Kitchen Tips : शरीर जर निरोगी असेल तर सगळं चांगलं होतं आणि निरोगी राहण्यासाठी योग्य आहार, व्यायाम या गोष्टी खूप महत्वाच्या असतात. मात्र, केवळ योग्य किंवा पौष्टिक आहार घेतल्यानं किंवा व्यायाम केल्यानं निरोगी राहता येतं असं काही नाहीये. यासाठी आणखीही काही बारीकसारीक गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं. जसे की, योग्य पद्धतीनं खाणं.
इतकंच नाही तर आपण जे खातोय ते कशात शिजवतो हे महत्वाचं. जर योग्य पद्धतीने अन्न शिजवलं नाही तर कदाचित त्याचे फायदे मिळण्याऐवजी नुकसानही होऊ शकतात. स्वयंपाक करण्यासाठी भांडी कोणती वापरता ही बाब सुद्धा निरोगी राहण्यासाठी खूप महत्वाची ठरते.
आजच्या मॉडर्न जमान्यात भरपूर घरांमध्ये नॉनस्टिक भांड्यांचा वापर केला जातो. एकतर ही भांडी जास्त खराब होत नाहीत आणि दिसायलाही चांगली दिसतात. पण अनेक हेल्थ एक्सपर्ट ही भांडी आरोग्यासाठी चांगली मानत नाहीत. अशात कोणतीही भांडी स्वयंपाकासाठी चांगली ठरतात आणि कोणती घातक हे पाहुयात.
हेल्थ कोच रयान फर्नांडो यांनी एका व्हिडिओत सांगितलं की, रोज वापरल्या जाणाऱ्या भांड्यांचा आपल्या आरोग्यावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव पडतो. योग्य भांडी निवडणं आपल्या मेटाबॉलिक आणि गट हेल्थसाटी खूप महत्वाचं ठरतं.
कास्ट आयर्न
रयान फर्नांडो सांगतात की, स्वयंपाक करण्यासाठी कास्ट आयर्नच्या कुकवेअरचा वापर करू शकता. या भांड्यांमध्ये आपण चपात्या, भाजी, कमी आसेवर शिजणाऱ्या गोष्टी यात बनवू शकतो. या भांड्यात अन्न शिजवल्यास स्वाभाविकपणे आयर्नचं प्रमाण वाढतं. तर या भांड्यात आंबट जसे की, टोमॅटो किंवा चिंचेचे पदार्थ करणं टाळलं पाहिजे.
स्टेनलेस स्टील
स्टेनलेस स्टीलची भांड आरोग्य आणि फूड्स दोन्हीसाठी चांगली ठरतात. काही शिजवण्यासाठी, डाळी, भाज्या करण्यासाठी या भांड्यांचा वापर योग्य ठरतो. पण ही भांडी रिकामी जास्त गरम करणं टाळलं पाहिजे. स्टेनलेस स्टीलच्या फायद्यांबाबत सांगायचं तर हे नॉन-रिअॅक्टिव, टिकाऊ, आंबट गोष्टींसाठी फायदेशीर असतात.
मातीची भांडी
स्टेनलेस स्टीलशिवाय मातीची भांडीही स्वयंपाकासाठी खूप चांगली असतात. पूर्वी लोक केवळ मातीची भांडी वापरत होते. पण अलिकडे हे प्रमाण कमी झालंय. मात्र, या भांड्यामध्ये स्वयंपाक केल्यास एक वेगळीच टेस्ट लागते. बिर्याणी, खिचडी, डाळी आणि पाणी ठेवण्यासाठी यांचा वापर करता येतो. या भांड्यांमध्ये कमी आसेवरच स्वयंपाक केला पाहिजे.
तांबे आणि पितळ
तांबे आणि पितळीची भांडी सुद्धा स्वयंपाकासाठी चांगली मानली जातात. पण या भांड्यांमध्ये गरम, आंबट, फर्मेंटेड पदार्थ बनवणं टाळलं पाहिजे. पाणी स्टोर करण्यासाठी तांब्याची, सलाद, ड्राय मिक्सिंगसाठी पितळीची भांडी वापरता येतील. तांब्याच्या भांड्यातील पाणी प्यायल्याने इम्यूनिटी वाढते. पण यांचा जास्तही वापर करू नये.
कोणती भांडी टाळावी?
रयान फर्नांडो सांगतात की, काही शिजवण्यासाठी किंवा गरम करण्यासाठी अॅल्युमिनिअम (Aluminium) आणि नॉन-स्टिक (Non-Stick) या भांड्यांचा वापर करू नये. अॅल्युमिनिअम आंबट पदार्थांमध्ये मिक्स होतं, ज्याचा संबंध न्यूरोटॉक्सिसिटीशी आहे. तेच नॉन-स्टिक भांडी 260°C तापमानावर विषारी तत्व रिलीज करू शकतात. जर त्यांचं कोटिंग निघालं तर ते घातक ठरतं.