अमित इंगोले
वजन...वजन...वजन सोशल मीडियाच्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर गेलं तरी सगळीकडे वजन कमी (Weight Loss) करण्याच्या अमक्या टिप्स, चरबी कमी करण्याच्या टमक्या टिप्स, हे करा...ते करा...नको नको ते उपाय एक्सपर्ट्स सांगत असतात. मात्र काही अभ्यासक असंही सांगत होते, की लठ्ठपणा कमी करायचा असेल तर रोज किमान बारा हजार पाऊलं चाला, कोण म्हणतं बारा नको दहा झाले तरी फार. आता नवीन अभ्यास म्हणतात दहा कशाला सात झाले तरी पुरे. आणि काही तज्ज्ञ सांगतात की फार लठ्ठ असाल तर चालूच नका, तुमचे गुडघे कामातून जातील! म्हणजे अरे, करायचं काय? कामधंदा करु द्याल की नाही, पोट भरण्याच्या शर्यतीत ही कुठली नवीच रेस सुरु झाली? मुळात यातलं खरं नेमकं काय?
या सगळ्या गोष्टी आपल्यावर इतक्या येऊन आदळतात. इतक्या चकचकीत पॅकेजिंगमध्ये की त्यावर विश्वासही बसतो. हल्ली तसंही सोशल मीडियात जे जे येईल ते ते अनेकांना खरं वाटतं. त्यात घाई करत अनेकांना वाढलेलं वजन, लठ्ठपणा कमी करून स्लिम व्हायचं असतं, फिट दिसायचं असतं. महिलांना त्यांच्या मनासारखे कपडे घालायचे असतात किंवा सेलिब्रिटींसारखं दिसायचं असतं. पण मुळात वजन वाढलेल्या महिला असो वा पुरूष असो ते मूळ मुद्द्याकडे लक्षच देत नाहीत की चमत्कार झाल्यासारखं आपण परफेक्ट बारीक होणार नाही. विविध आणि योग्य अभ्यास, तज्ज्ञ हेच सांगतात की, जरा सबूरीने घ्या. अलिकडे वाढलेला आपला सुस्तपणा कमी करा. सतत मोबाइल, लॅपटॉप किंवा टीव्हीमध्ये डोकं घालून बसू नका. कारण याच त्या सवयी आहेत ज्यामुळे आपला लठ्ठपणा वाढतो.
बरंच वजन कमी करण्यासाठी फक्त इतकंच चाललं पाहिजे, तितकं चाललं पाहिजे हे इथेच थांबत नाही. बरेच असेही स्वयंघोषित हेल्थ एक्सपर्ट वेगवेगळे ड्रिंक पिण्याचे सल्ले देतात. मुळात ज्या गोष्टींचे ड्रिंक पिण्याचे ते सल्ले देतात, त्या गोष्टींचा आपल्या आहारात खूप आधीपासूनच समावेश असतो. या ना त्या माध्यमातून आपण या गोष्टी खात किंवा पित असतोच. मग उगाच हे वेट लॉस ड्रिंक बनवण्यात वेळ कशाला घालवायचा? आधीच लोकांकडे वेळ नाही. त्यात वरून जास्तीचा पैसाही खर्च होतो. बरं लोक काही दिवस जोर लावून चालतात, धावतात, व्यायाम करतात पण नंतर त्यांना लवकर रिझल्ट दिसत नसल्याने या गोष्टींचा कंटाळाही करतात.
आता आपल्याला असाही प्रश्न पडू शकतो की, मग वजन कमी कसं करायचं? तर मुळात हे सगळे एक्सपर्ट हेच सांगत आहेत, शारीरिक हालचाल वाढवा, अनहेल्दी फूड टाळा. या गोष्टी तर आपण आपल्या मनानेही करू शकता. आपल्या लक्षात आलं असेल की, वजन कमी करण्यासाठी किंवा चरबी कमी करण्यासाठी कॅलरी बर्न करणं हा मुख्य मुद्दा आहे. मग हे काम तर खूप ताण न घेता, तामझाम न करताही करताच येईल.
