Lokmat Sakhi >Weight Loss & Diet > मिळमिळीत पदार्थ, गिळगिळीत ओटसची छुट्टी! नाश्त्याला ओटसचे 5 टेस्टी पदार्थ खा, घटवा वजन 

मिळमिळीत पदार्थ, गिळगिळीत ओटसची छुट्टी! नाश्त्याला ओटसचे 5 टेस्टी पदार्थ खा, घटवा वजन 

वजन कमी करणारे पदार्थ बेचव, मिळमिळीत असले पाहिजे असं नाही. ते चविष्ट आणि चटपटीत असूनही वजन मात्र कमी करतात. हे पदार्थ आहेत ओटसचे .

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2021 02:36 PM2021-09-28T14:36:25+5:302021-09-28T14:43:30+5:30

वजन कमी करणारे पदार्थ बेचव, मिळमिळीत असले पाहिजे असं नाही. ते चविष्ट आणि चटपटीत असूनही वजन मात्र कमी करतात. हे पदार्थ आहेत ओटसचे .

Breakfast for weight loss : 5 delicious foods of oats in breakfast help to loose weight soon | मिळमिळीत पदार्थ, गिळगिळीत ओटसची छुट्टी! नाश्त्याला ओटसचे 5 टेस्टी पदार्थ खा, घटवा वजन 

मिळमिळीत पदार्थ, गिळगिळीत ओटसची छुट्टी! नाश्त्याला ओटसचे 5 टेस्टी पदार्थ खा, घटवा वजन 

Highlightsवजन कमी करण्यासाठी आहारात ओटसचं महत्त्व खूप वाढलय.आहार तज्ज्ञांच्या मते ओटसमुळे वेगानं शरीरावरची चरबी घटते.ओटसची चव आवडत नसली तरी त्यापासून चीला ते मॅगी असे चविष्ट, चटपटीत आणि पौष्टिक पदार्थ तयार करता येतात.

वजन कमी होण्याच्या वाटेतला मोठा अडथळा म्हणजे सारखी भूक लागते, काहीतरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. सारखं खाल्ल्यास वजन वाढीस कारणीभूत ठरणारे चटपटीत पदार्थ खाल्ल्यास वजन कमी होणं राहातं दूर उलट वाढतच राहातं. यावर उपाय काय? असा प्रश्न पडतो. यावर उपाय सोपा आहे सारखी भूक लागणार नाही असे पदार्थ नाश्त्याला खावेत. जे पोट भरपूर वेळ भरलेलं ठेवतील आणि वजन कमी करण्यास उपयोगी ठरतील. आणि दुसरं म्हणजे वजन कमी करणारे पदार्थ बेचव, मिळमिळीत असले पाहिजे असं नाही. ते चविष्ट आणि चटपटीत असूनही वजन मात्र कमी करतात. हे पदार्थ आहेत ओटसचे .

गेल्या काही वर्षांपासन वजन कमी करण्यासाठी आहारात ओटसचं महत्त्व खूप वाढलंय. आरोग्य तज्ज्ञ आणि आहार तज्ज्ञांच्या मते ओटसमुळे वेगानं शरीरावरची चरबी घटते. पण अनेकांना ओटसची चव आवडत नाही. पण हेच ओटस चविष्ट आणि चटपटीत करुनही ते वजन वाढीसाठी तेवढेच परिणामकारक ठरतात. ओटसचा चीला, बिस्किटं, ओटसची मॅगी आणि बर्गर या स्वरुपात ओटस खाल्ल्यास ते चविष्ट तर लागतातच शिवाय आपल्या वेटलॉसच्या प्रयत्नांना मदतही करतात. ओटसचे हे चटपटीत पदार्थ तयार करणं खूपच सोपं आहे.

Image: Google

ओटसचा चीला

ओटसचा चीला म्हणजे ओटसचे धिरडे. ते करण्यासाठी 2 कप ओटसचं पीठ, 2 चमचे रवा, एक चिरलेला कांदा, एक एक लाल आणि हिरवी शिमला मिरची चिरलेली, पुदिन्याची पानं, कोथिंबीर, चार ते पाच लसणाच्या कळ्या बारीक कापलेल्या, 1/2 बारीक चिरलेली हिरवी मिरची, तेल, दही किंवा ताक, मीठ, किंचित हळद आणि कोमट पाणी एवढं साहित्य घ्यावं.

