#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष

गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने 2017 मध्ये आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे.

By Namdeo.kumbhar | Published: December 27, 2017 08:11 AM2017-12-27T08:11:48+5:302017-12-27T08:14:30+5:30

whatsapp join usJoin us
# BestOf2017: 'Viratdhya' from the cricket field of the year 2017 | #BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष

#BestOf2017 : 'विराटाध्याय' क्रिकेटच्या मैदानापासून ते थेट लग्न मंडपापर्यंत कोहलीनं गाजवलं 2017 वर्ष

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

मुंबई - गेल्या काही वर्षांपासून भारतीय क्रिकेटचा आधारस्तंभ बनलेल्या विराट कोहलीने 2017 मध्ये आपल्या कमालीच्या सातत्यपूर्ण कामगिरीच्या जोरावर दबदबा राखला आहे. क्रिकेट कोणत्याही प्रकारचे असो, त्यात कोहलीच्या बॅटमधून धावांचा पाऊस पडणार ही प्रत्येकालाच खात्री असते. क्रिकेटचं मैदान, सोशल मीडिया किंवा एखादा वाद अशा सर्वच ठिकाणी 2017 मध्ये कॅप्टन कोहलीचाच बोलबाला होता. 2017 मध्ये फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत घेतलेली हनुमान उडी असो, 2017 मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंमध्ये सातव्या स्थानावर घेतलेली उडी असो, या सगळ्याच ठिकाणी विराट कोहली अव्वल ठरला. सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळांडूमध्ये एखाद्या क्रिकेटरची निवड होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी. या वर्षी परदेशी माध्यमांमध्येही विराट कोहली झळकला. ऑस्ट्रेलियानं कर्णधार स्मिथबरोबर झालेला वादही चांगलाच गाजला. टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदावरून झालेला वाद व त्यामुळे विराटवर झालेली टीका असो किंवा पगारवाढीचा मुद्दा इतकंच नाही. तर अतिक्रिकेटमुळे टीम मेंबर्सला न मिळणाऱ्या आरामासाठी बीसीसीआयशी नडणं असे एक ना अनेक मुद्दे विराटशी जोडले गेले. प्रोफेशनल लाइफबरोबरच विराटच्या लव्ह लाइफचीही चांगलीच चर्चा झाली. बॉलिवूड अभिनेत्री अनुष्कासोबत असलेलं प्रेमप्रकरणाच्या वृत्ताला विराटने अनुष्काशी लग्नगाठ बांधून पूर्णविराम दिला. क्रिकेटचं मैदान ते इटलीमधील डेस्टिनेशन वेडिंग सर्वच ठिकाणी विराट कोहली आणि विराट कोहलीच होता.

वर्षभरातील कोहलीची विराट कामगिरी - 
विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघ कसोटीमध्ये अव्वल स्थानावर विराजमान आहे. तर वन-डे आणि टी-20मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. यावर्षभरात विराट कोहलीनं खोऱ्यानं धावा काढल्या आहेत. विराट कोहलीनं 11 शतक आणि दहा अर्धशतक झळकावली आहेत. यामध्ये तीन द्विशतकाचा समावेश आहे. तिन्ही प्रकारात विराट कोहलीनं 46 सामन्यात 2818 धावा केल्या आहेत. 10 कसोटीमध्ये 1059, 26 वन-डेत 1460 आणि दहा टी-20त 299 धावा केल्या आहे. कोहलीची सध्याची 50.53 ची सरासरी त्याच्या कौशल्याची साक्ष देते. पण कर्णधार बनल्यानंतरच्या 38 डावांमध्ये कोहलीची सरासरी आहे 65.50! आजवर कर्णधार म्हणून त्याच्यापेक्षा अधिक चांगली फलंदाजी साक्षात डॉन ब्रॅडमन (100.51) यांनाच देता आली आहे. म्हणजे नेतृत्व स्वीकारल्यानंतर कोहलीची धावांची आणि जिंकण्याची भूक वाढतेच आहे.  जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या विराटने लंकेविरोधात मायदेशात झालेल्या कसोटी मालिकेत अप्रतिम प्रदर्शन केले. 3 कसोटींमध्ये तब्बल 610 धावांचा तडाखा देत त्याने दोन द्विशतके झळकावली. त्याचबरोबर कोहलीने आपल्या नेतृत्वामध्ये नवव्या मालिका विजयाचीही नोंद केली. एकूणच यावर्षी विराट भारताचा विजयी मंत्र ठरलाय.

