मंजिरी कुलकर्णी, आहारतज्ज्ञ
सध्या चर्चेत असणारं ओझेम्पिक डाएट म्हणजे नेमकं काय हे सोप्या भाषेत समजून घेऊया.. थोडक्यात सांगायचं झाल्यास आपल्या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवणारा इन्सुलिन हार्मोन सगळ्यांना माहितीच आहे. शरीरात इन्सुलिन तयार होण्यासाठी शरीराला एक सिग्नल मिळण्याची गरज असते. आणि त्यासाठी GLP 1 हा आणखी एक हार्मोन गरजेचा असतो. ozempic drugs म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर GLP 1 ची कॉपी आहे. किंवा हवं तर आपण त्यांना जुळे म्हणूया. मग बाहेरून शरीरात आलेल्या या जुळ्या भावाला शरीर GLP 1 समजते आणि हा जुळा भाऊ GLP 1 ची सगळी कामे करतो.. ही कामे नेमकी कोणती ते पाहा..
१. इन्सुलिन बनविणे.. यामुळे मग रक्तातील साखर कमी होते.
२. हृदय जास्त ग्लुकोज वापरते आणि बीपी कमी होते.
३. पोट भरल्याचे समाधान जास्त वेळ टिकून राहाते.
४. जठरातील अन्न पुढे जाण्याची गती कमी होणे.
५. लिव्हर glycogen storage वाढवेल
६. स्नायुंनी जास्त प्रमाणात ग्लुकोज वापरणे.
७. शरीराच्या सगळ्याच अवयवांचे ग्लुकोज वापरणे वाढते.
८. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ozempic drugs टाईप २ डायबिटीसमध्ये दिले जाते. यामुळे साखर नियंत्रित राहाते आणि मग आपोआपच वजन कमी होते. म्हणून आता हेच औषध काही जण वजन कमी करण्यासाठी वापरत आहेत.
ओजेम्पिक डाएटचे दुष्परिणाम कोणते?
ओजेम्पिक ड्रग्ज घेतल्याने अनेकांना नॉशिया, उलट्या, डायरिया, पोटदुखी, कॉन्स्टिपेशन, पोट खराब असणे, छातीत जळजळ होणे, वारंवार ढेकर येणे, गॅसेस होणे, पोट फुगल्यासारखे होणे, भूक मंदावणे, नाक गळणे, घसा खवखवणे, डोकेदुखी, आळस येणे, थकवा येणे, रक्तदाब कमी होणे असे त्रास होतात.
ही औषधी घ्यायची आणि मग वाटेल ते खायचे असा या डाएटचा अर्थ होत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्याने तुम्ही काही दिवस हे औषध घेऊ शकता. पण नंतर पुढे काय हा प्रश्न आहेच.. त्यापेक्षा व्यायाम करा आणि पौष्टिक, सकस खा.. अत्यंत पराकोटीच्या आळशी लोकांनी हे औषध घ्यायला हरकत नाही. म्हणजे औषध घ्यायचे आणि दिवसभर upset stomach घेऊन फिरायचे. पण त्यापेक्षा नैसर्गिक भूक लागल्यावर खाणे, त्यानंतर समाधान वाटणे, शांत झोप लागणे, उत्साह वाटणे हे जास्त आनंददायी नाहीये का?