गणेश चतुर्थी: बाप्पाची मूर्ती कशी असावी? ‘अशी’ घरी आणा गणेशमूर्ती; सुखकर्ता गणपती शुभ करेल!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 11:06 AM2023-09-15T11:06:14+5:302023-09-15T11:09:07+5:30

Ganesh Chaturthi 2023: गणपतीची मूर्ती कशी असावी? कोणती मूर्ती घरी आणल्याने सुख, समृद्धता आणि वैभव प्राप्त होऊ शकते? जाणून घ्या...

ganesh chaturthi 2023 know about these 5 importance things always keep in mind before buying ganesh murti for ganesh utsav 2023 | गणेश चतुर्थी: बाप्पाची मूर्ती कशी असावी? ‘अशी’ घरी आणा गणेशमूर्ती; सुखकर्ता गणपती शुभ करेल!

गणेश चतुर्थी: बाप्पाची मूर्ती कशी असावी? ‘अशी’ घरी आणा गणेशमूर्ती; सुखकर्ता गणपती शुभ करेल!

googlenewsNext

Ganesh Chaturthi 2023: अवघ्या काही दिवसांवर गणपती बाप्पाचे आगमन येऊन ठेपले आहे. कोणत्याही मंगल कार्याची सुरुवात आपण गणपती पूजनाने करतो. गणपती, गणेशाच्या केवळ नामोच्चाराने चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात नेहमीच होतो. बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता, संकटनाशक अशा कितीतरी बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या गणेशाची घरोघरी उपासना, नामस्मरण, पूजन केले जाते. यंदा १९ सप्टेंबर २०२३ रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे. भाद्रपद चतुर्थीपासून ते चतुर्दशीपर्यंत घरोघरी श्रीगणेशाचे पार्थिव पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. श्रीगणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात होते. प्रत्येक घरी आपापल्या आवडीनुसार, मनमोहक गणपतीची मूर्ती आणली जाते. मात्र, केवळ मोहून न जाता काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक असते, असे सांगितले जाते. जाणून घेऊया...

गणेशाचे बालरुप जितके मोहक आहे, तितकीच त्याची शक्ती, युक्ती, विवेकबुद्धीही चाणाक्ष आहे. गणपती केवळ विघ्नहर्ता नाही, तर तो बुद्धीदाता आणि समृद्धीकारकही आहे. यंदा गणपतीला अंगारक योग जुळून येत आहे. मंगळवारी श्रीगणेश चतुर्थी येत असल्यामुळे याला अंगारकी श्रीगणेश चतुर्थी असेही म्हटले जात आहे. गणपती मूर्ती घडवण्यात सर्वाधिक अभिव्यक्ती स्वातंत्र्य घेतलेले दिसते. (Ganesh Chaturthi 2023 Idol)

यश आणि प्रगतीची सूचक, शुभ फलदायी गणेशमूर्ती

हजारो प्रकारच्या, स्वरुपाच्या गणेशमूर्ती घडत असतात.  मात्र, बसलेल्या स्वरुपातील गणपतीची मूर्ती अत्यंत शुभ फलदायी मानली जाते. बसलेल्या स्वरुपातील गणपती पूजनामुळे घरामध्ये समृद्धी येते. पैसा टिकतो. शाश्वत धनलाभाचे योग जुळून येतात, असे सांगितले जाते. उभे राहून आशीर्वाद देत असलेली गणपतीची मूर्तीही उत्तम असते. ती यश आणि प्रगतीची सूचक मानली गेली आहे, असे सांगितले जाते.

सुखकर्ता गणेशमूर्ती

गणेश चतुर्थीला आराम करत असलेल्या गणेश स्वरुपाची स्थापना केल्यास घरात सुख, शांतता, आनंद वाढीस लागतो. अशा गणेशाची पूजा केल्यास कष्ट, समस्या दूर होतात. मानसिक शांतता लाभते. शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीचे केलेले पूजन समृद्धीदायक मानले जाते. व्यापार, व्यवसाय, उद्योग क्षेत्रातील व्यक्तींनी शेंदूर रंगातील गणपतीच्या मूर्तीची स्थापना करून पूजन करावे, असे सांगितले जाते. शाडूच्या मातीची मूर्तीच घरात आणून स्थापन करावी. शाडूच्या मातीची मूर्ती नसेल, तर धातूची मूर्ती स्थापन करावी. मात्र, केमिकलयुक्त गणपतीची मूर्ती स्थापन करू नये, असे सांगितले जाते.

बाल स्वरुपातील गणपती

बालरुपी गणपतीची स्थापना शुभ मानली जाते. बालरुपातील गणपतीची पूजा केवळ गणेश चतुर्थीपूर्ती मर्यादित न ठेवता, ती वर्षभर करावी. अशाने संतानप्राप्तीची इच्छा पूर्ण होऊ शकते, अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. तसेच नटराज रुपी गणेशाची स्थापना शुभ मानली जाते. यामुळे घरात आनंद, उत्साह वाढून अशा गणेशाचे पूजन प्रगतीकारक मानले गेले आहे. विद्यार्थ्यांनी गणेशाच्या या स्वरुपाचे नियमितपणे पूजन करावे, असा सल्ला दिला जातो. 

काही अत्यंत आवश्यक आणि महत्त्वाच्या गोष्टी

गणेश चतुर्थीला गणपतीची मूर्ती घरात स्थापन करताना काही गोष्टी या आवश्यक मानल्या गेल्या आहेत. गणपतीच्या मूर्ती ही मूषकाविना नसावी. मूषक गणपतीचे वाहन असल्यामुळे त्याचा समावेश हा असायलाच हवा. यानंतर गणपतीच्या हातामध्ये शस्त्रे असावीत. तसेच गणपतीचा एक हात आशीर्वाद देतानाच्या स्थितीत आणि दुसरा मोदक स्वीकारण्याच्या स्थितीत असावा, असे सांगितले जाते. साधारणपणे सर्व देवतांचे आवाहन अशाच स्वरुपात करण्याची परंपरा आहे. आपल्या गणपतीचे जे रुप मोहून जाते, त्याची स्थापना करावी.

- सदर मान्यता आणि दाव्यांची पुष्टी केली जात नाही. सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.

 

Web Title: ganesh chaturthi 2023 know about these 5 importance things always keep in mind before buying ganesh murti for ganesh utsav 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.