आपण काय करु शकतो?
- रोज पायी चाला, धावा, व्यायाम करा किंवा शारीरिक अॅक्टिविटी करा. या गोष्टी आपण घरातही करू शकतो. त्यासाठी बाहेर जाण्याची गरज नाही. घरात झाडझूड करून, लादी पुसून, घर आवरसावर करून जी शारीरिक हालचाल होते ती कोणत्याही हाय इंटेसिटी व्यायामापेक्षा कमी नसते. कारण यात पूर्ण शरीराचा व्यायाम होतो.
- सुस्त जीवनशैली वजन वाढण्याच्या मुख्य कारणांपैकी एक. म्हणजे काय तर तासंतास एकाच जागी बसून राहणे किंवा पडून राहणे. टीव्ही-मोबाइलवर तासंतास मालिका, सिनेमे पाहणे. या गोष्टी टाळू शकता. वजन कमी करायचं असेल तर इतकं तर कॉम्प्रमाइज करूच शकता. बरं असं नाही की, सिनेमे, मालिका बघायच्याच नाही. त्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा. घरातील कामात हातभार लावा.
- घरातील लहान मुलांसोबत तुमच्या बालपणीचे खेळ खेळा, त्यांना ते शिकवा. त्यांचे खेळ शिका. असं करून लहान मुलांच्या ज्ञानात भरही पडेल आणि तुमच्यासोबतच त्यांचाही स्क्रिन टाइम कमी होईल.
- सकाळी झोपेतून उठल्याउठल्या अतिरेक न करता अर्धा तास व्यायाम केला तरी चालतं. हलकी-फुलकी स्ट्रेचिंग असेल, एका रूममधून दुसऱ्या रूममध्ये चालत जाणं असेल या गोष्टींनी सुद्धा वजन कमी करण्यास मदत मिळते.
- सामान्य असा समज आहे की, दसरा, दिवाळी किंवा इतर कोणता सणवार आला म्हणजेच घरातील जळमटं काढायची. हे ठीक आहेच. पण हेच काम केवळ दसरा-दिवाळी पुरतं मर्यादित न ठेवता. आठवड्यातून एकदा किंवा १५ दिवसातून एकदा करू शकता. हातात झाडू घेऊन घरातील कानाकोपरा साफ केला तर यापेक्षा चांगला व्यायाम अजून काय असू शकतो.
- सगळ्यात महत्वाची बाब म्हणजे दिवसभर काम करून शारीरिक आणि मानसिक थकवा खूप वाढलेला असतो. स्ट्रेस वाढलेला असतो. या सगळ्या गोष्टी पुरेशी झोप घेतल्याशिवाय दूर होत नाहीत. ठरवून रोज रात्री ७ ते ८ तासांची झोप घ्याच. बघा काही दिवसात आपल्याला फरक दिसून येईल. रात्रीची जागरणं, व्यसनही टाळू त्यानंही ताण कमी होईल.
- खाण्या-पिण्याचा शौक असणं काही वाईट नाही. पण जर नेहमीच बाहेरचे अनहेल्दी, तेलकट, प्रोसेस्ड फूड्स, मैद्याचे पदार्थ खात असाल तर मग आपणच ठरवा वजन कमी करायचं आहे की नाही. कारण हे पदार्थ कमी केल्याशिवाय वजन कधीच कमी होऊ शकणार नाही. सकाळी व्यायाम, दिवसा आणि रात्री फास्ट फूड, जंक फूड हे म्हणजे गाढवासमोर वाचली गीता असं होईल.
मुद्दा काय, जगण्यातला अतिरेक कमी करुन साधंसोपं जगू. वजनही ताळ्यावर राहील आणि मन:शांतीही मिळेल.