एका भांड्यात ओटसची पीठ, रवा, दही किंवा ताक, मीठ, भाज्या, पुदिना, कोथिंबीर, लसूण, हळ्द, मिरची आणि कोमट पाणी एकत्र करुन त्याचं घट्टसर मिश्रण तयार करावं. हे मिर्शण चांगलं ढवळून घेतलं की ते 20 मिनिटं बाजूला ठेवून द्यावं.
तेवढ्या वेळात ओटसचं पीठ आणि रवा पाणी शोषून घेतं. पाणी शोषलं गेलं की चीला करण्यासाठी मिश्रण तयार आहे असं समजावं. गॅसवर नॉन स्टीक पॅग गरम करुन त्याला थोडं तेल लावून घ्यावं. खोलगट डावानं ओटसचं हे मिश्रण तव्यावर घालावं आणि डावाच्या तळानं हळूवार गोल पसरवावं. चिल्याच्या मध्यभागी थालिपीठासारखं बोटानं गोल छिद्र करावं. चीला हा कुरकुरीत होण्यासाठी तेल किंवा बटर घालावं. चीला दोन्ही बाजूंनी छान लालसर व्हायला हवा.

ओटसची खीर

ओटसची खीर करण्यासाठी एक कप ओटस, अर्धा लिटर दूध, सुका मेवा, साखर आणि फळं घ्यावीत.
ओटसची खीर करताना कढईत ओटस चांगले भाजून घ्यावेत. दुसर्‍या भांड्यात दूध गरम करावं. दूध गरम झालं की त्यात साखा घालावी. नंतर लगेच भाजलेले ओटस घालावेत आणि मिश्रण ढवळत राहावं. मिश्रण दाटसर झालं की त्यात काजू, खजूर, बदामाचे काप घालावेत. शेवटी वेलची पावडर घालावी. खीर चांगली ढवळत राहावी. या खीरीची चव वाढवण्यासाठी केळ , आंबा ही फळं चिरुन घालता येतात.

Image: Google

ओटमीलची बिस्किटं

एरवी वजन कमी करताना बिस्किटं, नानखटाई हे पदार्थ खाऊ नये असं म्हटलं जातं पण ओटसची बिस्किटं ही वजन कमी करण्यासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे ती खाण्याचा सल्ला दिला जातो.
ओटमीलची बिस्किटं करण्यासाठी 3 कप ओटस, 2 चमचे दालचिनी पावडर, 2 अंडे, 2 कप लोणी, 1 कप ब्राउन शुगर, 1 कप नेहेमी वापरतो ती साखर, 1 छोटा चमचा बेकिंग सोडा, 1 छोटा चमचा मीठ, अर्धा कप मैदा, 1 कप मिक्सरमधून बारीक केलेले ओटस आणि व्हॅनिला एक्सट्रॅक्ट एवढं साहित्य घ्यावं.

बिस्किटं करताना एका मोठ्या भांड्यात लोणी, ब्राउन शुगर, साखर, दालचिनी पावडर, व्हॅनिला अर्क आणि अंड हळूहळु फेटावं. दोन्ही अंडे एकदम न घालता एक एक करुन घालावे. त्यानंतर त्यात मिक्सरमधून बारीक केलेले ओटस, मैदा, बेकिंग सोडा , मीठ या सर्व गोष्टी एक एक करुन घालाव्यात आणि हळुवार एकर कराव्यात. सगळ्यात शेवटी त्यात ओटस घालावेत. ओटस घातल्यानंतर मिश्रण हळुवार पण चांगलं फेटून घ्यावं. नंतर चमच्याच्या सहाय्यानं ते बेकिंग ट्रेवर घालावं. दोन बिस्किटांमधे कमीत कमी दोन इंचाचं अंतर ठेवावं. आधी ओवन प्री हीट करुन घ्यावा. नंतर 170 डिग्री सेल्सिअस तापमानावर ओवन सेट करुन त्यात हा बेकिंग ट्रे ठेवावा. आणि किमान 10 मिनिटं बिस्किटं भाजून घ्यावीत.

