वजन कमी करताना 'ग्रीन टी' हा शब्द आपण इतक्या वेळा ऐकला आहे की, अनेकांना ते एखादे 'मॅजिकल ड्रिंक' वाटू लागले आहे. वजन कमी करायचंय? मग ग्रीन टी प्या - हा सल्ला आजकाल प्रत्येक जिम आणि डाएट प्लॅनमध्ये आवर्जून दिला जातो. अनेकांना वाटते की दिवसातून ३ ते ४ कप ग्रीन टी प्यायलो की हवं तसं वजन कमी होईल...आजकाल वजन कमी करण्यासाठी ग्रीन टी हा पर्याय अनेक जण आवर्जून निवडतात. “फक्त ग्रीन टी पिऊन वेटलॉस होऊ शकतो का?” हा प्रश्न अनेकांच्या मनात निर्माण होतो. सोशल मीडियावर ग्रीन टीचे फायदे इतके सांगितले जातात की काही जण आहार-व्यायाम बाजूला ठेवून फक्त ग्रीन टीवरच अवलंबून राहतात. पण खरंच एवढं पुरेसं आहे का? ग्रीन टी शरीरातील फॅट बर्निंग प्रक्रिया वाढवतो, मेटाबॉलिझम सुधारतो हे खरे असले तरी फक्त ग्रीन टी पिऊन वजन घटते की त्यासाठी योग्य डाएट आणि लाइफस्टाईलही तितकीच महत्त्वाची आहे, हे समजून घेणे अधिक गरजेचे आहे(can only drinking green tea help lose weight).
वजन कमी करण्यासाठी आपल्यापैकी बरेचजण आवर्जून ग्रीन टी पितात परंतु, वेटलॉस करण्यासाठी 'फक्त' ग्रीन टी पिण्यावर भर देणाऱ्यांचीही कमतरता नाही. असे लोक व्यायामाकडे दुर्लक्ष करतात किंवा आहारात इतर कोणतेही आवश्यक बदल करत नाहीत. खरोखरच फक्त ग्रीन टी (does green tea really help in weight loss) प्यायल्याने वजन कमी होण्यास मदत मिळते का? याबाबत, डॉक्टर वंदना राजपूत यांनी एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत अधिक माहिती दिली आहे.
फक्त ग्रीन टी प्यायल्याने वजन कमी होते का?
'नॅशनल सेंटर फॉर कॉम्प्लिमेंटरी अँड इंटिग्रेटिव्ह हेल्थ' (NCCIH) च्या मते, वैद्यकीय क्षेत्रात ग्रीन टीचा वापर हजारो वर्षांपासून केला जात आहे. ग्रीन टी आपली पचनशक्ती आणि चयापचय प्रक्रिया वेगवान करते, तसेच आपल्याला दिवसभर उत्साही राहण्यास मदत करते. यावर कन्सल्टंट डायटेटिक्स वंदना राजपूत सांगतात की, "वजन कमी करण्यासाठी फक्त ग्रीन टी पिणे पुरेसे नाही. यामध्ये असा कोणताही 'जादुई' घटक नसतो जो तुमच्या शरीरातील चरबी झपाट्याने जाळून टाकेल. मात्र, यामध्ये अनेक अशी पोषक तत्वे असतात जी वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत मदत करू शकतात. महत्त्वाचे म्हणजे, याचा परिणाम काही दिवसांत दिसून येत नाही." त्या पुढे स्पष्ट करतात की, "जेव्हा तुम्ही नियमित व्यायामासोबतच ग्रीन टीला तुमच्या संतुलित आहाराचा भाग बनवता, तेव्हाच वजन कमी करण्यासाठी त्याची खरी मदत मिळते."
ग्रीन टी वजन कमी करण्यास कशी मदत करते?
