चालणे हा शरीरासाठी उत्तम व्यायाम आहे हे आपण जाणतोच. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर चालणे ही थेरेपी आहे. ज्यामुळे मनातल्या विचारांचा निचरा होतो, राग शांत होतो, भावनांना दिशा मिळते आणि मन शांत होते. त्यामुळे राग येतो तेव्हा कोणी 'चालते व्हा' म्हटले तर रागावू नका, सिरियसली तिथून निघा आणि चालायला जा. मात्र चालावे कुठपर्यंत? तर राग निवळेपर्यंत! परंतु, एखाद्याचा राग लवकर शांत होणारा नसेल तर???
२०२० च्या अखेरीस अशीच एक घटना घडली इटलीमध्ये! तो कोव्हीडचा काळ होता. जगभर लॉकडाऊन लागले होते. त्यातच तो पहिला टप्पा असल्यामुळे सगळीकडेच कडक नियम पाळले जात होते. सगळे जण २४ तास घरी म्हटल्यावर भांड्याला भांडं आणि डोक्याला डोकं आपटले नसते तरंच नवल! इटलीत राहणार्या एका ४८ वर्षांच्या माणसाने मात्र तेव्हा इतिहास रचला!
बायकोशी भांडण झाल्यावर हा पठ्ठ्या रागाच्या भरात घरातून निघाला, तो विचार करत, आतल्या आत धुमसत, मनातल्या मनात कुढत एक-दोन नाही तर तब्ब्ल ४५० किलोमीटर चालत गेला. कुठे जायचे, कोणाला भेटायचे, आता वेळ काय, घरी कधी परतायचे यापैकी कसलाही विचार त्याने केला नव्हता. वाट फुटेल तिथे तो निघाला. हातात सामान नाही, की रिकामी पिशवी नाही! तोंडाला मास्क लावून तो जे निघाला ते इटलीची हद्द संपेपर्यंत चालत गेला. उत्तरेकडील कोमो शहरात तो राहत होता आणि चालत चालत समुद्रकिनारी असलेल्या फानो शहरापर्यंत जाऊन पोहोचला. तेव्हा मध्यरात्रीचे २ वाजले होते. वाटेत कोणी त्याला खायला दिले, कोणी रात्री झोपण्यासाठी अंथरूण-पांघरूण दिले. तो यंत्रवत त्या गोष्टी स्वीकारून इटलीच्या सीमेपर्यंत जाऊन पोहोचला.
वाटेत अनेक पोलिसांनी त्याला पाहिले, पण त्याच्या चेहऱ्यावरून त्याची विमनस्क अवस्था स्पष्ट दिसत होती. घराबाहेर पडायचे नाही हे सांगूनही तो बाहेर पडला हा एक नियम वगळता त्याच्याकडून अन्य कोणताही नियमभंग झाला नव्हता. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याला अडवले नाही.
मात्र, रागाच्या भरात घराबाहेर पडलेला नवरा अजून घरी कसा आला नाही, या काळजीत त्याच्या बायकोने स्थानिक पोलिसांकडे तक्रार नोंदवली. सगळ्या पोलीस स्थानकात खबर पोहोचली. इटलीच्या सीमेवरील पोलीस रक्षकांनीही ती खबर आणि आलेल्या माणसाला ताडून पाहिले आणि ही तीच व्यक्ती आहे याची खात्री पटल्यावर त्याला शांत करून घरी पाठवून दिले. मात्र तेव्हा लॉकडाऊन काळात एवढी मोठी रपेट मारल्याचा €४०० युरोचा भुर्दंड भरावा लागला.
राग शांत झाल्यावर त्याला आपण केलेला पराक्रम लक्षात आला, सोशल मीडियावर तो रातोरात प्रसिद्ध झाला. लोक त्याला 'इटलीचा फॉरेस्ट गंप' म्हणून ओळखू लागले. फॉरेस्ट गंप नावाचा एक प्रसिद्ध चित्रपट आहे. त्याचे कथानक पुन्हा केव्हा तरी! तूर्तास... रागाच्या भरात निघालेल्या या अवलियाचे कौतुक करावे तेवढे थोडे. आपण जर त्याचा आदर्श घेतला तर मनाने शांत होऊ आणि शरीरानेही फिट होऊ! पण ४५० जरा जास्तच झालं बरं का!