वजन कमी ठेवायचे म्हणजे चविष्ट खाणे बंद करावे लागते, असा गैरसमज अनेकांचा असतो. प्रत्यक्षात योग्य पदार्थ निवडले तर आहार स्वादिष्टही राहतो आणि वजन नियंत्रणात ठेवायलाही मदत होते. असेच काही चविष्ट आणि आरोग्यदायी पदार्थ आहारात असावेत.(Delicious ways to lose weight - Eat tasty and still stay fit - fine)
१. पहिला पदार्थ म्हणजे मोड आलेली कडधान्ये. हरभरा, मूग, मटकी यांना मोड आणून त्याची उसळ, कोशिंबीर किंवा चाट केली तर ते खूप चविष्ट लागते. यात प्रथिने आणि फायबर भरपूर असते, त्यामुळे पोट लवकर भरते आणि जास्त खाण्याची इच्छा होत नाही.
२. दुसरा पदार्थ म्हणजे ताक - दही. साधे ताक किंवा जिरे, आले घालून केलेले ताक पचन सुधारते आणि पोट हलके ठेवते. ताक कमी कॅलरीचे असूनही शरीराला ताजेतवाने ठेवते, त्यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो. दही आहारात नक्की असावे.
३. मिलेट्स आरोग्यदायी आणि चविष्टही असतात. विविध पिठांचे पदार्थ आणि ज्वारी-बाजरीचे पदार्थ आहारात घ्या. या धान्यांची भाकरी, थालीपीठ किंवा डोसा हे खूप चविष्ट लागतात. मिलेट्समध्ये फायबर जास्त असल्याने पोट लवकर भरते आणि बराच वेळ भूक लागत नाही. यामुळे अनावश्यक खाणे टाळले जाते.
४. असाच आणखी एक पदार्थ ओट्स आहे. ओट्स फक्त शिजवूनच खायचे असे नाही. ओट्सचा उपमा, ओट्स डोसा किंवा भाज्यांसोबत परतलेले ओट्स खूप चविष्ट लागतात. ओट्समध्ये सोल्युबल फायबर असल्याने ते पचन हळू करते आणि वजन वाढू देत नाही.
५. डाळींचे सूप, भाज्यांचे सूप किंवा मिलेट्स घालून केलेले सूप पोटासाठी हलके आणि चविष्ट असते. जेवणाआधी सूप घेतल्यास कमी अन्नातच समाधान मिळते, त्यामुळे वजन नियंत्रणात राहते. तसेच तेल तूप काहीही न वापरताही सूप करता येते.
६. आणखी एक चविष्ट आणि मस्त पर्याय म्हणजे फर्मेंटेड पदार्थ. आंबवलेल्या पिठाचे डोसे, इडली किंवा कांजीसारखी पेये पचन सुधारतात. पचन चांगले राहिले की वजन कमी ठेवणे सोपे जाते.
