हिमाचल प्रदेशमध्ये सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे जनजीवन मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झालं आहे. ढगफुटी, भूस्खलन आणि अचानक आलेल्या पुरामुळे अनेक भागात प्रचंड विनाश झाला. मंडी जिल्ह्यात ढगफुटीच्या घटनेनंतर अनेक लोक बेपत्ता झाले. मुसळधार पावसामुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला. एकीकडे राज्यातील परिस्थिती तणावपूर्ण आहे, तर दुसरीकडे माणुसकी दाखवणाऱ्या एका हृदयस्पर्शी व्हिडीओने सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकली आहेत.
मंडी जिल्ह्यातील थुनाग भागातील एका घटनेची चर्चा रंगली आहे. हॉर्टिकल्चर अँड फॉरेस्ट्री कॉलेजची गर्भवती शिक्षिका पुरामुळे कॉलेज कॅम्पसमध्ये अडकली होती. अशातच ना रुग्णवाहिका मिळाली ना हेलिकॉप्टर, रस्ते बंद होते आणि आपत्कालीन सेवा तिथे पोहोचू शकल्या नाहीत. अशा परिस्थितीत कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अद्भुत शक्कल लढवली. त्यांनी लाकडापासून खुर्चीसारखी रचना असलेली एक तात्पुरती पालखी बनवली आणि या शिक्षिकेला घेऊन ११ किलोमीटर चालत सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं.
कॉलेजचे विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून हे कौतुकास्पद काम केलं. २ जुलै रोजी जेव्हा परिस्थिती आणखी गंभीर बनली आणि वेळेवर कोणतीही सरकारी मदत पोहोचू शकली नाही, तेव्हा या तरुणांनी स्वतः जबाबदारी घेतली. त्यांनी अरुंद डोंगरी रस्ते, वाहणारे ओढे आणि निसरडे रस्ते ओलांडत थुनाग ते बागस्यद हा आव्हानात्मक प्रवास केला.
चंदीगडच्या इन्स्टाग्राम पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता, ज्यानंतर आता तो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. "हिमाचल प्रदेशचे खरे हिरो. ढगफुटीनंतर कॉलेजमधील विद्यार्थ्यांनी त्यांच्या गर्भवती प्रोफेसरला ११ किलोमीटर अंतर पार करून सुरक्षित ठिकाणी पोहोचवलं" असं व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. या व्हिडिओने नेटकऱ्यांची मनं जिंकली.