दीड वर्षांत सहा द्विशतके! दिग्गजांचे विक्रम मोडले
विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक सहा द्विशतके फटकावण्याच्या सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवागच्या विक्रमाशी बरोबरी साधली आहे. त्याबरोबरच कसोटीत कर्णधार म्हणून सहा द्विशतके फटकावणारा विराट हा जागतिक क्रिकेटमधील पहिला फलंदाज बनला आहे. त्याबरोबरच त्याने कर्णधार म्हणून पाच द्विशतके फटकावण्याचा वेस्ट इंडिजच्या ब्रायन लाराचा विक्रम मोडीत काढला. विराटने कर्णधार म्हणून ही सहा द्विशतके केवळ 50 डावांत फटकावली हे विशेष.  सलग दोन कसोटची सामन्यांमध्ये द्विशतके फटकावणार विराट हा दुसरा भारतीय ठरला आहे. विराटच्या आधी भारताच्या विनोद कांबळीने 1992-93 मध्ये सलग दोन द्विशतके फटकावली होती. 

 ICC रँकिंगमध्ये अव्वल - 
रनमशीन विराट कोहलीनं कसोटी क्रमवारी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली. वर्षभरात कसोटी मालिकेत दमदार फलंदाजी करणारा कर्णधार कोहली 893 पाँईटसह सहाव्या क्रमांकावरुन दुस-या स्थानावर पोहोचला. वर्षाखेरीस श्रीलंकेविरुद्धच्या तीन कसोटी सामन्यांमध्ये विराटने एकूण 610 धावा फटकावल्या. विराटच्या नेतृत्वाखाली भारताने सलग नववा मालिका विजय मिळवला. 2017 मध्ये कोहलीने 10 कसोटी सामन्यांमध्ये 1059 धावा फटकावल्या. त्यात पाच शतकांचा समावेश असून तीन द्विशतके आहेत. वनडेमध्ये प्रथम तरटी-20मध्ये रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर आहे. 

शतकांची हॅटट्रीक - 
सलग तीन कसोटी सामन्यांमध्ये शतकांची हॅटट्रीक करणारा विराट पहिलाच कर्णधार ठरला आहे. विराटने लंकेविरोधात सलग तीन कसोटी सामन्यात तीन शतक झळकावली आहेत. विराटने पहिल्या कोलकाता कसोटीच्या दुस-या डावात नाबाद 104 धावांची खेळी साकारली. नागपूर कसोटीच द्विशतकी 213 आणि दिल्लीच्या फिरोज शहा कोटलावरही द्विशशतक झळकावलं. 

16 हजार धावांचा टप्पा -  
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात 16 हजार धावा करणारा  तो पहिला खेळाडू बनला आहे. त्याने 350 डावात 54.27च्या सरासरीने 16012 धावा केल्या आहेत. यापूर्वी हा विक्रम आफ्रिकेच्या हाशिम अमलाच्या नावावर होता. अमलाने 363 डावात ही कामगिरी केली होती. 