१. मेटाबॉलिज्मचा वेग वाढवते :- ग्रीन टी मध्ये 'कॅटेचिन' (Catechin) आणि 'कॅफिन' ही महत्त्वाची पोषक तत्वे असतात. हे घटक शरीरातील मेटाबॉलिज्म बूस्ट करतात, ज्यामुळे तुमच्या उर्जेची पातळी वाढते. जेव्हा शरीराचा मेटाबॉलिज्म रेट सुधारतो, तेव्हा वजन कमी करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते.
२. फॅट बर्निंगसाठी उपयुक्त :- ज्या लोकांचे वजन जास्त असते, त्यांच्या पोट, मांड्यांवर आणि शरीराच्या इतर भागांत मोठ्या प्रमाणात चरबी जमा झालेली असते. दररोज आणि नियमितपणे ग्रीन टी प्यायल्याने ही चरबी जाळण्यास मदत होते.खरतर, ग्रीन टी शरीरातील साठलेल्या चरबीचा वापर 'ऊर्जा' म्हणून करण्यास मदत करते. जे लोक नियमित व्यायाम करतात, त्यांच्यासाठी ही प्रक्रिया अधिक फायदेशीर ठरते, कारण व्यायामादरम्यान शरीराला लागणारी ऊर्जा या फॅट्समधून मिळण्यास मदत होते.
३. भुकेवर नियंत्रण :- ग्रीन टी पिण्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यासही मोठी मदत मिळते. खरंतर, जेव्हा आपण ग्रीन टी पितो, तेव्हा बराच वेळ काहीही खाण्याची इच्छा होत नाही. यामुळे आपण अवेळी किंवा उगाचच काहीतरी स्नॅक्स खाण्यापासून वाचता. साहजिकच कॅलरीजचे प्रमाण कमी झाल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
ग्रीन टी पिण्याची योग्य पद्धत आणि वेळ...
वेटलॉस करण्यासाठी फक्त ग्रीन टी पिणे पुरेसे नाही, तर ती योग्य पद्धतीने प्यायल्यास त्याचे जास्तीत जास्त फायदे आपल्या शरीराला मिळतात.
ग्रीन टी नेमकी कधी प्यावी ?
१. सकाळी रिकाम्या पोटी टाळा :- अनेकजण सकाळी उठल्याबरोबर रिकाम्या पोटी ग्रीन टी पितात, पण यामुळे ॲसिडिटी होऊ शकते. सकाळी नाश्त्यानंतर १ तासाने पिणे उत्तम.
२. व्यायामापूर्वी :- वर्कआउट किंवा व्यायामाच्या साधारण ३० मिनिटे आधी ग्रीन टी प्यायल्याने फॅट बर्निंग प्रक्रिया वेगवान होते.
३. जेवणानंतर :- जेवण झाल्याबरोबर लगेच ग्रीन टी पिऊ नका. जेवण आणि ग्रीन टी यामध्ये किमान ४५ ते ६० मिनिटांचे अंतर ठेवावे.
दिवसातून किती कप ग्रीन टी प्यावा ?
तज्ज्ञांच्या मते, दिवसातून २ ते ३ कप ग्रीन टी पिणे आरोग्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी पुरेसे आहे. यापेक्षा जास्त प्रमाणात ग्रीन टी प्यायल्यास त्यातील कॅफिनमुळे झोप न येणे किंवा पोटाच्या समस्या उद्भवू शकतात. ग्रीन टीचा आपल्या शरीराला व आरोग्याला संपूर्ण फायदा होण्यासाठी त्यात दूध किंवा साखर घालणे टाळावे. चवीसाठी तुम्ही त्यात लिंबाचा रस किंवा थोडे मध टाकू शकता. पाणी उकळल्यानंतर गॅस बंद करावा आणि मग त्यात ग्रीन टी बॅग किंवा पाने टाकून २ ते ३ मिनिटे झाकून ठेवावे. पाने पाण्यात टाकून जास्त वेळ उकळल्याने चहा कडू होतो आणि त्यातील पोषक तत्वे कमी होतात.
