आजकाल वजन कमी करण्यासाठी अनेक जण उपाशी राहण्याचा मार्ग निवडतात. लवकर बारीक होण्यासाठी जेवण सोडणे, फार कमी खाणे किंवा पूर्ण दिवस भुके राहणे हा सोपा उपाय वाटतो. मात्र हा उपाय आरोग्याच्या दृष्टीने अजिबात योग्य नाही. पोटाला त्रास देऊन, शरीराला आवश्यक अन्न न देता वजन कमी करणे हे तात्पुरते असते आणि त्याचे परिणाम उलटे व घातक ठरु शकतात. (Skipping meals to lose weight - are you starving? Your weight will increase dramatically, and these terrible problems will begin)शरीराला रोज ठराविक प्रमाणात ऊर्जा, प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजांची गरज असते. जेव्हा आपण उपाशी राहतो, तेव्हा शरीराला ही पोषणतत्त्वे मिळत नाहीत. सुरुवातीला वजन कमी होत असल्यासारखे वाटते, पण प्रत्यक्षात चरबीपेक्षा जास्त प्रमाणात पाणी आणि स्नायू कमी होतात. यामुळे शरीर कमकुवत होते आणि थकवा, चक्कर येणे, अशक्तपणा यांसारख्या तक्रारी सुरू होतात.
उपाशी राहिल्याने पचनसंस्था बिघडते. सतत भुके राहिल्यामुळे अॅसिडिटी, गॅस, पोटदुखी, बद्धकोष्ठता किंवा जुलाब होण्याची शक्यता वाढते. पोटात आम्ल जास्त तयार होते आणि त्याचा त्रास दीर्घकाळ राहू शकतो. काही वेळा भूक जास्त वाढते आणि नंतर अचानक जास्त खाण्याची सवय लागत, ज्याला बिंज ईटिंग म्हणतात.
भुके राहिल्याचा आणखी एक मोठा दुष्परिणाम म्हणजे मेटाबॉलिझम मंदावतो. शरीराला सतत अन्नाची कमतरता जाणवली की ते ऊर्जा साठवून ठेवायला लागते. त्यामुळे वजन कमी होण्याऐवजी वजन पुन्हा लवकर वाढण्याची शक्यता जास्त असते. एकदा वजन घटले आणि पुन्हा वाढले की शरीरातील चरबी अधिक साठते, ज्यामुळे वजन नियंत्रण ठेवणे आणखी कठीण होते.
महिलांमध्ये उपाशी राहण्याचे दुष्परिणाम अधिक दिसून येतात. हार्मोन्सचा समतोल बिघडतो, मासिक पाळी अनियमित होते, केस गळणे, त्वचा कोरडी होणे आणि चिडचिड वाढणे असे परिणाम दिसतात सतत भूक लागलेली असताना मन अस्वस्थ राहते, एकाग्रता कमी होते आणि तणाव वाढतो. आयुष्य उदास वाटायला लागते. सारखी झोप येते. शरीराला पोषण मिळत नाही. थोडक्यात सांगायचे तर उपाशी राहून बारीक होणे हे आरोग्यासाठी धोकादायक आहे. असे वजन टिकत नाही आणि शरीर कमकुवत होते. वजन कमी करायचे असेल तर शरीराशी शत्रुत्व न करता त्याची काळजी घेत, हळूहळू आणि शहाणपणाने केलेला बदलच खऱ्या अर्थाने फायदेशीर ठरतो. त्यामुळे काय खावे यावर नियंत्रण ठेवा. जेवढी भूक आहे तेवढे तर खायलाच हवे.
