इटलीतील फिटनेस ट्रेनर लॉरा मेसीने स्वतःशीच लग्न केलं आहे. कारण तिला योग्य जोडीदार सापडला नाही. लॉराने अत्यंत धुमधडाक्यात पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. प्रत्येकाने आधी स्वतःवर प्रेम केलं पाहिजे असं तिचं स्पष्ट मत आहे. "राजकुमार नसेल तरही एक परीकथा असू शकते" असं देखील तिने आवर्जून म्हटलं आहे.
लॉराचं १२ वर्षांचं नातं तुटल्यानंतर, तिने ठरवलं की जर तिला तिच्या ४० व्या वाढदिवसापर्यंत एखादा चांगला जोडीदार सापडला नाही तर ती स्वतःशीच लग्न करेल. ती म्हणाली, "जर मला भविष्यात असा माणूस सापडला तर ते खूप चांगलं आहे, परंतु माझा आनंद त्याच्या उपस्थितीवर अवलंबून नाही." तिच्यावर खूप टीका झाली, पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.
स्वतःशी लग्न करण्यासाठी कुटुंब आणि मित्रांचा पाठिंबा आणि थोडासा वेडेपणा आवश्यक आहे असंही तिने म्हटलं आहे. सोशल मीडियावर लोक लॉराच्या लग्नाची थट्टा करत आहेत. तर काहीजण आश्चर्य व्यक्त करत आहेत.लोकांनी तिला सोशल मीडियावर अनेक प्रश्न विचारले आहेत. लॉराच्या या लग्नाला सोलोगॅमी म्हणतात, ज्यामध्ये एखादी व्यक्ती स्वतःशीच लग्न करते. ते पारंपारिक लग्नासारखंच आहे, परंतु कायदेशीररित्या बंधनकारक नाही.
सोलोगॅमीचा ट्रेंड आता अनेक देशांमध्ये पसरला आहे. जपानमध्ये, एजन्सी महिलांसाठी सेल्फ-वेडिंग पॅकेजेस देतात, अमेरिकेत, आय मॅरीड मी सारख्या कंपन्या सेल्फ-वेडिंग किट विकतात आणि कॅनडामध्ये, मॅरी युअरसेल्फ व्हँकुव्हर सारख्या सेवा लोकांना एकट्याने लग्न करण्याची संधी देतात. हा ट्रेंड फक्त मनोरंजनासाठी किंवा सोशल मीडियासाठी नाही, तर तो स्वत:वरचं प्रेम, स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचे प्रतीक देखील आहे.