Cumin Seeds for Belly Fat : आजकाल बरेचजण असे आहेत जे शरीरात वाढलेली चरबी आणि त्यामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी नको नको ते करतात. रोज वेगवेगळ्या गोष्टी करून झाल्यावर वजनाचा काटा जराही खाली आला नसेल तर ते निराशही होतात आणि त्यांची चिंताही वाढते.
कंबर, पोट, मांड्यांवर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी एक्सपर्ट वेगवेगळे नॅचरल उपाय सांगत असतात. यातीलच एक उपाय म्हणजे जिरे. जिऱ्याच्या मदतीनं चरबी कमी केली जाऊ शकते, असं सांगितलं जातं. पण खरंच असं होतं का? किंवा ही केवळ एक अफवा आहे? याचाच खुलासा न्यूट्रिशनिस्ट रिता जैन यांनी केला आहे.
जिऱ्याचे फायदे
जिऱ्याच्या वापर किचनमध्ये एक महत्वाचा मसाला म्हणून केला जातो. जिऱ्याशिवाय तर अनेक पदार्थ अपूर्णच राहतात. टेस्टसोबतच याचे शरीराला अनेक फायदे मिळतात. या बारीक बारीक बिया आपल्याला इतके फायदे देतात ज्याचा फारसा कुणी विचारही केला नसेल.
पचन सुधारतं
जिऱ्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे पचन सुधारतं. यानं पचनासाठी आवश्यक एंझाइम्स वाढतात, ज्यामुळे अन्न सहजपणे पचन होतं. तसेच पोट फुगणे किंवा गॅसचा त्रासही नाहीसा होतो. जर पचन चांगलं झालं तर शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि पोटाला आराम मिळतो.
सूज कमी होते
जिऱ्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे शरीरातील सूज कमी करतात. सूज वाढली तर वेगवेगळ्या आजारांचा धोका वाढतो. अशात सूज कमी करण फार महत्वाचं ठरतं.
मेटाबॉलिज्म बूस्ट होतं
जिऱ्याच्या मदतीनं शरीराचं मेटाबॉलिज्म बूस्ट होण्यास मदत मिळते. मेटाबॉलिज्मची वजन कमी करण्यास महत्वाची भूमिका असते. ही एक अशी प्रक्रिया आहे ज्या शरीर अन्नाला एनर्जीमध्ये बदलतं. मेटाबॉलिज्म बूस्ट झालं तर फॅट बर्न होण्याची प्रोसेस वेगानं होते.
चरबी कमी होते?
सगळ्यात मोठा मुद्दा म्हणजे जिऱ्यानं चरबी कमी होते का? तर मुळात जिऱ्यानं थेटपणे चरबी कमी होत नाही, पण वजन कमी करण्याच्या प्रक्रियेत यानं मदत मिळू शकते. म्हणजे वर सांगितलेले फायदे हे वजन कमी करण्यात महत्वाची भूमिका बजावतात. फक्त जिऱ्याचं पाणी पिऊन किंवा जिरे खाऊन चरबी कमी होणार नाही.
काही रिसर्चमधून असंही समोर आलं आहे की, जिऱ्याचं पाणी प्यायल्यानं शरीराची चरबी कमी होऊ शकते, खासकरून पोटाच्या आजूबाजूची. पण इथेही तोच मुद्दा आहे की, फक्त जिऱ्याचं पाणी पिऊन चमत्कार होणार नाही. एक्सपर्ट सांगतात की, वजन कमी करण्यात जिऱ्याची मदत मिळू शकते. पण त्यासाठी सोबत इतरही गोष्टी कराव्या लागतील. संतुलित आहार आणि नियमित व्यायाम या गोष्टी अधिक महत्वाच्या ठरतात.