भारताचा पाकवर विराट विजय

विजयानंतर भारतीय जवानांनी आनंदोत्सव साजरा करत भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या.

पाकिस्तान डाव ४७ षटकात २२४ धावांवर आटोपताच भारतीय संघाने एकच जल्लोष केला.

शाहिद आफ्रिदीही स्वस्तात बाद झाल्यानंतर कर्णधार मिसबाह उल हकने एकाबाजूने किल्ला लढवला. मात्र भारतीय गोलंदाजांच्या चक्रव्यूहात तो अडकला व ७६ धावांवर असताना बाद झाला.

शहजाद बाद होताच पाकिस्तानच्या अन्य फलंदाजांनाही स्वस्तात गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. रविंद्र जडेजाच्या चेंडूवर उमर अकमलने धोनीकडे झेल दिला. मात्र पंचांनी त्याला नाबाद दिले. अखेरीस धोनीने डीआरएस प्रणालीचा वापर केला. यात अकमल बाद असल्याचे स्पष्ट झाले व भारतीय संघाने विजयाच्या दिशेने कूच केले.

अहमद शहजाद ४७ धावांवर असताना उमेश यादवच्या चेंडूवर फटका मारण्याच्या नादात रविंद्र जडेजाकडे झेल देऊन बाद झाला. जडेजाने अप्रतिम झेल टिपला.

आर. अश्विनने खेळपट्टीवर जम बसलेल्या हारिस सोहेलचा अडसर दूर करत भारताला मोठा ब्रेक मिळवून दिला. सोहेलच्या विकेटने सामन्याला कलाटणी दिली.

भारताचे ३०० धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानची सुरुवात निराशाजनक झाली. मोहम्मद शमीने युनूस खानची विकेट घेत पाकला पहिला धक्का दिला. शमीने सामन्यात ४ विकेट घेतल्या.

सुरेश रैना कोहली बाद झाल्यावर धोनी रहाणे जडेजा हे फलंदाजही स्वस्तात तंबूत परतल्याने चांगली सुरुवात होऊनही भारताने ५० षटकांत फक्त ३०० धावाच केल्या. पाकिस्तानतर्फे सोहेल खानने सर्वाधिक पाच विकेट घेतल्या.

कोहलीच्या शतकानंतर रैनानेही तडाखेबाज अर्धशतक ठोकून भारताला २५० टप्पा ओलांडून दिला.

शिखर धवन ७३ धावांवर बाद झाल्यावर विराटने सुरेश रैनाच्या साथीने डाव पुढे नेला. विराटने पाकविरोधात कारकिर्दीतले २२ वे शतक ठोकले. वर्ल्डकपमध्ये पाकविरोधात शतक ठोकणारा तो पहिला भारतीय फलंदाज ठरला आहे.

भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर रोहित शर्मा झटपट बाद झाल्यावर शिखर धवन व विराट कोहलीने शतकी भागीदारी करत भारताचा डाव सावरला.

भारत विरुद्ध पाकिस्तान या सामना बघण्यासाठी अॅडिलेडमध्ये दोन्ही देशांचे चाहते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सामन्याला सुमारे ४१ हजार प्रेक्षक उपस्थित होते.

वर्ल्डकपमध्ये भारताची सलामीची लढत कट्टर प्रतिस्पर्धी समजल्या जाणा-या पाकिस्तानसोबत रविवारी पार पडली.या सामन्यात भारताने पाकचा ७६ धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. या सामन्याचा घेतलेला हा आढावा....