IND vs AUS : भारताने कसोटी मालिका जिंकली, पण...

कोहलीच्या गोटामध्ये राहुल आहे, हे ओपन सिक्रेट आहे. पण आपल्या गोटातील खेळाडू फॉर्मात नसतानाही त्याला का संधी द्यावी, याचे उत्तर कोहलीने द्यायला हवे. त्याचबरोबर राहुललला संधी देऊन कोहलीने संघाचे नुकसान का केले, याचाही विचार करायला हवा.

By प्रसाद लाड | Published: January 7, 2019 03:27 PM2019-01-07T15:27:23+5:302019-01-07T15:31:27+5:30

whatsapp join usJoin us
IND vs AUS: India won the Test series, but ... | IND vs AUS : भारताने कसोटी मालिका जिंकली, पण...

IND vs AUS : भारताने कसोटी मालिका जिंकली, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्देलोकेश राहुलवर मेहेरबान का?कोहलीच्या नेतृत्वावर विचार करण्याची गरजसंघ निवड चुकीची ठरते तेव्हा

मुंबई : भारताने ऑस्ट्रेलियामध्ये पहिल्यांदा कसोटी मालिका जिंकली. इतिहास घडवला. विक्रम रचला. भारतीयांमध्ये आनंदाचं वातावरण आहे. जल्लोश आहे. पण हा विजय खरेच एवढा मोठा आहे का, या गोष्टीचाही विचार करायला हवा. या मालिकेतील ऑस्ट्रेलियाचा संघ किती तोडीचा होता, या गोष्टीकडेही लक्ष देण्याची गरज आहे. विजयाच्या उन्मादात बऱ्याच गोष्टींकडे आपण कानाडोळा करून चालणार नाही.

पुजारा ठरला नायक
या मालिकेचा खरा नायक ठरला तो पुजारा. कारण या चार सामन्यांपैकी तीन सामन्यांमध्ये पुजाराने शतकापेक्षा जास्त धावा केल्या. या मालिकेत 521 धावांचा डोंगर त्याने उभारला. इंग्लंड दौऱ्यात पुजाराकडून अपेक्षित कामगिरी झाली नव्हती. त्यावेळी त्याच्यावर काही जणांनी टीका केली होती. या टीकेला पुजाराने आपल्या खेळींनी चोख उत्तर दिले.

कोहलीच्या नेतृत्वावर विचार करण्याची गरज
जो स्वत:ला सांभाळू शकत नाही, तो संघाला काय सारवणार, असे कोहलीबाबत म्हटले गेले आहे. आणि यामध्ये तथ्यही आहे. एखादा फलंदाज बाद झाल्यावर कोहली ज्यापद्धतीने प्रत्येकवेळी आनंद साजरा करतो, हे कितपत योग्य आहे किंवा एखाद्या अटीतटीच्यावेळी कोहलीचा स्वत:वर ताबा राहिलेला नसतो. कोहलीच्या नेतृत्वाला आक्रमक म्हणायचे की आक्रसताळे, हा प्रश्न पडला आहे. ज्यावेळी खेळाडूंना निराशेच्या गर्तेतून बाहेर काढायचे असते तेव्हा कोहली स्वत: निराश असतो. त्यामुळे कोहली एक फलंदाज म्हणून चांगला असला, धावांच्या राशी उभारत असला तरी एक कर्णधार म्हणून त्याने रचलेले डावपेच पाहायला मिळत नाही. 
भारताने मालिका जिंकली असली तरी कोहलीच्या नेतृत्वावर नक्कीच विचार करण्याची वेळ आली आहे. कारण कोहली आपल्या कर्णधारपदाचा गैरवापर करत असल्याचे या मालिकेत पाहायला मिळाले आहे. लोकेश राहुलसारखा सलामीवीर चांगल्या फॉर्मात नसताना त्याला चौथ्या सामन्यात का खेळवण्यात आले, हे अनाकलनीय आहे. 
तिसऱ्या सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियावर फॉलोऑन लादण्याची सुवर्णसंधी होती. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 151 धावांवर आटोपला होता. भारताकडे जवळपास तिनशे धावांची आघाडी यावेळी होती. पण आक्रमक कर्णधाराचा टेंभा मिरवणाऱ्या कोहीलीने यावेळी फॉलोऑन दिला नाही.
चौथ्या सामन्यात पुजाराच्या द्विशतकासाठी भारतीय संघ थांबला होता. त्यानंतर रिषभ पंतच्या शतकासाठी भारतीय संघ थांबला. पंतच्या शतकानंतरही भारतीय संघाने आपला डाव घोषित केला नाही. पंतच्या शतकानंतर जरी भारताने डाव घोषित केला असता तर भारताकडे भक्कम धावसंख्या होतीच, पण भारताच्या गोलंदाजांना 20 बळी मिळवण्यासाठी पुरेसा वेळ मिळाला असता. आता काही जण पावसाचे कारण पुढे करतीलही पण पहिली चूक ही कोहलीकडून झाली, याकडे कानाडोळा करता येणार नाही. 
त्याचबरोबर संघातील सर्वात भेदक आणि दोन्ही स्विंग करणारा मोहम्मद शमीसारखा गोलंदाज आहे. पण त्याला नवीन चेंडू का हाताळायला दिला जात नाही, या गोष्टीचेही उत्तर मिळत नाही.

