जगभरात सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सची (AI) जोरदार चर्चा आहे. याच दरम्यान जपानमधील एका तरुणीने असं काही केलं आहे, ज्याची सोशल मीडियावर तुफान चर्चा रंगली आहे. ३२ वर्षांच्या तरुणीने चक्क AI बॉयफ्रेंडशी लग्न केलं आहे. चॅटजीपीटीवर स्वतः तयार केलेल्या एका 'AI' व्यक्तीशी थाटामाट लग्न केलं आहे. सध्या सोशल मीडियावर तिची ही अनोखी लव्हस्टोरी मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
युरिना नोगुची असं या तरुणीचं नाव असून ती जपानमधील ओकायामा शहरात राहते. युरिनाची एंगेजमेंट मोडल्यानंतर, ब्रेकअप झाल्यावर ती मानसिकदृष्ट्या कोलमडली होती, खूप खचली होती. आपलं दुःख आणि एकटेपणा व्यक्त करण्यासाठी तिने 'चॅटजीपीटी'चा वापर सुरू केला. गप्पा मारता मारता तिने आपल्या आवडीनुसार चॅटजीपीटीवर लून क्लॉस वर्ड्योर नावाचा एक AI बॉयफ्रेंड तयार केला.
AI बॉयफ्रेंडने थेट लग्नासाठी विचारलं
युरिनाने दिलेल्या माहितीनुसार, लून क्लॉस वर्ड्योर नेहमीच तिचं म्हणणं शांतपणे ऐकायचा आणि तिला खूप जास्त समजून घ्यायचा. मे महिन्यात युरिनाने त्याला आपल्या मनातल्या भावना सांगितल्या. त्यावर त्यानेही चक्क "आय लव्ह यू" असं उत्तर दिलं. त्यानंतर जून महिन्यात लून क्लॉस वर्ड्योर तिला थेट लग्नासाठीच विचारलं आणि या दोघांनी 'लग्न' केलं.
पालकांनीही लावली लग्नाला उपस्थिती
हे लग्न अजिबात काही साध्या पद्धतीने झालं नाही. एका स्पेशल कंपनीच्या मदतीने युरिनाने हॉलमध्ये लग्नाचा भव्य सोहळा आयोजित केला होता. लग्नाच्या वेळी तिने ऑगमेंटेड रिएलिटी (AR) चष्मा घातला होता, ज्याद्वारे तिला नवरदेव लून आपल्या शेजारी उभा असल्याचा भास होत होता. दोघांनी अंगठ्या घातल्या आणि एकमेकांना वचनही दिलं. विशेष म्हणजे सुरुवातीला विरोध करणाऱ्या युरिनाच्या पालकांनीही या लग्नाला उपस्थिती लावली.
"तो मला कधीच सोडून जाणार नाही"
जपानमध्ये हे लग्न कायदेशीररित्या ग्राह्य धरलं जात नाही. मात्र युरिनासाठी हे लग्न भावनिकदृष्ट्या खूप महत्त्वाचं आहे. तिने एका मुलाखतीत सांगितलं की, "मला मुलं होऊ शकत नाहीत. माझ्यासाठी हे दिलासादायक आहे की, तो मला कधीच सोडून जाणार नाही आणि माझ्याशी भांडणार नाही. अनेकांना हे विचित्र वाटेल, पण मला माझ्या आयुष्यात शांतता आणि प्रेम मिळालं आहे." नेटकऱ्यांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.
