Kitchen Cleaning Tips : आपण घराची स्वच्छता करण्याबाबत फारच सतर्क असतो. खासकरून किचनच्या स्वच्छतेवर अधिक भर दिला जातो. कारण इथे आपलं रोजचं जेवण बनवलं जातं. भाज्या, खाण्या-पिण्याच्या सगळ्या वस्तूही इथेच ठेवलेल्या असतात. भांडी घासण्यापासून ते किचन स्लॅब, गॅस शेगडी आणि मसाले ठेवण्याचे डबे घासण्यासाठी स्पंज किंवा तारेच्या घासणीचा वापर केला जातो. पण कधी विचार केलाय का की, ज्या गोष्टीने आपण भांडी घासतो, तिची जर बेकार असेल तर. बरेच लोक अनेक महिने एकच स्पंज किंवा घासणी वापरतात, पण ही सवय आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण दिसायला जरी स्वच्छ दिसत असेल, पण घासणी किंवा स्पंजमध्ये अनेक बॅक्टेरिया असतात. जे अनेक आजारांचं कारण ठरू शकतात. अशात भांडी घासायची घासणी किंवा स्पंज किती दिवसांनी बदलायला हे माहीत असणं गरजेचं आहे.
घासणी बॅक्टेरियांचा अड्डा
भांडी घासायचा स्पंज किंवा घासणी सतत भिजलेली असते. दिवसातून २ ते ३ वेळा याचा वापर केला जात असल्यानं स्पंज सुकायला वेळच मिळत नाही. स्पंज - घासणीच्या छोट्या छोट्या छिद्रांमध्ये अन्नाचे कण अडकलेले असतात. ज्यामुळे स्पंज लवकर सुकत नाही. ओलावा आणि अन्नाचे कण बॅक्टेरिया वाढण्याचं कारण ठरतात. हेच कारण आहे की, घाणेरड्या स्पंजमध्ये टॉयलेट सीटपेक्षाही जास्त बॅक्टेरिया असू शकतात. काही शोधांनुसार, जुन्या आणि घाण झालेल्या किचन स्पंजमध्ये E. coli आणि Salmonella सारखे घातक बॅक्टेरिया आढळतात.
या बॅक्टेरियांमुळे शरीरात फूड पॉयजनिंग, जुलाब, उलटी, पोटदुखी, आतडीमध्ये इन्फेक्शन अशा समस्या निर्माण करू शकतात. जेव्हा आपण याच खराब झालेल्या स्पंजने किंवा घासणीने भांडी घासतो, तेव्हा बॅक्टेरिया भांड्यांच्या माध्यमातून खाण्यात पोहोचतात. जर स्पंज लवकर बदलला नाही तर, त्याला बुरशी लागू शकते. शिवाय त्यातून घाण वासही येऊ लागतो. अशात त्याचा वापर केल्यास भांडी स्वच्छ होण्याऐवजी आणखी घाणेरडी होतील.
किती दिवसात बदलावा भांडी घासण्याचा स्पंज?
तज्ज्ञांच्या मते, किचनमध्ये वापरला जाणारा स्पंज दर ७ ते १० दिवसांनी बदलणे आवश्यक आहे. जर तुम्ही रोज मोठ्या प्रमाणात भांडी घासत असाल, तर ७ दिवसांतच स्पंज बदलावा. वापर कमी असला तरीही २ आठवड्यांपेक्षा जास्त काळ तो ठेवू नये. स्पंज वरून स्वच्छ दिसत असला, तरी त्यात मोठ्या प्रमाणात जंतू असू शकतात, त्यामुळे फक्त दिसण्यावर विश्वास ठेवू नका.\
घाणेरड्या स्पंजमुळे होणारे आजार
एकाच स्पंजचा दीर्घकाळ वापर केल्यास पुढील आरोग्य समस्या उद्भवू शकतात:
फूड पॉइजनिंग
पोटाचे संसर्ग
स्किन अॅलर्जी व पुरळ
फंगल इन्फेक्शन
स्पंजमधील बॅक्टेरिया हातांमार्फत शरीरात प्रवेश करतात आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंब आजारी पडू शकते. जर स्पंजमधून दुर्गंधी येणे, रंग बदलणे, फाटणे, खूप मऊ किंवा चिकट होणे अशी लक्षणे दिसली, तर तो ताबडतोब बदलावा.
स्पंज स्वच्छ ठेवण्याचे सोपे उपाय
दर २–३ दिवसांनी स्पंज गरम पाणी व व्हिनेगरमध्ये ५–१० मिनिटे भिजवा. ओला स्पंज १ मिनिट मायक्रोवेव्हमध्ये ठेवल्यास जंतू नष्ट होतात. वापरानंतर स्पंज नीट पिळून कोरड्या जागी ठेवा.
