लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट असते. प्रत्येक जण आपल्या लग्नासाठी खूप उत्सूक असतो. साधारणपणे प्रत्येक वधू-वर त्यांच्या आयुष्यातील या अविस्मरणीय क्षणासाठी खास पेहराव करतात. नवरदेव शेरवानी किंवा सूटमध्ये असतो, तर नवरी छानशी साडी किंवा लेहेंगा परिधान करते. अशातच एका लग्नाची तुफान चर्चा रंगली आहे.
आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यात नुकताच एक असा विवाहसोहळा पार पडला, ज्याने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कोळुकुला येथील शिवा गंगाराजू आणि नंदिनी यांनी लग्नाची ही पारंपरिक संकल्पना पूर्णपणे बदलून टाकली. शिवा आणि नंदिनी यांच्या कुटुंबात पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही प्रथा अत्यंत दुर्मिळ आहे. याच प्रथेनुसार नवरदेव शिवा याने वधूचा पेहराव करत साडी नेसली, तर नवरी नंदिनीने नवरदेवाचा पेहराव करत शेरवानी परिधान केली.
आगळ्या-वेगळ्या वेशातच या जोडप्याने लग्नाच्या सर्व विधींमध्ये सहभाग घेतला. वधू-वरांची आप्तेष्ट आणि मित्रांसह संपूर्ण गावात मिरवणूक काढण्यात आली. मंदिरांमध्ये जाऊन देवतांचे दर्शन घेतलं आणि पारंपरिक पद्धतीने सर्व विधी पार पाडले. हे दृश्य पाहून स्थानिक रहिवाशांनी मोठं आश्चर्य व्यक्त केलं. “अशी प्रथा आम्ही यापूर्वी कधीही पाहिलेली नाही,” असे अनेक ग्रामस्थांनी म्हटलं आहे.
भारतीय संस्कृतीत प्रत्येक प्रांतानुसार आणि कुटुंबानुसार विविध चालीरीती व परंपरा आहेत. पण या विवाहसोहळ्याने आंध्र प्रदेशातील रीतिरिवाजांची विविधता पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. या आगळ्यावेगळ्या आणि लक्षवेधी लग्नामुळे आता या जोडप्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. हे जोडपं तुफान व्हायरल होत आहे.
