बंधू येतील गं न्यायला गौरी- गणपतीच्या सणाला
गाडी घुंगराची ग घुंगराची जोडीला
गौरी गणपतीच्या सणाला रिमझिम पावसाचा खेळ,
नभी इंद्रधनुष्य आणि हिरव्या शालूने नटलेली धरती....
श्रावण आला की मनात ह्या ओळी रुंजी घालायला लागतात. श्रावण महिन्याचा आनंद काय वर्णावा. सण समारंभ, उत्सव आणि सभोवतालचे उत्साही वातावरण.. आमच्या घरातही धार्मिक वातावरण, सगळे सणवार, उत्सव पारंपारिक पद्धतीने होणारे. दिव्याच्या अवसेने कार्यक्रमांची सुरुवात व्हायची. आई घासून पुसून दिवे लख्ख करी. नंतर फुलांनी सजवून त्यांची सुंदर आरास केली जायची. यादिवशी गुळाच्या पाण्यात कणिक भिजवून दिवे करायचे, चाळणीवर ठेऊन ते उकडायचे. बाजरीच्या पिठाचे दिवे करून फोडणीच्या वरणासोबत खायचे. दुधातुपात कुस्करलेला गोड दिवा आणि जोडीला वरणातला तिखट दिवा. काय अवर्णनीय चव लागायची.. मन तृप्त व्हायचं. धुपादिपाचा वास, ताजी फुलं आणि उदबत्तीचा सुगंध याने घर भरून जायचं
श्रावणातल्या रविवारची सुरुवात आदित्य-राणूबाईच्या पुजेने व्हायची. आम्हा मुलांचा उशीरा उठायचा हक्काचा दिवस. पण आई सकाळीच मागे लागायची. "मला बोलायचे नाही. माझे मौन आहे. सगळ्यांनी कहाणी ऐकायची आहे." नाईलाजाने उठून आवरावे लागे.
छातीत धडधड होतेय, अचानक बीपी वाढलं? डाॅक्टरकडे जाईपर्यंत ३ उपाय करा- त्रास कमी होईल
तोपर्यंत आईने पानांचा विडा, फुलांचा झेला आणि रक्तचंदनाचा टिळा अशी सुंदर पूजा मांडलेली असे. "करा रे हाकारा, पिटा रे डांगोरा, नगरात कुणी उपाशी आहे का? त्याचा शोध करा" अशा कहाण्या आईच्या तोंडपाठ होत्या. खरेतर ह्या कहाण्या म्हणजे देव, देश, समाज, व्यक्ती, अपंग व अनाथांच्या मदतीसाठी देवाला केलेल्या विनवण्या आहेत. जबाबदारीचे भान देणार्या आहेत. म्हणून त्या वारंवार वाचायच्या असतात.
त्यानंतर सुरू व्हायची निसर्ग पूजा. म्हणजेच नागपंचमी, मंगळागौरी, सोमवार, शुक्रवार या पुजांनी मन अगदी प्रसन्न आणि तृप्त होत असे. नागपंचमीला जायफळ, वेलची घातलेले पुरणाचे दिंड दुधा- तुपासोबत खाणं म्हणजे स्वर्ग सुख.
गुरुपुष्यामृत- चांदीच्या दिव्यांची करा खरेदी, पाहा चांदीच्या दिव्यांच्या सुंदर आणि परवडणारे डिझाइन्स
खरं तर चार्तुमास म्हणजे आहारशास्त्राची घातलेली सांगड आहे. काय खावे, काय खाऊ नये ह्याचा आदर्श पाठच आमच्या पुर्वजांनी घालून दिलाय. पुरणाचा घाट, भजी कुरडयांचा घमघमाट, भाज्या, आमटी, कोशिंबीर , चटण्या ह्यांचा थाट, मंगळागौरीचे खेळ, नागपंचमीचे झोके, नववधूचा साजशृंगार असा सगळा श्रावण सोहळ्याचा आनंद घेऊन माहेरवाशीणी आपापला संसार गाडा ओढायला पुन्हा सज्ज व्हायच्या.
सौ. सुजल संजय संभूस, ता.संगमनेर, जि.अहिल्यानगर