Join us
Daily Top 2Weekly Top 5

कष्टाचं फळ! २६ व्या वर्षी रोज १८ तासांची ड्युटी करून तरुणीने घेतलं तब्बल ७ कोटींचं घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2025 15:10 IST

कुटुंबाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता तब्बल ७ कोटी रुपयांचं घर खरेदी केलं आहे.

सिंगापूरमधील एक २६ वर्षांची तरुणी सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनली आहे. कारण तिने कुटुंबाकडून कोणतीही आर्थिक मदत न घेता तब्बल ७ कोटी रुपयांचं घर खरेदी केलं आहे. क्रिस असं या तरुणीचे नाव असून ती 'फुल टाइम प्रोड्युसर' आणि 'कंटेंट क्रिएटर' म्हणून काम करते. २० डिसेंबर रोजी तिने टिक टॉकवर ही माहिती शेअर केली, ज्याला तिने आपल्या जीवनातील स्वप्न पूर्ण झाल्यासारखं म्हटलं आहे.

क्रिसने सांगितलं की, घराची चावी मिळेपर्यंत तिने घर खरेदी करण्याबाबत आपल्या कुटुंबाला काहीही सांगितलं नव्हतं. २७ व्या वर्षाआधी स्वतःचं घर असावं अशी तिची नेहमीच इच्छा होती. २०२५ च्या अखेरीस तिने हे स्वप्न पूर्ण केलं आणि तेही पूर्णपणे स्वतःच्या कमाईतून. या घराची किंमत साधारणपणे १ मिलियन सिंगापूर डॉलर्स असल्याचं सांगितलं जात आहे. विशेष म्हणजे क्रिसने जवळपास २.४ लाख सिंगापूर डॉलर्सचं डाऊन पेमेंट पूर्णपणे रोख दिलं. तिने कोणत्याही कर्जावर किंवा कौटुंबिक मदतीवर अवलंबून न राहता सर्व काही आपल्या सेव्हिंगमधून केलं.

एका मुलाखतीत क्रिसने सांगितलं की, ती दररोज १२ ते १८ तास काम करते आणि आठवड्याचे सातही दिवस तिचा हाच नित्यक्रम असतो. फुल टाइम नोकरीव्यतिरिक्त ती फोटो आणि व्हिडिओ प्रोडक्शनचे फ्रीलान्स प्रोजेक्ट्स देखील करते. तिने गमतीने म्हटले की, ती जिममध्ये वर्कआउट करतानाही काम करत असते. क्रिसने अवघ्या १४ व्या वर्षापासून कामाला सुरुवात केली होती आणि १९ व्या वर्षी गुंतवणुकीची सवय लावून घेतली होती.

आपल्या या यशाचे श्रेय ती लवकर केलेली सुरुवात, कडक शिस्त आणि आर्थिक सुरक्षिततेची तीव्र इच्छा यांना देतं. ती प्रत्येक खर्चाचा हिशोब ठेवते आणि पैसे वाचवण्यासाठी अगदी स्वस्त जेवणावरही अवलंबून राहते. आत्मनिर्भर होण्याचे शिक्षण आपल्याला आपल्या आईने दिले असल्याचे क्रिस सांगते. सिंगापूरसारख्या देशात स्वतःचं घर असणं तिला सुरक्षितता आणि स्थिरतेची जाणीव करून देतं. तिच्या मते ही केवळ एक मालमत्ता नसून मेहनत, संयम आणि स्वातंत्र्याचं प्रतीक आहे, ज्याने तिला या पदापर्यंत पोहोचवलं आहे.

टॅग्स :सोशल मीडियासोशल व्हायरलसुंदर गृहनियोजन