Join us  

वजन कमी करायचं ठरवलं तर नाश्त्याला सतत अजिबात खाऊ नका 5 पदार्थ, कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2022 4:16 PM

नाश्ता पोटभर हवाच, पण दिवसाची सुरुवात चुकीच्या गोष्टी खाऊन व्हायला नको

ठळक मुद्देनाश्त्याला काय खाऊ नये हे समजून घेतले तर काय खावे हे समजेलवजन कमी करायचं तर दिवसाची सुरुवात योग्य आहाराने व्हायला हवी

वाढलेलं वजन कमी करायचं असेल की आपण जीवनशैलीत आणि मुख्यत: आपल्या आहारात बरेच बदल करतो. सकाळचा नाश्ता हा दिवसभराच्या खाण्यातील सर्वात महत्त्वाचा मानला जातो. रात्रभर पोट रिकामे असल्याने सकाळचा नाश्ता शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा ग्लुकोजच्या माध्यमातून पुरवण्याचे काम करतो. तसेच ब्रेकफास्टमध्ये तुम्ही योग्य पदार्थ खाल्ले तर वजन नियंत्रणात येण्यासही त्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. पण जर चुकीचे पदार्थ खाल्ले तर मात्र वजन कमी होण्याऐवजी ते आहे त्याहून जास्त वाढू शकते. त्यामुळे वजन कमी होण्यासाठी टाळायला हवेत असे पदार्थ कोणते याविषयी आहारतज्ज्ञ सोनिया बक्षी यांनी इंडिया डॉट कॉमशी संवाद साधला. हे पदार्थ कोणते आणि ते का टाळायचे याविषयी जाणून घेऊया...

१. प्रीमिक्स उपमा आणि ओटस

हल्ली बाजारात बऱ्याच लहान मोठ्या कंपन्यांनी आपले रेडी टू कूक पदार्थ बाजारात आणले आहेत. एखादवेळी घाईच्या वेळी किंवा बाहेरगावी ज्याठिकाणी खाण्याची योग्य ती सोय आहे की नाही याचा आपल्याला अंदाज नसेल अशावेळी हे रेडी टू कूक पदार्थ ठिक आहेत. पण नियमितपणे अशाप्रकारे प्रीमिक्स पदार्थ करणे आरोग्यासाठी चांगले नसते. हल्ली अशाप्रकारच्या ओटसचेही वेगवेगळे प्रकार मिळतात. हे पाकीट फोडून गरम पाण्यात घातले की दोन मिनिटांत नाश्ता तयार होतो. त्यामुळे सकाळच्या गडबडीत किंवा अगदी ऑफीसमध्येही या गोष्टी नियमित खाल्ल्या जातात. पण या पदार्थांमध्ये कॉन्सन्ट्रेटेड मीठ आणि प्रिझर्वेटीव्हजचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे दिवसाची सुरुवात करताना अशाप्रकारच्या खाण्याने ती नक्कीच करु नये. 

२. फ्लेवर्ड दही 

हल्ली वजन कमी करण्यासाठी फॅन्सी प्रकारचे व्यायाम आणि फॅन्सी डाएट करण्याचे फॅड आले आहे. बाजारातही अशाप्रकारची उत्पादने सर्रास मिळत असल्याने तरुणांमध्ये आणि मध्यमवयीन महिलांमध्येही पुरेशी माहिती न घेता या उत्पादनांचा वापर करण्याचे प्रमाण वाढले आहे. फ्लेवर्ड योगर्ट हा त्यातलाच एक प्रकार आहे. दही आरोग्यासाठी चांगले असते हे आपल्याला माहित असते. मात्र नाश्ता म्हणून फ्लेवर्ड दह्याचा वापर करणे आरोग्यासाठी चांगले नसते. फ्लेवर्ड दह्यामध्ये साखरेचे प्रमाण खूप जास्त असते. त्यामुळे बाजारात मिळणाऱ्या दह्यापेक्षा घरच्या घरी तुम्ही एखाद्या फळाची प्युरी रुन त्यात मध आणि दही घालून ते खाऊ शकता. 

३. मिल्कशेक 

फळे दूधात घालून त्याचा शेक करणे आरोग्यासाठी अजिबात योग्य नाही. त्याऐवजी पाणी किंवा दही घालून एखादवेळी फळांचा ज्यूस केला तर ठिक आहे. पण दूध आणि फळे एकत्र करणे अतिशय घातक असते. कोणतेही फळ हे दुधासोबत एकत्र केल्यास त्यामुळे पोट आणि पचनाशी निगडीत तक्रारी उद्भवू शकतात. म्हणून मिल्कशेक अजिबात घेऊ नये. त्यातही सकाळच्या पहिल्या आहारात म्हणजे नाश्त्याला तर मिल्कशेक अजिबात घेऊ नये. 

४. कॉर्नफ्लेक्स 

आपण किराणा सामान आणताना त्यामध्ये मोठेच्या मोठे कॉर्नफ्लेक्सचे पॅक आवर्जून आणतो. घाईच्या वेळी मुलांना द्यायला किंवा आपल्यालाही नाश्त्यामध्ये होतील म्हणून हे पॅकेटस आणली जातात. मात्र सकाळच्या वेळेत कॉर्नफ्लेक्स खाणे आरोग्यासाठी फायदेशीर नसते. 

५. पराठा 

सकाळी नाश्त्याला गरमागरम पराठा खायचा म्हटला की आपण त्यावर भरपूर तूप घेतो किंवा तो भाजताना त्यावर तेल सोडतो. मात्र वजन कमी करायचे असल्यास जास्त प्रमाणात तेल आणि तूप खाणे आरोग्यासाठी चांगले नसल्याने सकाळच्या नाश्त्याला पराठा खाणे योग्य नाही असेही आहारतज्ज्ञ सांगतात. पोटभरीचा पण तेल आणि तूप कमी असेल असा आहार सकाळी घ्यायला हवा. किंवा पराठ्यासोबत इतर काही खाल्ल्यास ते चालू शकेल. 

टॅग्स :वेट लॉस टिप्सआरोग्यआहार योजनाअन्नहेल्थ टिप्स