मुंबई : १९८३च्या विश्वचषक दरम्यानचा काळ आमच्यासाठी सुवर्ण क्षण आहे. तो काळ आम्ही खूप एन्जॉय केला. खूप सा-या गोष्टी आहेत जे आम्ही सांगू शकत नाही. खरं म्हणजे जेव्हा संघ तयार झाला, तेव्हाही आम्हाला आमच्या कामगिरीवर विश्वास नव्हता. पण, सुरुवातीचे २-३ सामने जिंकल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आम्ही एक ‘टीम’ आहोत,’ अशा शब्दांत भारताचे पहिले क्रिकेट विश्वविजेते कर्णधार कपिल देव यांनी आपल्या आठवणींना उजाळा दिला.
भारतीय क्रीडा क्षेत्राला कलाटणी देणारा १९८३ क्रिकेट विश्वचषकावर आधारीत चित्रपटाची बुधवारी मुंबईत घोषणा झाली. आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग हा कपिल देवची भूमिका निभावणार आहे. यावेळी, कपिलदेव यांच्यासह विश्वविजेत्या भारतीय संघातील सर्व खेळाडू उपस्थिती होते. केवळ, लिटल मास्टर सुनील गावसकर, रवी शास्त्री आणि यष्टीरक्षक सय्यद किरमाणी उपस्थित नव्हते. खेळाडूंनी यावेळी मजेशीर किस्से सांगताना एकच धमाल उडवून दिली. के. श्रीकांत यांनी विशेष कार्यक्रमात रंग भरले.
कपिल देव यांनी म्हटले की, ‘पहिल्या दोन विश्वचषक स्पर्धेतील भारताची कामगिरी पाहता ८३च्या स्पर्धेत भारताकडून विजेतेपदाची कल्पना खुद्द खेळाडूंनीही केली नव्हती. एक संघ म्हणून आम्हा स्वत:ला आमच्या कामगिरीवर विश्वास नव्हता. मात्र, सुरुवातीचे काही सामने जिंकल्यानंतर आम्हाला जाणीव झाली की आपण एक संघ आहोत.’ कपिल यांनी काही किस्सेही सांगितले. ते म्हणाले, ‘ज्यावेळी मला कर्णधार बनवले, तेव्हा सर्वांनाच प्रश्न पडला की, याला इंग्रजी बोलता तर येत नाही. त्यावेळी मी म्हटलेलं की कोणालातरी आॅक्सफोर्डवरुन बोलवा. तो इंग्रजीमध्ये बोलेल आणि मी क्रिकेट खेळेल. ज्यावेळी, मी टीम मिटिंगमध्ये इंग्रजीत बोलायचो तेव्हा माझे सहकारी माझ्या चुका पकडण्यासाठी कायम सज्ज असायचे.’
के. श्रीकांत म्हणाले, ‘पहिल्या दोन विश्वचषकातील भारताची कामगिरी पाहता, ८३ च्या स्पर्धेत भारत विजेता होईल, असे म्हणणे त्यावेळी वेडेपणाचे होते. त्यात पहिलाच सामना वेस्ट इंडिजविरुध्द असताना कर्णधार कपिलने हा सामना आपण जिंकू शकतो असे म्हटले. त्यावेळी आम्ही त्याला अक्षरश: वेड्यात काढले. त्यावेळी विंडीजची फलंदाजी भक्कम होतीच, शिवाय असे खतरनाक गोलंदाज होते की त्यांची आता आठवणही काढावीशी वाटंत नाही. पण नंतर सर्व इतिहास घडला आणि हा इतिहास केवळ कपिल देव या व्यक्तीमुळे घडला. त्याने देशाला विश्वविजेता बनवलं.’
उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध मी इयान बोथमचा बळी घेतला होता. चेंडू खूप खाली राहून वळालेला. बोथमचा त्रिफळा उडवल्याने प्रेक्षक धावत आले होते. काहिंनी माझ्या खिशात ५० पौंडचे नोट भरले. त्यावेळी, कपिलने विचारले की, एकतंर चेंडू खाली राहू शकतो किंवा वळू शकतो. पण तू हे दोन्ही कसं केलंस? मी म्हणालो, हे रहस्य आहे. यासाठी मी खूप मेहनत घेतली. खरं सांगतो, ३४ वर्ष झाली त्या घटनेला, पण बोथम कसा बाद झाला हे अजूनपर्यंत मला माहीत नाही.
- कीर्ती आझाद