वाढत्या वजनाची चिंता हल्ली बऱ्याच जणांना छळत आहे. त्यामुळे मग कोणी व्यायाम करून वजन कमी करण्याचा प्रयत्न करतं तर कोणाला डाएटिंग करणं अधिक सोयीस्कर वाटतं. काही लोक जर व्यायाम आणि डाएटिंग अशा दोन्ही गोष्टी करतात. पण तरीही त्यांचं वजन फारसं कमी झालेलं दिसतच नाही. असं का होतं ते पाहा, जेणेकरून झटपट वजन कमी होण्यास निश्चितच मदत होऊ शकते.(3 main reasons for weight gain)
व्यायाम आणि डाएट करूनही वजन कमी का होत नाही?
खूप प्रयत्न करूनही वजन कमी होत नसेल तर त्यासाठी तुमच्या शरीरातले ३ हार्मोन्स जबाबदार आहेत. ते कोणते, त्या हार्मोन्सचा आणि वजनाचा काय संबंध आणि त्यावर काय उपाय करायचे याविषयीची माहिती आहारतज्ज्ञ नमामी अग्रवाल यांनी सोशल मीडियावर शेअर केली आहे.
१. इन्सुलिन
त्यापैकी सगळ्यात पहिला हार्मोन म्हणजे इन्सुलिन. जर तुमच्या शरीरात इन्सुलिनची पातळी वाढलेली असेल तर तुमच्या शरीराला फॅट बर्न करायला जास्त त्रास होतो. त्यामुळे मग फॅट्स शरीरात साठवून ठेवण्याची प्रक्रिया वाढत जाते. त्यामुळे मग प्रयत्न करूनही किंवा योग्य आहार घेऊनही वजन कमी होत नाही.
२. कॉर्टिसॉल
वजन वाढण्यासाठी कारणीभूत ठरणारा दुसरा हार्मोन आहे कॉर्टिसॉल. यालाच आपण स्ट्रेस हार्मोन असंही म्हणतो. कॉर्टीसॉल हार्मोन वाढलेला असेल तर त्याचा परिणाम झोपेवर होतो. झोप बिघडली की हार्मोन्सचं संतुलन बिघडतं आणि त्याचा परिणाम वजनावरही होतो. शिवाय कॉर्टीसॉल वाढलेलं असेल तर भूक वाढते. शुगर क्रेव्हिंग वाढते. आणि त्यामुळे मग आपोआपच खाण्याचं प्रमाण वाढतं आणि त्याचा परिणाम वजनावर होतो.
३. इस्ट्रोजीन
महिलांच्या बाबतीत वजन कमी न होण्यामागचं हे एक कारण असू शकतं. जेव्हा इस्ट्रोजीनची पातळी नॉर्मलपेक्षा जास्त असते किंवा कमी असते तेव्हा शरीराच्या फॅट्स आणि पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेवर त्याचा परिणाम होत जातो. आणि त्यामुळेही वजन कमी होत नाही.
