नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

By बापू सोळुंके | Published: April 22, 2024 06:16 PM2024-04-22T18:16:30+5:302024-04-22T18:17:19+5:30

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढण्याचा विचार बोलून दाखविला होता.

As soon as Vinod Patil meet Devendra Fadnavis, Sandipan Bhumare filed his candidature three days in advance | नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

नागपुरात फडणवीस- विनोद पाटील भेट; इकडे भुमरेंनी ३ दिवस आधीच उमेदवारी अर्ज भरला

छत्रपती संभाजीनगर: औरंगाबाद लोकसभा मतदारसंघात शिंदेसेनेने जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी जाहिर केली. यामुळे शिंदेसेनेकडून इच्छुक असलेले मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांचा पत्ता कट झाला. यानंतरही पाटील यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरूच ठेवल्याचे दिसून येते. आज सोमवारी दुपारी त्यांनी नागपुर येथे जाऊन भाजपा नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. ही बाब कळताच मंत्री भुमरे यांनी अचानक महायुतीच्या स्थानिक नेत्यांना सोबत घेत त्यांचा डमी उमेदवारी अर्ज दाखल केला.  

मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी महिनाभरापूर्वीच औरंगाबाद लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची घोषणा केली होती. पाटील यांनी महायुतीकडून लढण्याचा विचार बोलून दाखविला होता. त्यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेत उमेदवारीची मागणी केली होती. तेव्हा औरंगाबादची जागा मिळविण्यावरून भाजप आणि शिंदेसेनेमध्ये रस्सीखेच सुरू होती. दरम्यान, औरंगाबादची जागा शिंदेसेनेला मिळाली आणि दोन दिवसापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांची उमेदवारी पक्षाने घोषित केली. यामुळे विनोद पाटील यांचा पत्ता कट झाला. काही ठिकाणी शिंदेसेनेने उमेदवार बदलले. ही बाब लक्षात घेऊन विनोद पाटील यांनी उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरूच ठेवल्याचे दिसून येते. सोमवारी त्यांनी नागपुरात जाऊन भाजप नेते फडणवीस यांची भेट घेतली. ही बाब कळताच महायुतीचे उमेदवार भुमरे यांनी लगेच आ. संजय शिरसाट, भाजप शहराध्यक्ष शिरीष बोराळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किशोर पाटील यांच्या उपस्थितीत दुपारी त्यांचा डमी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

२५ एप्रिल रोजी दाखल करणार होते उमेदवारी
 महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून भुमरे हे २५ एप्रिल रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य नेत्यांच्या उपस्थितीत उमेदवारी दाखल करणार होते. तशी माहिती पक्षाचे प्रवक्ता आ. शिरसाट यांनी दिली होती. दरम्यान आज अचानक भुमरे यांनी कोणताही गाजावाजा न करता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला सुरवात झाली.

Web Title: As soon as Vinod Patil meet Devendra Fadnavis, Sandipan Bhumare filed his candidature three days in advance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.