विजयी हॅट्ट्रिकसाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक

आत्मविश्वास उंचावलेला राजस्थान रॉयल्स संघ बुधवारी येथे कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करीत सलग तिसरा विजय नोंदवण्यास प्रयत्नशील आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 02:45 AM2018-04-18T02:45:56+5:302018-04-18T02:45:56+5:30

whatsapp join usJoin us
Rajasthan Royals look forward to winning hat-trick | विजयी हॅट्ट्रिकसाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक

विजयी हॅट्ट्रिकसाठी राजस्थान रॉयल्स उत्सुक

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

जयपूर : आत्मविश्वास उंचावलेला राजस्थान रॉयल्स संघ बुधवारी येथे कोलकाता नाईट रायडर्सचा पराभव करीत सलग तिसरा विजय नोंदवण्यास प्रयत्नशील आहे.
पहिल्या लढतीत सनरायझर्स हैदराबादविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यानंतर रॉयल्सने दमदार पुनरागमन करीत सलग दोन सामने जिंकले. रॉयल्सने पावसाच्या व्यत्ययामुळे गाजलेल्या लढतीत दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध १० धावांनी विजय मिळवल्यानंतर स्टार खेळाडूंचा समावेश असलेल्या रॉयल चॅलेंजर्स संघाला त्यांच्याच मैदानात १९ धावांनी पराभवाचा धक्का दिला. आरसीबीविरुद्धच्या विजयात संजू सॅमसन हीरो ठरला. त्याने ४५ चेंडूंना सामोरे जाताना नाबाद ९२ धावांची खेळी केली. त्याच्याकडून रॉयल्स संघाला पुन्हा एकदा चमकदार कामगिरीची आशा आहे.
रॉयल्स संघ आपल्यातील काही उणिवा दूर करण्यात यशस्वी ठरला आहे. सॅमसनसह रॉयल्सच्या फलंदाजांनी गेल्या दोन सामन्यांत छाप सोडली आहे. कर्णधार अजिंक्य रहाणेचे योगदानही उल्लेखनीय ठरले आहे. संघाचे गोलंदाजही विराट कोहली व एबी डिव्हिलियर्स या आरसीबीच्या दिग्गज फलंदाजांविरुद्ध गोलंदाजी करण्याचे दडपण झुगारण्यात यशस्वी ठरले आहेत.
गृहमैदानावर रॉयल्सला पराभूत करणे सोपे नसते, पण तरी यजमान संघाला केकेआरविरुद्ध आत्ममश्गुल राहता येणार नाही. कारण दिनेश कार्तिकच्या नेतृत्वाखालील संघाने सोमवारी दिल्ली डेअरडेव्हिल्सविरुद्ध एकतर्फी लढतीत सरशी साधत चार सामन्यांत दुसरा विजय नोंदवला.
आघाडीच्या फळीत ख्रिस लीन व सुनील नारायण यांच्यानंतर मधल्या फळीत दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, नितीश राणा आणि आंद्रे रसेल यांच्यासारखे स्टार हिटरच्या उपस्थितीत संघ मोठी धावसंख्या उभारण्यास सक्षम आहे. पर्पल कॅपधारक नारायण, डेव्हिड विली, अनुभवी पीयूष चावला आणि कुलदीप यादव यांच्या उपस्थितीत संघाची गोलंदाजीची बाजू समतोल आहे. अलीक डेच अंडर-१९ विश्वकप जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सदस्य शिवम मावी आणि रसेल यांच्यामुळे संघाकडे वेगवान गोलंदाजीचा पर्याय उपलब्ध आहे. स्पर्धेच्या व्यस्त कार्यक्रमामुळे केकेआर संघ थकलेला असून संघाने सरावाऐवजी आज विश्रांतीला पसंती दिली. गेल्या लढतीत पावसामुळे अडीच तास खेळ थांबला होता, पण त्यानंतर जयपूरमध्ये दमटपणा वाढला आहे. खेळपट्टीमध्ये आर्द्रता नसल्यामुळे केकेआरच्या फिरकीपटूंना मदत मिळू शकते.

सामन्याची वेळ : रात्री ८ वाजता
स्थळ : सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर

Web Title: Rajasthan Royals look forward to winning hat-trick

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.