सलामीवीरांचा तिढा सुटणार कधी
इंग्लंड दौऱ्यापाठोपाठ या मालिकेतही भारताला सलामीवीरांचा तिढा सोडवता आलेला नाही. इंग्लंडमधील मालिकेनंतर शिखर धवनला डच्चू देण्यात आला. पण या मालिकेत मुरली विजय आणि लोकेश राहुल हे दोघेही फ्लॉप ठरले. भारताला या मालिकेत मयांक अग्रवालच्या नावाने चांगला सलामीवीर मिळाला आहे. पण त्याला साथ देण्यासाठी दुसरा सलामीवीर पाहावा लागेल. पृथ्वी शॉ याला झालेली दुखापत यावेळी भारताला भारी पडली, असेही म्हणता येईल.

लोकेश राहुलवर मेहेरबान का?
पहिल्या दोन्ही सामन्यांत लोकेश राहुलकडून चांगली फलंदाजी पाहायला मिळाले नाही. त्यानंतर तिसऱ्या सामन्यासाठी त्याला वगळण्यात आले. पण चौथ्या सामन्यात कोणत्या आधारावर त्याला संघात स्थान देण्यात आले, याचे उत्तर कोहलीने द्यायला हवे. कोहलीच्या गोटामध्ये राहुल आहे, हे ओपन सिक्रेट आहे. पण आपल्या गोटातील खेळाडू फॉर्मात नसतानाही त्याला का संधी द्यावी, याचे उत्तर कोहलीने द्यायला हवे. त्याचबरोबर राहुललला संधी देऊन कोहलीने संघाचे नुकसान का केले, याचाही विचार करायला हवा.

ऑस्ट्रेलियाचा संघ खरेच तोडीचा होता
आतापर्यंत आपण बरेच ऑस्ट्रेलियाचे चांगले संघ बघितले. जे वाघासारखे आक्रमक होते. पण आत्ताचा हा संघ वाघ नाही तर पाटाखालच्या मांजरीसारखा होता. या संघात आक्रमकपणा नव्हता. जिंकण्याची इर्षा नव्हती. ऑस्ट्रेलियाचे फलंदाज जे आपल्या मैदानात धावांच्या राशी उभारतात तिथे त्यांच्या एकाही फलंदाजाला शतक पूर्ण करता आले नाही, ही खरेतर नामुष्कीची वेळ आहे. ऑस्ट्रेलियाच्या मार्कस हॅरिसने ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 258 धावा केल्या, पण यापेक्षा दुप्पट धावा भारताच्या पुजाराच्या नावावर होत्या. 


संघ निवड चुकीची ठरते तेव्हा
तिसऱ्या आणि चौथ्या सामन्यासाठी भारताची संघ निवड ही योग्य नव्हती. खासकरून चौथ्या सामन्यात तरी ही गोष्ट प्रकर्षाने जाणवली. कोहलीने काहीही आधार नसताना लोकेश राहुलला संघात स्थान दिले. त्याच्याऐवजी जर हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू संघात आला असता तर कदाचित संघाला अधिक बळकटी मिळाली असती. दुसरीकडे संघाला चांगला सलामीवीर हवा होता, तर रोहित शर्मा किंवा पार्थिव पटेल हे चांगले पर्याय भारताकडे उपलब्ध होते. पण या गोष्टींचा विचार भारतीय संघ व्यवस्थापनाने का केला नाही, या गोष्टींचे उत्तर मिळत नाही.
प्रत्येक संघाचे एक चक्र असते. वेस्ट इंडिजचा 1975-1984 या कालखंडातील संघ पाहिला तर त्याला तोड नव्हती. कारण या संघात फलंदाजांचे कर्दनकाळ ठरलेले गोलंदाज होते. त्याचबरोबर धडाकेबाज फलंदाज होते. त्यामुळे कर्णधार क्लाइव्ह लॉइडने फारसे कष्ट घ्यावे लागले नव्हते. त्यानंतर वेस्ट इंडिजच्या संघाची काय अवस्था झाली, ते सर्वांना माहिती आहेच. श्रीलंकेचा 1996 सालचा विश्वविजेता संघ बलवान होता. पण आत्ताचा श्रीलंकेचा संघ पाहिला तर त्यांच्यामध्ये तेवढी गुवणत्ता आणि विजयाची सरासरी पाहायला मिळत नाही. तसेच काहीसे ऑस्ट्रेलियाचे झाल्याचे पाहायला मिळत आहे.


