेता संघ थेट अंतिम फेरीत धडक मारेल. दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने एक रोमांचक लढत या वेळी होईल यात शंका नाही. हैदराबाद संघातील कमजोरी शोधणे खूप कठीण आहे. सुरुवातीला असे वाटत होते की, त्यांची गोलंदाजी खूप मजबूत आहे कारण त्यांनी सातत्याने छोट्या धावसंख्येचे यशस्वी संरक्षण केले होते. यानंतर त्यांची फलंदाजीही मजबूत असल्याचे दिसले. विशेषकरून केन विलियम्सनने लक्ष वेधले. त्याच्या जोडीला शिखर धवन, मनिष पांडे यांची बॅट चालली तर संघाची धावसंख्या दोनशेच्या आसपास पोहोचते. मात्र, प्ले आॅफ खेळण्याआधी ते सलग तीन सामने हरले आहेत आणि याचा मानसिकरीत्या दबाव त्यांच्यावर राहील.

चेन्नईने किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्धचा आपला अखेरचा सामना जिंकून दिमाखात प्ले आॅफसाठी सज्ज असल्याचे दाखवून दिले. त्यांची कमजोरी म्हणजे, डेथ ओव्हर्समध्ये त्यांच्याकडून धावांची खैरात होत आहे. त्याचवेळी चेन्नईची फलंदाजी जबरदस्त मजबूत आहे. अंबाती रायडू, शेन वॉटसन, सुरेश रैना, महेंद्रसिंग धोनी हे सर्वच फॉर्ममध्ये आहेत. तसेच चहर, शार्दुल ठाकूर, हरभजन सिंग, रवींद्र जडेजा या सर्वांना अष्टपैलू म्हणू शकतो. त्यामुळे चेन्नई एक तगडा संघ आहे. एकूणच दोन्ही संघ तुल्यबळ असल्याने मानसिकरीत्या सक्षम असलेला संघ बाजी मारेल.

 

Web Title: The team of both the captains failed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.