जम्मूच्या कठुआमधील एका ९० वर्षीय आजीचा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या आपली 'मारुती अल्टो' कार अत्यंत आत्मविश्वासाने चालवताना दिसत आहेत. गजबजलेल्या रस्त्यावर ज्या सहजतेने त्या वळण घेतात आणि ट्रॅफिकमध्ये गाडी चालवतात, ते पाहून लोक थक्क झाले आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर ना भीती दिसते, ना कोणताही संकोच.
हा खास क्षण बाईक रायडर विशाल ललोत्रा याने आपल्या कॅमेऱ्यात टिपला आहे. त्याने रस्त्यावर आजींना ड्रायव्हिंग करताना पाहिलं आणि तो त्यांच्या कौशल्याने प्रभावित झाला. व्हिडिओमध्ये तो त्यांना प्रेमाने ‘दादी’ म्हणून हाक मारतो. क्लिपच्या सुरुवातीला आजी ट्रॅफिकमध्ये अतिशय आरामात गाडी वळवताना दिसतात, ज्यावरून त्यांना रस्त्याचा दांडगा अनुभव असल्याचं स्पष्ट होतं.
उत्सुकता वाढल्यामुळे विशाल त्यांच्या कठुआ येथील घरी पोहोचला. तिथे त्याने आजींची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत एक छोटी ड्राईव्हही केली. संवादादरम्यान आजींनी सांगितलं की, त्यांचे वय ९० वर्षांपेक्षा जास्त आहे. ड्रायव्हिंगमुळे त्यांना आनंद आणि आत्मविश्वास मिळतो असंही त्यांनी नमूद केलं. त्यांच्यासाठी हा केवळ प्रवास नसून स्वातंत्र्याचा अनुभव आहे.
व्हिडिओमधील एक क्षण लोकांना विशेष भावला. जेव्हा आजी रस्त्यावरून गाडी चालवत होत्या, तेव्हा एका स्कूटीस्वाराने त्यांना पाहताच सन्मानाने रस्ता मोकळा करून दिला. हे दृश्य पाहून सोशल मीडिया युजर्सनी त्यांचं भरभरून कौतुक केलं आहे. अनेकांनी लिहिलं की, "आजी वयाची व्याख्या बदलत आहेत", तर काहींनी त्यांना ‘अनस्टॉपेबल आजी’ असं म्हटलं आहे.
अनेकदा समाजात वृद्धांना मर्यादित भूमिकेत पाहिलं जातं. परंतु कठुआच्या या आजी सिद्ध करत आहेत की, जिद्द आणि धैर्याला वयाचं बंधन नसतं. त्यांचा आत्मविश्वास हाच संदेश देतो की, जर मन खंबीर असेल तर वय हा केवळ एक आकडा आहे. आजींचं स्टिअरिंग धरून हसणं, ट्रॅफिकमध्ये शांत राहणं आणि आपलं स्वातंत्र्य आनंदाने जगणं या सर्व गोष्टी त्यांना खास बनवतात.
