जीवघेण्या अपघतानंतर त्याला मिळाले जगण्याचे बळ, युवा क्रिकेटपटू कल्प शाहचा प्रेरणादायी प्रवास

यश मिळवण्यासाठी जिद्द आणि त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी असेल, तर निर्धारीत केलेले लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2018 07:39 PM2018-10-20T19:39:09+5:302018-10-20T19:39:41+5:30

whatsapp join usJoin us
Mumbai's young cricketer Kalp Shah's inspirational journey | जीवघेण्या अपघतानंतर त्याला मिळाले जगण्याचे बळ, युवा क्रिकेटपटू कल्प शाहचा प्रेरणादायी प्रवास

जीवघेण्या अपघतानंतर त्याला मिळाले जगण्याचे बळ, युवा क्रिकेटपटू कल्प शाहचा प्रेरणादायी प्रवास

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

 - रोहित नाईक
मुंबई : यश मिळवण्यासाठी जिद्द आणि त्यासाठी कितीही मेहनत घेण्याची तयारी असेल, तर निर्धारीत केलेले लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला कोणीही अडवू शकत नाही. अशीच जिद्द मुंबईच्या युवा क्रिकेटपटूने दाखवली असून वयाच्या ११-१२व्या वर्षी जीवघेण्या अपघातातून बचावल्यानंतर रविवारी तो भारतीय क्रिकेट नियामक क्रिकेटच्या वतीने आयोजित होणाऱ्या १६ वर्षांखालील विजय मर्चंट चषक स्पर्धेत खेळण्यासाठी मैदानात उतरेल. या जिद्दी क्रिकेटपटूचे नाव आहे कल्प शाह.

भारतीय क्रिकेटचा ‘हिटमॅन’ रोहित शर्मा याचे प्रशिक्षक दिनेश लाड यांच्याकडे क्रिकेटचे धडे गिरवलेल्या कल्पचे मुंबईकडून खेळण्याचे स्वप्न होते. परंतु, मूळचा सौराष्ट्रचा असल्याने आणि तेथील जिल्हास्तरीय स्पर्धांमध्ये अनेकदा छाप पाडल्याने कल्पला सौराष्ट्र संघाकडून बोलावणे आले. ‘संघ कोणताही असो राज्यस्तरीय क्रिकेट संघात निवड होणे महत्त्वाचे आहे,’ असा सल्ला प्रशिक्षक लाड यांच्याकडून मिळल्यानंतर कल्प सौराष्ट्रसाठी सज्ज झाला. आता रविवारी (२१ ऑक्टोबर) कल्प मुंबईविरुद्ध सलामीचा सामना खेळेल. 

इथपर्यंत पोहचण्यासाठी कल्पला खूप मोठा संघर्ष करावा लागला. वयाच्या ११-१२ व्या वर्षी एका कार्यक्रमासाठी परिवारासह गेलेल्या कल्पच्या अंगावर भलामोठा झोपाळा कोसळला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. कल्पसोबत खेळत असलेली २ मुले त्या अपघातात दगावली. या गंभीर अपघातानंतर काही महिने रुग्णालयात घालवलेल्या कल्पला उभे राहणेही जमत नव्हते. परंतु, क्रिकेटचे वेड त्याला स्वस्थ बसू देईना. थोडीफार हालचाल सुरु झाल्यानंतर कल्पने पुन्हा एकदा क्रिकेट खेळण्याचा हट्ट धरला. मुलाचा हट्ट पाहून वडिल यतिन शाह यांनी प्रशिक्षक लाड यांच्याशी संपर्क साधला.

लाड यांनीही यतिन शाह यांची समजूत काढून कल्पला सरावासाठी पाठविण्यास सांगितले. कल्पला मानसिक समाधन मिळेल या हेतूने लाड यांनी त्याच्यावर विशेष लक्ष दिले खरे, मात्र कल्पने याच संधीचं सोनं करत हळूहळू मानसिक आणि शारिरीक कणखरता मिळवली. उत्कृष्ट डावखुरा मध्यमगती गोलंदाज म्हणून त्याने ओळख निर्माण केली. बोरीवलीच्या स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलच्या संघातून कल्पने हॅरीश शिल्ड या मुंबईच्या सर्वोच्च शालेय स्पर्धांमध्येही छाप पाडली. त्याचबरोबर इतर शालेय स्पर्धांमध्येही त्याने आपल्या वेगवान माऱ्याने सर्वांनाच प्रभावित केले. कल्पच्या आतापर्यंतच्या वाटचलीत वडिल यतिन आणि आई वैशाली यांचा पाठिंबा अत्यंत मोलाचा ठरला. 

कल्पने झुंजार वृत्तीने आम्हाला चकीत केले
कल्पचा अपघात आमच्यासाठी मोठा धक्का होता. आज आम्हाला त्या स्मृती जागृत करण्यचीही इच्छा नाही. पण त्याने त्याच्या झुंजार वृत्तीने आम्हाला चकीत केले आहे. त्याने स्वत:ला ज्याप्रकारे सावरले त्याने आम्ही थक्क झालो. भविष्यात मुंबईकडून खेळण्याची संधी मिळाली तर कल्पचे प्राधान्य \मुंबईला प्राधान्य असेल. पण आता संधी मिळाली यासाठी तो सौराष्ट्रकडून खेळत आहे, असे कल्पचे वडिल यतिन शाह यांनी सांगितले. 

कल्पची जिद्द अविश्वसनीय 
कल्प खूप गुणवान खेळाडू आहे. तो नक्कीच एकदिवस उच्चस्तरीय क्रिकेट खेळेल. अपघात झाल्यानंतर तो उभा राहू शकेल की नाही याबाबत शंका होती. पण त्याने दाखवलेली जिद्द अविश्वसनीय आहे. मुंबईत संधी मिळणे त्याला कठीण होते कारण येथे खूप स्पर्धा आहे. पण सौराष्ट्रकडून मिळत असलेली संधी सोडणे योग्य वाटले नाही. शेवटी राज्य संघाचे प्रतिनिधित्व करणे महत्त्वाचे होते आणि ही संधी त्याने साधली. आता तो मुंबईविरुद्ध खेळण्यासाठी सज्ज असून सौराष्ट्रल नक्कीच त्याचा फायदा होईल, असा विश्वास प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केला. 

Web Title: Mumbai's young cricketer Kalp Shah's inspirational journey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.