कसोटीत 5 हजार धावा पूर्ण करणारा विराट चौथा भारतीय 
कसोटी क्रिकेटमध्ये वेगाने 5 हजार धावा पूर्ण करणारा विराट चौथा भारतीय फलंदाज आहे. कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून सुनिल गावसकर यांनी वेगाने 5 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. त्यांनी 95 डावांमध्ये हा टप्पा गाठला. वीरेंद्र सेहवाग (98डाव), सचिन तेंडुलकर (103 डाव) आणि विराट कोहली (105 डाव) चौथ्या स्थानी आहे.  अशी कामगिरी करणारा विराट 11 वा भारतीय फलंदाज आहे. विराटचा हा 63 वा कसोटी सामना असून त्याने 51.82 च्या सरासरीने 14 अर्धशतक आणि 20 शतक झळकवली आहेत. 

व्यस्त वेळापत्रकामुळे BCCIशी पंगा -
आपल्या आक्रमक स्वभावासाठी प्रसिद्ध असलेला विराट संघाच्या व्यस्त वेळापत्रकामुळे बीसीसीआयवर भडकला. कर्णधार विराट कोहलीनं संघाचं व्यस्त वेळापत्रक, सतत होणाऱ्या क्रिकेट मालिका आणि चुकीच्या नियोजनावरुन बीसीसीआयला चांगलचेच फटकारलय. कोहली म्हणाला, कोणत्याही मालिकेपूर्वी तयारीसाठी पुरेसा वेळ हवा असतो. एखाद्या संघासोबत मोठी मालिका खेळायची असल्यास तयारीसाठी एक महिना तरी वेळ हवा असतो पण आम्हाला बीसीसीयनं ठरवलेल्या वेळेनुसारच तयारी करावी लागते.  कोहलीच्या या मागणीमुळे त्याला लंकेविरोधातील वन-डे आणि टी-20 मालिकेत आराम देण्यात आला. कोहलीच्या या मताशी धोनीसह आजी-माजी खेळाडूंनी समर्थन दिले.  
सातत्याने क्रिकेट खेळण्याच्या प्रश्नावर भारताचा कर्णधार विराट कोहली याने आवाज उठवला. माणूस म्हणून विचार केला तर कुठल्याही तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये सातत्याने खेळणे शक्य नाही.  मीसुद्धा एक माणूसच आहे, रोबोट नाही. मलाही आरामाची गरज असल्याचे मत विराटनं व्यक्त केलं. 

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक -
प्रत्येक सामन्यात खोऱ्यानं धावा खेचणाऱ्या विराटनं यावर्षी 11 शतक झळकावली. वन-डेमध्ये 32 आणि कसोटीत 20 शतकासह आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकाचे अर्धशतक पूर्ण केलं. 

वन-डेत सर्वाधिक शतकांमध्ये दुसऱ्या स्थानी - 
विराट कोहलीनं आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात आपल्या कारकिर्दीतलं 32 वं शतक ठोकत सर्वाधिक शतकं ठोकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला. दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज रिकी पॉन्टिंगला मागं सारलं आहे. रिकी पाँटिंगच्या नावे 30 शतकं आहेत. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर 49 शतकांसह पहिल्या स्थानावर आहे. 

विराटच्या सुपरफास्ट 9 हजार वनडे धावा
विराट कोहलीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये नऊ हजार धावा करताच विक्रमाचे अजून एक शिखर सर केले. अवघ्या 202 सामन्यात आणि 194 डावांमध्ये नऊ हजार धावा पूर्ण करत सर्वात वेगात नऊ हजार धावांचा टप्पा ओलांडण्याचा आपला विक्रम आपल्या नावे केला आहे. विराटच्या आधी सर्वात जलद नऊ हजार धावा फटकावण्याचा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या एबी. डीव्हिलियर्सच्या नावे होता. त्याने 205 डावांत 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. तर भारतातर्फे सौरव गांगुलीने सर्वात जलद 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या. गांगुलीने 228 डावांत 9 हजार धावा पूर्ण केल्या होत्या.  

