छत्रपती संभाजीनगरात लोकसभा निवडणूक काळात रेकॉर्डब्रेक प्रतिबंधात्मक कारवाया
By सुमित डोळे | Published: May 15, 2024 06:28 PM2024-05-15T18:28:10+5:302024-05-15T18:28:33+5:30
पोलिस सजग, २२९१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया, ५२६ जणांवर गुन्हे
छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलिस विभाग सतर्क झाला होता. मतदान पार पडेपर्यंत पोलिसांना कुठलाही धोका स्वीकारायचा नसल्याने रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यासाठी त्यांनी सडेतोड कारवाया केल्या. यात जवळपास २२९१ गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाया करत गुन्हेगार दिसताच गुन्ह्यात अडकला गेला. यात प्रामुख्याने अवैध शस्त्र, अमली पदार्थाचे सेवन व अवैध दारू विक्रीच्या गुन्ह्यात टवाळखोरांना थेट रेकॉर्डवर घेत तंबीच देण्यात आली होती.
१६ मार्च रोजी लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली. यात पाचव्या टप्प्यात जालना मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान पार पडले. जवळपास साडेपाच हजार पोलिस कर्मचारी, अधिकारी मतदानाच्या सुरक्षेसाठी तैनात होते. मात्र, यात कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, कोणी व्यत्यय आणू नये, शिवाय गुन्हेगारांकडून गंभीर गुन्हा घडू नये, यासाठी पोलिस विभागाने आवश्यक ती सर्व पावले उचलली होती. यात प्रामुख्याने रेकॉर्डवरील जवळपास ३ हजार गुन्हेगारांची यादीच पोलिस प्रशासनाने तयार केली होती. त्यानंतर १ एप्रिलपासून त्यांच्या नियमित हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत होते. त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवायांसह त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल करण्यात आले.
असे झाले दीड महिन्यात गुन्हे दाखल
प्रकार गुन्हे आरोपी
दारू ४४० ४४०
अमली पदार्थ ३१ ३१
शस्त्र/हत्यार ५३ ५३
गुटखा २ २
प्रतिबंधात्मक कारवाया २१९१
गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांची नोंदही वाढली
२०२३ च्या एप्रिल मे महिन्याच्या तुलनेत यंदा २०२४ च्या एप्रिल मे महिन्यात लोकसभा निवडणुकीच्या कारवायांमुळे शहर पोलिस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल करण्याच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. यात सर्वाधिक गुन्हे एमआयडीसी वाळूज, सिडको व एमआयडीसी सिडको ठाण्यात दाखल झाले.
१ एप्रिल ते १३ मेदरम्यान दाखल गुन्हे
पोलिस ठाणे - गुन्हे
एम. वाळूज - १९९
सिडको - १३८
एम. सिडको - ९७
मुकुंदवाडी - ९२
छावणी - ९२
क्रांती चौक - ७८
पुंडलिकनगर - ७१
जिन्सी - ६९
हर्सूल - ६७
वाळूज - ६५
सिटी चौक - ६१
सातारा - ६०
बेगमपुरा - ५३
दौलताबाद - ४६
जवाहरनगर - ४५
उस्मानपुरा - ४४
वेदांतनगर - २९
गुन्हेगारांवर वचक होताच
पाेलिस आयुक्त, चारही उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व ठाण्यांसोबत मिळून रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या हालचालींवर लक्ष ठेवून होतो. त्यांच्यावरील कारवायांमुळे गुन्ह्यांची संख्या वाढली. परिणामी, निवडणुकात गुन्हेगारांकडून कुठलाही अनुचित प्रकार देखील घडला नाही. प्रतिबंधात्मक कारवायांचा मोठा परिणाम झाला.
- संदीप गुरमे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, गुन्हे शाखा.