कॅरेबियन खेळाडूंनी दबदबा राखला आहे

आयपीएलच्या प्ले आॅफ फेरीसाठी ३-४ दिवस शिल्लक आहेत. पण तरीही अद्याप अव्वल चार संघ निश्चित झालेले नाहीत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांचे स्थान पक्के आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 12:13 AM2018-05-18T00:13:55+5:302018-05-18T00:13:55+5:30

whatsapp join usJoin us
Caribbean players have dominated | कॅरेबियन खेळाडूंनी दबदबा राखला आहे

कॅरेबियन खेळाडूंनी दबदबा राखला आहे

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

-अयाझ मेमन
आयपीएलच्या प्ले आॅफ फेरीसाठी ३-४ दिवस शिल्लक आहेत. पण तरीही अद्याप अव्वल चार संघ निश्चित झालेले नाहीत. यामध्ये सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपरकिंग्ज यांचे स्थान पक्के आहे. आता तिसऱ्या व चौथ्या स्थानासाठी चुरस रंगली असून या दोन स्थानांसाठी ५ संघांमध्ये चढाओढ सुरू आहे. दिल्ली डेअरडेव्हिल्सचे दोन सामने शिल्लक असले, तरी त्यांचे आव्हान कधीच संपुष्टात आले आहे. पण किंग्ज इलेव्हन पंजाब, कोलकाता नाइट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्स या पाचही संघांना प्ले आॅफची संधी आहे. सर्वाधिक संधी कोलकाताची दिसत आहे. धावगतीचा विचार केल्यास राजस्थान व पंजाब मागे पडलेले दिसतात. तसेच बँगलोरलाही आपले दोन्ही सामने जिंकणे अनिवार्य आहे. मुंबईही काहीसे याच स्थितीमध्ये आहे. स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असतानाही गुपित कायम रहिल्याने यंदाची चुरस लक्षात येते.
विदेशी खेळाडूंमध्ये यंदा कॅरेबियन खेळाडूंचा दबदबा दिसून येतो. बाकीच्या देशातील खेळाडूंनी म्हणावे तसे वर्चस्व राखलेले नाही. आॅस्टेÑलियाच्या खेळाडूंपैकी शेन वॉटसनचा अपवाद सोडला तर इतर खेळाडूंनी अपेक्षित कामगिरी केली नाही. दक्षिण आफ्रिकेकडून एबी डिव्हिलियर्सने एकट्याने छाप पाडली आहे. न्यूझीलंडचे ब्रेंडन मॅक्क्युलम, टिम साऊदी हे स्टारही फारसे चमकलेले नाहीत. या सर्वांच्या तुलनेत वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी मात्र लक्ष वेधले आहे. सुनील नरेन, आंद्रे रसेल, द्वेन ब्रावो, एविन लेविस आणि ज्याला लिलावाच्या पहिल्या सत्रात कोणीही खरेदी केले नव्हते त्या ख्रिस गेलनेही आपला हिसका दाखवला आहे. विंडीज खेळाडू का चमकले, तर ते कॅरेबियन प्रीमियर लीगही खेळतात आणि आपण हे विसरायला नको की ते विद्यमान टी२० विश्वविजेतेही आहेत. विंडीज खेळाडू कसोटी व एकदिवसीय क्रिकेटमध्ये भले मागे असतील, पण टी२० क्रिकेटमध्ये ते ज्या बिनधास्तपणे खेळतात त्याचा त्यांना अधिक फायदा होतो. यंदा इंग्लंडचेही खूप खेळाडू होते. यामध्ये स्टोक्सने सर्वाधिक निराशा केली. सुमारे १२.५ कोटी रुपयांची किंमत मिळाल्यानंतरही त्याने अपेक्षित खेळ केलेला नाही. मोइन अलीला फार संधी मिळाल्या नाहीत. पण इंग्लंडच्या जोस बटलरने मात्र जबरदस्त कामगिरी केली. ज्या प्रकारे लोकेश राहुल पंजाबसाठी वन मॅन आर्मी बनला, त्याचप्रमाणे बटलरने राजस्थानसाठी भूमिका बजावली आहे. त्याने सलग ५ अर्धशतके झळकावली आहेत. जर त्याला सुरुवातीपासून वरच्या क्रमांकावर खेळवले असते, तर राजस्थानने याआधीच प्ले आॅफ स्थान निश्चित केले असते. याशिवाय श्रीलंका, बांगलादेश व अफगाणिस्तानमधूनही खेळाडू आले होते. लंकेच्या खेळाडूंना काहीच संधी मिळाली नाही. बांगलादेशचा हसन हैदराबादचा प्रमुख खेळाडू बनला. मुस्तफिझूर रहमानने मुंबईकडून चांगली सुरुवात केली, पण त्याला सातत्य राखण्यात अपयश आले. मात्र अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी लक्ष वेधले. राशिद खान, मुजीब रहमान यांनी जबरदस्त कामगिरी केली आहे.

(संपादकीय सल्लागार)

Web Title: Caribbean players have dominated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.