Image: Google

ओटस बर्गर

बर्गरसारखा पदार्थ ओटसच्यामुळे आरोग्यदायी स्वरुपात मिळणार असेल तर ना कोणाची असेल. ओटस बर्गर करण्यासाठी दोन ओटसच्या चकत्या, 4-5 लेट्यूसची पानं, 1 कापलेला टमाटा आणि कांद, किसलेलं पनीर, टमाटा केचप, बारीक चिरलेल्या मिरच्या, लोणी किंवा बटर, 2 बर्गर बन्स आणि थोडा लिंबाचा रस घ्यावा.

बर्गर करताना आधी बर्गर बन्स मध्यभागी चाकूने कापावे. बन्सला बटर लावून ते तव्यावर शेकून घ्यावेत. एका छोटया भांड्यात केचप, मिरची, लिंबू रस घालून त्याची पेस्ट तयार करावी. ही पेस्ट बन्सच्या शेकलेल्या भागावर पसरुन लावावी. नंतर त्यावर सलाडची पानं ठेवावी आणि त्यावर 1 किंवा 2 ओटस टिक्की ठेवावी.    ( बर्गरसाठी ओटस टिक्की आधी बनवून् घ्यावी.  त्यासाठी  कढईत 1 चमचा तेल टाकून ते गरम करावं.  त्यात किसलेलं आलं घालावं. एक बारीक चिरलेला कांदा  घालावा,तो परतल्यावर त्यात बारीक चिरलेली कोबी, गाजर घालावं. ते चांगलं परतून् घ्यावं. तीन चार मिनिटं ते शिजू द्यावं. नंतर त्यात दोन कप पाणी घालून ते उकळावं. पाणी उकळलं की त्यात नूडल्स मसाला घालावा. त्यात 1 कप ओटस घालावेत. ओटस घातल्यावर मिश्रणातलं पाणी सुकू द्यावं. ते सुकलं की गॅस बंद करावा. मिश्रण गार होवू द्यावं. ते गार झालं की हाताला तेल लावून मिश्रणाचा गोळा घेवून् त्याला टिक्कीसारखा गोल आकार द्यावा. ) त्यावर  गोल चिरलेला टमाटा आणि कांदा चकती ठेवावी. त्यावर किसलेलं पनीर घालावं. वरुन अजून लेट्यूसची पानं ठेवावीत. बन्सचा दुसरा भाग यावर ठेवावा. वरुन पुन्हा मिरचीचे तुकडे आणि किसलेलं पनीर घातलं की पौष्टिक बर्गर तयार होतं.

ओटसची मॅगी

मॅगी म्हटलं की तोंडाला पाणी सुटतं. पण वजन कमी करताना मॅगीसारखे पदार्थ मन मारुन सोडावे लागतात. पण ओटस असतील तर मॅगीच्या चवीची ओटसची मॅगी सहज करुन पोटभर खाता येते. ही मॅगी करण्यासाठी 1 कप ओटस, अडीच कप पाणी, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, 1 चमचा गरम मसाला , अर्धा चमचा आमचूर पावडर, अर्धा चमचा धने पावडर, मॅगी मसाला पावडर थोडं किसलेलं पनीर, आपल्या आवडीच्या भाज्या आणि तेल घ्यावं.

ओटसची मॅगी करताना एका मोठ्या भांड्यात पाणी उकळावं. पाणी उकळलं की मॅगी मसाला आणि इतर मसाले त्यात घालावेत. आणखी एक कढई घेऊन त्यात थोडं तेल घालावं. त्यात तेल गरम करावं. तेल गरम झालं की त्यात हिरवी मिरची आणि इतर भाज्या घालून हलक्या परतून घ्याव्यात. परतलेल्या भाज्या बाजूला ठेवाव्यात. मसाले घातलेलं पाणी उकळायला लागलं की त्यात ओटस घालावेत. मिश्रण दाटसर होवू द्यावं. हे मिश्रण सारखं ढवळत राहायला हवं. ओटस शिजले की त्यात परतलेल्या भाज्या घालाव्यात आणि वरुन थोडं किसलेलं पनीर घातलं की ओटसची चविष्ट मॅगी तयार होते.

Web Title: Breakfast for weight loss : 5 delicious foods of oats in breakfast help to loose weight soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.