ऑस्ट्रेलियाचे शेपूट वळवळले
भारताची गोलंदाजी ही सर्वोत्तम आहे, असे म्हटले जाते. पण या मालिकेत ऑस्ट्रेलियाचे शेपूट चांगलेच वळवळले. पहिल्या सामन्यापासून ऑस्ट्रेलियाच्या तळाच्या फलंदाजांनी चांगल्या धावा केल्या. या मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या पॅट कमिन्सने अर्धशतक झळकावले होते. या मालिकेत तब्बल 163 धावा कमिन्सने केला होता. त्याचबरोबर मिचेल स्टार्कनेही 117 धावा केल्या. भारताचे सलामीवीर लोकेश राहुल आणि मुरली विजय या दोघांच्या धावा मिळूनही 117 धावा होताना दिसत नाही. त्यामुळे या गोष्टीकडे कसे पाहायला हे प्रत्येकाने ठरवायला हवे.

चार सामन्यांतील भारताची कामगिरी

पहिल्या कसोटी सामन्यात भारताला दमदार सुरुवात करून दिली ती चेतेश्वर पुजाराने. पहिल्या डावातील त्याच्या 123 धावांच्या खेळीच्या जोरावरच भारताला 250 धावा करता आल्या. दुसऱ्या डावातही त्याच्या 71 या सर्वाधिक धावा होत्या. भारताने 323 धावांचे आव्हान ऑस्ट्रेलियापुढे ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची 7 बाद 187 अशी दयनीय अवस्था झाली होती. पण त्यानंतर त्यांच्या तळाच्या फलंदजांनी भारताच्या नाकीनऊ आणले होते. तळाच्या तीन फलंदाजांनी 104 धावांची भर घातली होती. ऑस्ट्रेलिया हा सामना जिंकेल, असेही वाटू लागले होते. पण अखेर अश्विनने जोश हेझलवूडला बाद केले आणि भारताला  31 धावांनी हा सामना जिंकता आला.

पर्थच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताला लाजीरवाणा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात पुजाराला लय सापडली नव्हती. विराट कोहलीने पहिल्या डावात शतक झळकावले खरे, पण भारताला पहिल्या डावात आघाडी मिळवता आली नाही. त्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय संघाचा 140 धावांत खुर्दा उडवला गेला. 

तिसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा पुजाराला फॉर्म गवसला. पुजाराने पुन्हा एकदा शतकाला गवसणी घातली. मयांक अगरवालसारखा युवा सलामीवीर संघात दाखल झाला आणि त्यानेही चांगल्या धावा केल्या. कोहली आणि रोहित शर्मा यांनीही अर्धशतक झळकावली. भाराताच्या पहिल्या डावात 443 धावा झाल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा संघ पहिल्या डावात 151 धावा करू शकला. भारतीय संघाला यावेळी फॉलोऑन देण्याची सुवर्णसंधी होती. पण त्यांनी ती गमावली. दुसऱ्या डावात भारताच्या फलंदाजांचे वस्त्रहरण झाले. पण पहिल्या डावातील संचिताच्या जोरावर  त्यांनी सामना जिंकला.

चौथ्या सामन्यात पुजारा तळपला. त्याची 193 धावांची खेळी नजरेचे पारणे फेडणारी होती. कसोटी क्रिकेटमध्ये कशी फलंदाजी करायची, हे त्याने या मालिकेत दाखवून दिले. रिषभ पंतनेही दमदार दीड शतक झळकावले. पण भारताने आपला डाव जास्त लांबवला. त्यामुळे फॉलोऑन दिल्यानंतरही हा सामना अनिर्णीत राहीला.

Web Title: IND vs AUS: India won the Test series, but ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.