पल्लीकल : अपयशाच्या भीतीपोटी चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरलेला श्रीलंका संघ सतत माघारत असल्याची प्रतिक्रिया माजी कर्णधार माहेला जयवर्धने याने व्यक्त केली. तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताकडून दारुण पराभव होण्याआधी लंकेचा झिम्बाब्वेसारख्या कमकुवत संघाकडूनही वन-डे मालिकेत ३-२ ने पराभव झाला होता.
कसोटी मालिकेत भारताकडून झालेल्या सफायावर तो म्हणाला,‘आमचा संघ प्रत्येक आघाडीवर माघारला. कसोटीतील खराब कामगिरीवर खेळाडू हतबल झाले. कसोटीत अव्वल स्थानावर असलेल्या संघाला आव्हान देणे कठीण होते. शिवाय कुठल्याही सामन्यात २० गडी बाद करणारा मारा दिसलाच नाही.’
आठवा मालिका विजय साजरा करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली याचे माहेलाने तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, ‘कोहली आक्रमक आणि सक्रिय कर्णधार आहे. भारताने खेळाडूंचा शानदार पूल तयार केल्यामुळे प्रत्येक खेळाडू जबाबदारी स्वीकारत आहे.’ हार्दिक पांड्याचे देखील माहेलाने आवर्जून कौतुक केले. (वृत्तसंस्था)
माझ्या मते संघाचे मनोधैर्य ढासळले आहे. अपयशाची भीती खेळाडूंना त्रस्त करते. यामुळे आत्मविश्वास आणि जिंकण्याची भूक खेळाडूंच्या चेहºयावर जाणवेनाशी झाली आहे. यावर लवकर तोडगा काढावा लागेल.
- माहेला जयवर्धने