कर्णधार म्हणून जलद 2000 धावा 
कर्णधार म्हणून सर्वात जलद 2000 धावा करण्याचा विक्रम कोहलीच्या नावावर यावर्षी  झाला. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेच्या ए.बी. डीव्हिलियर्स याच्या नावावर होता.  कर्णधार म्हणून खेळताना कोहलीनं 36 सामन्यात 2000 धावांचा टप्पा पार केला. ए.बी. डीव्हिलियर्स (41), क्लार्क (47), धोनी/मॉर्गन (48), गांगुली/इंझमाम (49) आणि व्ही. रिचर्डस् (50) यांच्या नावावर हा विक्रम होता. 

कमाईत स्टार फुटबॉलपटू मेसीला टाकले मागे
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने जगातील सर्वात 'मार्केटेबल' खेळाडूंच्या यादीत अर्जेंटिनाचा प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेसीला मागे टाकले.  'फोर्ब्‍स' या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या यादीत विराटने जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सातवे स्थान पटकावले आहे. विराट कोहली 14.5 मिलियन डॉलरसह सातव्या क्रमांकावर आहे. तर मेसीची 13.5  मिलियन डॉलरच्या कमाईसह नवव्या स्थानावर वर्णी लागली आहे. जगभरातील लोकप्रिय खेळाडूंमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या पहिल्या दहामध्ये असणारा विराट एकमेव क्रिकेटर आहे.

प्रशिक्षकपद - 'कुंबळे-शास्त्री आणि विराट' 
कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील कथित वाद प्रकरणामुळे 2017 मध्ये भारतीय क्रिकेटविश्व ढवळून निघाले. अनिल कुंबळेनं प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिला.  विराट कोहलीने कुंबळेच्या कडक शिस्तीची तक्रार सर्वोच्च न्यायालयाकडून गठीत करण्यात आलेल्या प्रशासकीय समितीकडे केली होती. यानंतर हा वाद चर्चेच आला होता. गेल्यावर्षी संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळणाऱ्या अनिल कुंबळेच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघाची कामगिरी दमदार झाली होती. कुंबळेशी असलेला मुख्य प्रशिक्षकपदाचा करार संपल्यानंतर मुदतवाढ घेण्यास कुंबळेने नकार दिला होता. त्यानंतर त्याने बीसीसीआयच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे राजीनामा पाठवला.  कुंबळेनं प्रशिक्षकपद सोडल्यानंतर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावर माजी संघसंचालक रवी शास्त्री यांची निवड करण्यात आली.

जंबोचा कोहलीवर विराट आरोप 
प्रशिक्षकपद सोडताना कुंबळेंनी कर्णधार विराट कोहलीच्या वर्तनावर आश्चर्य व्यक्त केलं. भारतीय संघाच्या कर्णधाराला माझ्या प्रशिक्षकपदावर आक्षेप असल्याचा आरोप त्यांनी पायउतार होताना केला आहे. गेलं वर्षभर मी टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून यशस्वी होण्याचं श्रेय कर्णधार, संपूर्ण संघ आणि सपोर्ट स्टाफला देतो. माझ्या प्रशिक्षणाच्या स्टाईलवर आणि मी मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहण्यावर कर्णधाराचा आक्षेप असल्याचं पहिल्यांदाच मला बीसीसीआयकडून समजलं. मी कायमच कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्या सीमा ओळखून काम करत असल्याने मला धक्का बसला आहे. बीसीसीआयने आमच्यातील मतभेद आणि गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र मला असं वाटतं की आता हे पद सोडण्याची वेळ आली आहे. प्रशिक्षकपदाची धुरा बीसीसीआय ज्या व्यक्तीला पात्र समजेल, त्याच्याकडे सुपूर्द करण्याची मी विनंती करतो. असे विराट कोहलीवर जंबोनं आरोप केले.

