कराची : आपल्या गोलंदाजी शैलीमध्ये बदल केल्याच्या २ वर्षांच्या कालावधीनंतर पाकिस्तानचा फिरकी गोलंदाज सईद अजमलने आज क्रिकेटमधील कसोटी, वन-डे आणि टी-२0 मधील आपली निवृत्ती जाहीर केली.
आपल्या यशस्वी विवादस्पद कारर्किदीदरम्यान एक वेळ अजमल एकदिवसीय आणि टी-२0 आंतरराष्ट्रीय स्तरावर नंबर १ चा गोलंदाज होता. कसोटी क्रिकेटमध्येसुद्धा त्याने सफलता प्राप्त केली होती. त्याने २0१२ मध्ये इंग्लड विरुद्ध ३ कसोटी सामन्यांत २४ बळी घेतले होते. परंतु, त्यानंतर त्याची गोलंदाजी शैली विवादास्पद असल्याचे जाहीर करून त्याच्यावर बंदी घालण्यात आली. त्याने आपल्या गोलंदाजी शैैलीत बदल करून २0१५ मध्ये पुनरागमन केले. परंतु, त्याच्या गोलंदाजीमध्ये पूर्वीएवढी अचूकता व भेदकता नव्हती. पुन्हा गोलंदाजी करण्याची परवानगी मिळाल्यानंतर त्याने बांगलादेश विरुद्ध २ वन डे आणि १ टी-२0 सामन्यात फक्त १ बळी घेतला होता. त्यानंतर त्याची कधीही राष्ट्रीय संघात निवड करण्यात आली नव्हती.
अजमलने रावलपिंडी येथे वृत्तसंस्थेला सांगितले की, मी वर्तमान राष्ट्रीय टी-२0 स्पर्धेनंतर सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. माझी कारकीर्द समाधानकारक होती. मी जे लक्ष्य डोळ्यांसमोर ठेवले होते ते पूर्ण झाले आहे. संघाच्या विजयात मी योगदान दिले आहे. अजमलने ३५ कसोटी सामन्यांत १७८, ११३ वन डे मध्ये १८४ आणि ६४ टी-२0 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये ८५ बळी घेतले आहेत. (वृत्तसंस्था)