"प्रचारात माझा फोटो व नाव वापरू नका"; नवनीत राणांना राष्ट्रवादी नेत्याचा इशारा, पत्र व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 05:42 PM2024-04-01T17:42:25+5:302024-04-01T17:43:47+5:30

अमरावतीमधील स्थानिक नेते आणि आमदार बच्चू कडू यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

Do not use my photo and name; NCP leader's warning to Navneet Rana, letter goes viral | "प्रचारात माझा फोटो व नाव वापरू नका"; नवनीत राणांना राष्ट्रवादी नेत्याचा इशारा, पत्र व्हायरल

"प्रचारात माझा फोटो व नाव वापरू नका"; नवनीत राणांना राष्ट्रवादी नेत्याचा इशारा, पत्र व्हायरल

मुंबई/अमरावती - भाजपाने अमरावतीमधून खासदार नवनीत राणांना उमेदवारी जाहीर केली आहे. गतनिवडणुकीत राणा यांनी महाआघाडीच्या पुरस्कृत उमेदवार म्हणून अपक्ष निवडणूक जिंकली होती. मात्र, गेल्या ५ वर्षांत खासदार राणांचा भाजपासोबत असलेलं समर्थन आणि विविध आंदोलनातून त्यांनी महाविकास आघाडीला केलेला विरोध पाहता, नवनीत राणांना भाजपाने उमेदवारी दिली आहे. मात्र, स्थानिक भाजपा नेते आणि पदाधिकाऱ्यांनी राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आमदार बच्चू कडू यांनी प्रहारचा उमेदवारही घोषित केला. मात्र, मोदींना पंतप्रधान बनवण्यासाठी एक खासदार अमरावतीतून द्यायचा आहे. त्यामुळे, सर्वांनी मतभेद विसरुन पाठिंबा द्यावा, अशी विनंती नवनीत राणा यांनी केली आहे. पण, अद्यापही राणांना स्थानिक नेत्यांचा विरोध कायम असल्याचे दिसून येते. 

अमरावतीमधील स्थानिक नेते आणि आमदार बच्चू कडू यांनीही राणांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. राणा यांची प्रहार संघटना आक्रमक झाली असून प्रहारने अमरावतीत ठाकरे गटातून आलेल्या दिनेश बूब यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्यामुळे, नवनीत राणांचं टेन्शन वाढलं आहे. भाजपा नेतेही राणांना विरोध करत असून शिवसेना अडसूळ गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाकडूनही राणांच्या उमेदवारीला विरोधच दिसून येतो. त्यातच, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना, त्यांच्या पोस्टर किंवा प्रचारात फोटो वापरण्यास मनाई केली आहे. नवनीत राणा यांना सहकार्य न करण्याची भूमिका खोडके यांनी घेतली असून पत्राद्वारे इशाराही दिला आहे.  

''अमरावती लोकसभा निवडणुकीच्या आपल्या प्रचाराच्या पोस्टर आपण माझा फोटो लावला असल्याचे मला समजले असून सोशल मीडियावर सुद्धा तो व्हायरल केला जात आहे. सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर माझा फोटो लावण्याची मला काहीही कल्पना नसून आपण माझा फोटो सोशल मीडियावर किंवा पोस्टरवर वापरण्याबाबत माझी व्यक्तिगत अनुमती सुद्धा घेतलेली नाही. हि बाब निवडणूक आदर्श आंचार संहितेचे उल्लंघन करणारी आहे. त्याकरिता आपणास विनंती आहे की, लोकसभा निवडणुकीत माझ्या फोटोचा व नावाचा वापर करू नये,'' असे खोडके यांनी राणांना म्हटले आहे.

दरम्यान, ''आपण माझ्या फोटोचा वापर ज्या-ज्या मीडियात केलेला आहे तेथून त्वरित काढून मीडियामध्ये त्या संदर्भात आपण आपले निवेदन सोशल मीडिया व प्रिंट मीडियामध्ये करावे. जर याबाबत आपण माध्यमांधून निवेदन (खुलासा केले नाही तर मला कायदेशीर कारवाही करणे भाग पडेल.),'' असा इशाराही संजय खोडके यांनी नवनीत राणा यांना दिला आहे. 
 

Web Title: Do not use my photo and name; NCP leader's warning to Navneet Rana, letter goes viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.