ऑस्ट्रेलियन खेळाडूंकडून कोहलीचं कौतुक - 
आक्रमक स्वभावामुळे ऑस्ट्रेलियाची माध्यमे आणि काही खेळाडू विराट कोहलीवर टीका करण्याची कोणतीच संधी सोडत नाहीत. पण ऑस्ट्रेलियन संघाचा माजी कर्णधार मायकल क्लार्क यानं विराट कोहलीच्या या आक्रमक वृत्तीचे तोंडभरुन कौतुक केलं आहे. विराट कोहली हा ऑस्ट्रेलियन लोकांचा आवडता क्रिकेटपटू आहे, तिथे त्याचा सन्मान केला जातो.  असेही तो म्हणाला. ऑस्ट्रेलियाच्या मायकल हसीनंही विराटचे कौतुक केलं होतं. हसीनं विराटची तुलना ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराशी केली होती. तो म्हणाला होता की कोहलीचं नेतृत्व हे रिकी पाँटिंगसारखं आक्रमक आहे. कोहली शानदार आहे. त्याच्या नेतृत्वाची पद्धत मला आवडते. त्याची आक्रमक प्रवृत्ती आणि जिंकण्याचा जोश यासाठी मी त्याचा चाहता आहे. संघाला जेवढे पुढे घेऊन जाता येईल, त्यासाठी तो पूर्ण प्रयत्न करतो. त्याने सामना आणि सराव यामध्ये नवा उच्चांक गाठला आहे. जिंकण्याचा निर्धार आणि स्पर्धेची भावना यामध्ये तो पाँटिंगसारखा आहे. असे हसी म्हणाला होता. 

2016 चा डीआरएस वाद -
2016मध्ये ऑस्ट्रेलियाचा संघ भारताच्या दौऱ्यावर आला होता, त्यावेळी डीआरएसवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. एका सामन्यात फलंदाजी करताना स्मिथला पंचानी बाद घोषित केल्यानंतर डीआरएस घेताना त्यानं ड्रेसिंग रुमकडे पाहिल्याचा आरोप विराटनं केला होता. या सामन्यानंतर एकही ऑस्ट्रेलियन खेळाडू माझा मित्र नाही, असे विराट म्हणाला होता. या मालिकेवेळी ऑस्ट्रेलियन माध्यमांनी आणि माजी खेळाडूंनी कोहलीवर विराट टीका केली होती. 

कोहलीचा 'विराट' रेकॉर्ड, 33 कर्णधारांना जमलं नाही ते करून दाखवलं
2017 मध्ये कर्णधार विराट कोहलीने श्रीलंकेच्या धरतीवर इतिहास रचला. विदेशी धर्तीवर तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेत क्लीन स्विप देण्यासाठी भारताला तब्बल 85 वर्ष वाट पाहावी लागली. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या 85 वर्षांच्या इतिहासात टीम इंडियाने परदेशात क्लीन स्विप मिळवण्याची ही पहिलीच वेळ आहे. 28 वर्षांच्या विराट कोहलीने आपल्या अवघ्या 29 व्या कसोटी सामन्यात कर्णधारपद सांभाळताना हा पराक्रम केला. विदेशी धर्तीवर 78 व्या मालिकेतील हा भारताचा 18 वा मालिका विजय आहे. यादरम्यान पहिल्यांदाच भारताने 3-0 ने व्हाइटवॉश दिला आहे. 1932 सालापासून भारताने कसोटी क्रिकेट खेळण्यास सुरूवात केली. लॉर्ड्समध्ये इंग्लंडविरूद्ध झालेल्या पहिल्या सामन्यात सीके नायडू यांनी भारताचं कर्णधारपद सांभाळलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत 33 जणांनी भारताच्या कसोटी संघाचं कर्णधारपद भुषवलं आहे, पण केवळ कोहलीलाच हा पराक्रम करता आला.   

