Join us

Ranya Rao : १४ किलो सोनं चलाखीने शरीरात लपवून आणणारी रान्या राव आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2025 18:19 IST

Ranya Rao : रान्या राव हिला दुबईहून १४.२ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी  बंगळुरू येथे अटक करण्यात आली आहे

कन्नड चित्रपटातील अभिनेत्री रान्या राव हिला दुबईहून १४.२ किलो सोन्याची तस्करी केल्याप्रकरणी  बंगळुरू येथे अटक करण्यात आली आहे. जप्त केलेल्या सोन्याची किंमत तब्बल १२.५६ कोटींपेक्षा जास्त असल्याचं सांगितलं जात आहे. रान्या रावला महसूल गुप्तचर विभागाने अटक केली. या कारवाईनंतर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DRI) अधिकाऱ्यांनी रान्याच्या लावेल रोड येथील घरावर छापा टाकला, जिथे ती तिच्या पतीसोबत राहते. छाप्यादरम्यान अभिनेत्रीच्या घरातून २ कोटी रुपयांची रोकड आणि २.०६ कोटींचं सोनं जप्त करण्यात आलं.

कोण आहे रान्या राव?

३१ वर्षीय रान्या ही कर्नाटकातील चिकमंगलूरची रहिवासी आहे. तिने बंगळुरूच्या दयानंद सागर कॉलेजमधून इंजिनिअरिंगचं  शिक्षण घेतलं. पण तिला चित्रपटसृष्टीत रस होता. म्हणूनच तिने किशोर नमित कपूर एक्टिंग इन्स्टिट्यूटमधून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि चित्रपटांमध्ये पाऊल ठेवलं. रान्या रावने २०१४ मध्ये 'माणिक्य' या कन्नड चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन सुदीप यांनी केलं होतं, ज्यांनी स्वतः त्यात मुख्य भूमिका साकारली होती. 

कन्नड आणि तमिळ चित्रपटात केलं आहे काम

रान्या रावने पदार्पणानंतर २०१६ मध्ये 'वाघा' या तमिळ चित्रपटात काम केलं. ज्यामध्ये तिने विक्रम प्रभू यांच्यासोबत मुख्य भूमिका साकारली होती. त्यानंतर २०१७ मध्ये ती 'पटकी' या कन्नड चित्रपटात दिसली. तो एक विनोदी चित्रपट होता. या चित्रपटात अभिनेत्रीने पत्रकार संगिताची भूमिका साकारली होती. आता अटक केल्यामुळे रान्या पुन्हा एकदा जोरदार चर्चेत आली आहे. 

रान्या रावने सोनं चलाखीने तिच्या शरीरावर परिधान केलं होतं. तसेच तिच्या कपड्यांमध्ये सोन्याचे बारही लपविण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे रान्या ही आयपीएस रामचंद्र राव यांची मुलगी आहे, ते कर्नाटक पोलिसांच्या डीजीपी हाऊसिंग कॉर्पोरेशनमध्ये कार्यरत आहेत. यामुळे रान्याला अन्य कोणत्या सरकारी संस्थांकडून मदत मिळत होती का? याचीही तपासणी केली जात आहे. 

टॅग्स :सोशल व्हायरलगुन्हेगारीसोनं