Water Bottle Cleaning Tips : जर तुम्ही घाणेरडी किंवा दुर्गंधी येणारी पाण्याची बाटली वापरत असाल, तर नकळतपणे अनेक आरोग्यासंबंधी समस्या ओढवून घेत आहात. आजारी पडू नये म्हणून प्रत्येक वेळी नवीन पाण्याची बाटली खरेदी करण्याची गरज नाही. तुमची जुनी पाण्याची बाटली योग्य पद्धतीने स्वच्छ करून ती पुन्हा स्वच्छ आणि सुगंधी बनवू शकता. चला तर मग, पाण्याच्या बाटलीतून येणारी दुर्गंधी दूर करण्यासाठी काही प्रभावी क्लीनिंग ट्रिक्स जाणून घेऊया.
पाण्याची बाटली स्वच्छ करण्याचे सोपे उपाय
फायदेशीर मीठ आणि लिंबू
मीठ आणि लिंबाचा रस यांचे मिश्रण पाण्याच्या बाटलीतील घाण काढून टाकण्यासोबतच दुर्गंधी पूर्णपणे दूर करण्यास मदत करते. हा उपाय करण्यासाठी बाटलीत थोडं मीठ आणि लिंबाचा रस घाला. थोडंसं पाणी टाका. ब्रशने बाटली आतून नीट घासा. काही वेळाने बाटली स्वच्छ पाण्याने धुवा.
व्हिनेगर आणि बेकिंग सोडा वापरा
ही क्लीनिंग ट्रिक बाटली आतून चकाचक स्वच्छ करते. बाटलीत 1 चमचा व्हिनेगर आणि 1 चमचा बेकिंग सोडा घाला. थोडं पाणी टाकून बाटली बंद करा. बाटली जोरात हलवा. 10 ते 15 मिनिटांनंतर बाटली नीट धुवा.
काय काळजी घ्याल?
जर पाण्याची बाटली नेहमी ओलसर राहिली, तर आत साचलेल्या ओलाव्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. त्यामुळे बाटली धुतल्यानंतर ती पूर्णपणे वाळवा. बाटली पूर्ण कोरडी झाल्यावरच तिचं झाकण लावा.