पगारासाठी पुढाकार - 
भारतीय संघाची पगारवाढ आणि व्यस्त कार्यक्रम या दोन मुद्यांना घेऊन विराट, धोनी आणि राष्ट्रीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांची भेट घेतली. या भेटीत प्रशासकीय समितीला विराटने आपले मुद्दे सांगितले. त्यांनतर आगामी हंगामात भारतीय संघातील अव्वल दर्जाचे खेळाडू आणि देशांतर्गत क्रिकेटपटूंचे वेतनामध्ये दुप्पट वाढ होण्याचे संकेत मिळत आहेत. सध्याच्या घडीला क्रिकेटपटूंसाठी 180 कोटींचा निधी असून त्यामध्ये 200 कोटीपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. 

फोर्ब्सच्या श्रीमंत सेलेब्रिटींच्या यादीत विराट तिसरा 
फोर्ब्स मॅगझीनने सर्वाधिक कमाई करणाऱ्या 100 भारतीय सेलेब्रिटींची यादी जाहीर केली आहे. या यादीत यावर्षीदेखील कर्णधार विराट कोहलीनं तिसऱ्या स्थानावर झेप घेतली. विराट कोहलीची वार्षिक कमाई 100 कोटी रुपये इतकी आहे.  या यादीत सलमान 232 कोटी रुपयांसह पहिल्या स्थानी तर 170 कोटी वार्षिक कमाईसह शाहरुख खान दुसऱ्या क्रमांकावर आहे.  

विराट-अनुष्काचे इटलीत सात फेरे, रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदींची हजेरी
 चार वर्षाच्या प्रेमप्रकरणानंतर 2017 च्या अखेरीस विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा लग्नबंधनात अडकले. इटलीमध्ये त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला. इटलीच्या बोर्गो फिनोचितो हॉटेलमध्ये दोघांचं लग्न झालं. हे हॉटेल अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आवडीचं हॉटेल म्हणूनही ओळखलं जातं. जगातल्या 20 महागड्या हॉटेल्सपैकी ते एक आहे. नवी दिल्लीत 21 डिसेंबरला तर मुंबईत 26 डिसेंबर रोजी दोघांच्या मित्रांसाठी खास रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. दिल्लीतील त्यांच्या रिसेप्शन पार्टीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. 

विराट कोहलीचे ते ट्विट ठरले 2017 चे ‘गोल्डन ट्विट’ 
''आज आम्ही एकमेकांसोबत कायमस्वरूपी प्रेमबंधनात अडकण्याचं आश्वासन घेतलं....हे वृत्त तुमच्यासोबत शेअर करताना मनापासून खूप आनंद होतोय... हा दिवस कुटुंबिय, मित्र-मैत्रिणी आणि चाहत्यांच्या शुभेच्छांनी आणखी खास होईल...आमच्या जीवन प्रवासातील महत्वाचा हिस्सा राहिल्याबद्दल सर्वांचे आभार'' लग्नानंतर विराटनं केलेलं हे ट्विट 2017 चे ‘गोल्डन ट्विट’ ठरलं. 

इन्स्टाग्रामच्या पोस्टद्वारे कोहलीची विराट कमाई - 
विराट कोहलीचे खेळामधील सातत्या सोशल मीडियावरही असते. तो रोज काहीना काही पोस्ट करत असतोच. विराट कोहली इन्स्टाग्रामवर पोस्ट करण्यासाठी करोडो रुपये घेतो. फोर्ब्सच्या एका रिपोर्टनुसार, विराट कोहली हा जगातला सर्वात महागडा खेळाडू आहे, त्याला एका इंस्टाग्राम पोस्टचे 3.2 कोटी रुपये मिळतात.  

मात्र 2018 वर्ष विराटसाठी तितकसं सोपं राहणार नाहीये. कारण या वर्षात भारताचे बहुतांश सामने हे परदेशी भुमीवर होणार आहेत. यातील 5 जानेवारीपासून भारताच्या दक्षिण आफ्रिका दौऱ्याला सुरुवात होणार आहे. सांघिक कामगिरीसह स्वत:च्या कामगिरीवरही विराटला लक्ष द्यावं लागणार आहे.

Web Title: # BestOf2017: 'Viratdhya' from the cricket field of the year 2017

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.