भारत विविध क्षेत्रांमध्ये सध्या उत्कृष्ट कामगिरी करत आहे. कला, क्रीडा, व्यवसाय, बौद्धिक, शैक्षणिक सगळ्या क्षेत्रातील दिग्गज भारताची मान सतत उंचावत असतात. एखाद्या परदेशी माणसाला भारताबद्दल काय आवडतं असं विचारल्यास शक्यतो उत्तर खाद्यपदार्थ असेच असते. (South Indian chef wins the James Beard Award 2025, Vijaykumar no known as best chef in New York, proud moment for India)जगभरात सगळीकडेच भारतीय अन्न पदार्थ फार आवडीने खाल्ले जातात. सध्या मात्र अन्न पदार्थापेक्षा ते तयार करणाऱ्या हातांचे कौतुक जास्त होताना दिसते. या कौतुकाचे कारणही तितकेच खास आहे. तमिळनाडूतील शेफ विजयकुमार यांनी न्यूयॉर्कमधील एक प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळला आहे. शेफ विजयकुमार यांनी 'जेम्स बियर्ड २०२५ - न्यूयॉर्कमधील सर्वोत्तम शेफ' ही उपाधी मिळवली आहे. अमेरिकेतील खाद्य जगातील ऑस्कर म्हणून हा पुरस्कार ओळखला जातो. विजयकुमारांचे हे यश फक्त भारतात नाही तर जगभरातून गौरवले जात आहे.
भारतीय लोक मोठ्या व्यासपीठांवर जाऊन इंग्रजीत बोलायला घाबरतात. भाषेची शैली, बोलायची पद्धत, उच्चार आपले वेगळे असल्याने लोकं हसतील किंवा सोशल मिडियावर खिल्ली उडवली जाईल या भीतीने अनेक जण इंग्रजीत संवाद साधणे टाळतात. मात्र विजयकुमारांचे भाषण ऐकल्यावर, आपल्या शब्दांमागील भावना महत्त्वाच्या असतात, शब्दांची फेक नाही हा विश्वास नक्कीच सगळ्यांमध्ये निर्माण होईल. त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ सध्या जोरदार व्हायरल होत आहे.
मातृभूमी आणि स्वत:च्या स्वप्नांबद्दल भावनिक भाषण देत शेफनी तामिळनाडू तसेच भारतीय खाद्यसंस्कृतीचे कौतुक केले. वर्णभेदाच्या जगात तामिळनाडूमधील लहान गावातून आलेल्या सावळ्या मुलाला कधी एवढा मान मिळेल असे वाटले नव्हते, असे सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणी आले. मात्र तरी भाषण न थांबवता त्यांनी इतर सगळ्या कष्टाळू व्यक्तींना उपदेश केला. तुम्हीही अशा मोठ्या व्यासपीठावर उभे राहण्यास पात्र आहात हे लक्षात ठेऊन काम करा. मोठी स्वप्न पाहा, असे शेफनी म्हणताच त्या वाक्यासाठी टाळ्याचा वर्षाव झाला.
अगदी काही मिनिटांचे हे भाषण लोकांच्या मनाला भावले. भारतीयच नाही तर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या सगळ्यांनी मनापासून कौतुक केले. नेटकऱ्यांनी सोशल मिडियावर बऱ्याच कमेंट्स केल्या. काही जण म्हणतात, एकीकडे भारतीय पदार्थांना नाव ठेवणारे आहेत तर दुसरीकडे आपल्या भारतीय शेफना मोठ्या पुरस्कारांनी सन्मानित केले जाते. तसेच काही जणांनी शेफ विजयकुमार सारख्या प्रतिभावान भारतीयांना प्रसिद्धी मिळत नाही याची खंत व्यक्त केली. मात्र आता शेफ विजयकुमार सगळ्याच्या लक्षात राहतील अशी आशाही अनेकांनी आहे.