Join us

उन्हाळ्यात आजी हमखास करायची ते पारंपरिक सातूचे पीठ आठवतेय? घ्या रेसिपी, सातूच्या पिठाचे 5 फायदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2022 14:39 IST

वजन कमी करण्याचा उन्हाळ्यातला गारेगार उपाय; नाश्त्याला सातूचं पीठ खाल्ल्यानं होतात 5 फायदे. घरच्याघरी सातूचं पीठ करण्याच्या दोन पध्दती

ठळक मुद्देसातूचं पीठ म्हणजे आहारातला आरोग्यदायी उपाय. सातूच्या पिठाचा नाश्ता केल्यानं , सातूच्या पिठाचं सरबत प्याल्यानं वजन कमी होतं.पचन क्रिया सुधारण्यास सातूचं पीठ फायदेशीर ठरतं

उन्हाळ्यात पोटाला गारवा मिळण्यासाठी सातूचं पीठ खाण्याला महत्व आहे. भारतात तर बिहार राज्यात सातूच्या पिठाचं सरबत ( सत्तू सरबत) खूप प्रसिध्द आहे. केवळ बिहारमध्येच नाहीतर इतरत्रही सातूचं पीठ खाल्लं जातं. उन्हाळ्यात सकाळच्या नाश्त्याला सातूचं पीठ खाल्ल्यानं दुहेर्री फायदा होतो. वजन कमी होतं आणि पोटाला थंडावाही मिळतो. सातूचं पीठ दुकानात मिळत असलं तरी ते घरी करुन खाण्यात खरी मजा आहे. गव्हाचं आणि हरभऱ्याचं सातूचं पीठ करता येतं.

Image: Google

गव्हाचं सातूचं पीठ 

गव्हाचं सातूचं पीठ करण्यासाठी 1 कि. गहू, 3 पाव चण्याची डाळ, 10 ग्रॅम जिरे, 1 छोटा चमचा मीठ आणि वेलचीपूड घ्यावी. सर्वात आधी गहू पाण्यानं धुवावेत. ते वाळवून  घ्यावेत. वाललेले गहू कढईत मध्यम आचेवर चांगले भाजावेत. गहू भाजल्यानंतर चण्याची डाळ खमंग भाजून घ्यावी. भाजल्यानंतर यात जिरे घालावेत. ते गिरणीतून दळून आणावे. 

Image: Google

हरभऱ्याचं सातूचं पीठ

आवश्यकतेनुसार हरभरे घ्यावेत. ते निवडून पाण्यात भिजवावेत. हरभऱ्यांनी पाणी शोषून घेतलं की हरभरे उन्हात सुकवून घ्यावेत. हरभरे सुकले की कढईत भाजून घ्यावेत.  हरभरे भाजत आल्यावर यात  थोडं मीठ आणि जिरे घालावेत.  हरभरे गार होवू द्यावेत आणि गिरणीतून दळून आणावेत.  अशा प्रकारे तयार केलेलं सातूचं पीठ महिनाभर चांगलं राहातं.

Image: Google

नाश्त्याला सातूचं पीठ

नाश्त्याला सातूचं पीठ तयार करण्यासाठी वाटीभर सातूचं पीठ घ्यावं. एका वाटीत कोमट पाणी घ्यावं. त्यात गूळ मिसळून ठेवावा. गूळ व्यवस्थित विरघळू द्यावा.  पाणी पूर्ण थंडं झालं  आणि त्यात गूळ मिसळला गेला की गुळाच्या पाण्यात सातूचं पीठ मिसळावं. मिसळताना त्यात गूठळी राहू देवू नये. पेजेइतकं मिश्रण पातळ असावं. असा सातूचा नाश्त्या करणं शरीराला गारवा मिळण्यासाठी, वजन कमी होण्यासाठी आणि इतर आरोग्यदायी फायद्यांसाठी महत्वाचा आहे. 

Image: Google

सातूच्या पिठानं वजन कमी होतं?

सातूच्या पिठात प्रथिनं, फायबर मोठ्या प्रमाणात असतात. सातूच्या पिठाची पातळ पेज किंवा सरबत प्याल्यानं शरीराला ऊर्जा मिळते. उष्णतेच्या विकाराचा धोका टळतो. सातूच्या पिठात असलेया फायबरमुळे वजन कमी करण्यात सातूच्या पिठाचा उपयोग होतो. वजन कमी करण्यासाठी सातूच्या पिठाचं सरबत करण्यासाठी एक ग्लास पाण्यात 2-3 चमचे सातुचं पीठ  घालावं. पाण्यात पीठ चांगलं मिसळून घ्यावं. या मिश्रणात काळी मिरे पूड आणि थोडं सैंधव मीठ घालावं. रोज हे सरबत पिल्यास किंवा गूळ घालून सातूचं पीठ पेजेसारखं खाल्ल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते. नाश्त्याला सातूचं पीठ खाल्ल्यानं पोट भरपूर वेळ भरलेलं राहातं. यामुळे अधून मधून खाणं टाळलं जातं. वजन कमी होण्यासाठी त्यामुळे सातूच्या पिठाचा उपयोग होतो. 

Image: Google

सातूच्या पिठाचे फायदे

1. सातूचं पीठ खाल्ल्यानं बध्दकोष्ठता, ॲसिडीटी, अपचन यासारख्या समस्या दूर होतात. 2. सातूचं पीठ खाल्ल्यानं उष्णतेच्या विकारापासून बचाव होतो. पोटातील जळजळ , उष्णता कमी होते. पोट शांत होतं. 3. सातूच्या पीठात प्रथिनं आणि फायबर भरपूर असल्यानं वजन कमी होण्यासाठी त्याचा फायदा होतो. 4. गूळ घालून सातूचं पीठ खाल्यास किंवा पाण्यात सातूचं पीठ मिसळून सरबत करुन प्याल्यास शरीराला ऊर्जा मिळते. उत्साह येतो. 5. यकृत निरोगी ठेवण्यासाठी सातूच्या पिठाचा उपयोग होतो. 

  

टॅग्स :आहार योजनाअन्नवेट लॉस टिप्सपाककृती