वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे आणि अचंबित करणारे आजार नेहमीच समोर येत असतात. सध्या एकाच कुटुंबातील चार बहिणींच्या आजाराची चर्चा सुरू आहे. ही गोष्ट अमेरिकेतील एका कुटुंबाची आहे. पॉल आणि ऍशली हिगिनबॉथम यांची, ज्यांना सहा मुलं आहेत. त्यांच्या धाकट्या मुलीला, ऑस्टिनला, जन्मापासूनच काहीतरी बरोबर नसल्याचं जाणवत होतं. ती नीट झोपत नव्हती, सतत रडत असे, हसायची नाही आणि वाढ देखील थांबलेली दिसत होती. तिचे हात थरथरत आणि तिच्या हालचाली मंद होत चालल्या होत्या. पालकांना काहीतरी गंभीर असल्याचं जाणवलं.
जेव्हा ऑस्टिन १८ महिन्यांची झाली, तेव्हा डॉक्टरांनी तिचा मेंदू आणि जेनेटिक्स टेस्ट केल्या. रिपोर्ट आल्यानंतर समजले की तिला 'चिआरी मॉलफॉर्मेशन' नावाचा एक दुर्मिळ मेंदूचा आजार आहे.
काय आहे चिआरी मॉलफॉर्मेशन?
हा आजार तेव्हा होतो, जेव्हा डोक्याचा आकार लहान किंवा चुकीचा बनतो, ज्यामुळे मेंदूचा खालचा भाग सेरेबेलम खाली सरकून मणक्याच्या भागावर दाब देतो. सेरेबेलम शरीराचं संतुलन, हालचाल आणि समन्वय नियंत्रित करतं. जेव्हा हा भाग दाबला जातो, तेव्हा चालण्यात, उभं राहण्यात किंवा सामान्य कामात त्रास होतो आणि वेदना निर्माण होतात.
काय असतात याची लक्षणं
सतत डोकेदुखी
स्नायूंमध्ये कमजोरी किंवा ताण
चालताना तोल जाणे
नसांमध्ये वेदना
मणक्याचा वाकलेला आकार
गंभीर अवस्थेत लकवा येऊ शकतो. हा आजार अत्यंत दुर्मिळ असून सुमारे प्रत्येक २००० लोकांपैकी १ जणाला होतो.
सर्जरी आणि नवा धक्का
डॉक्टरांनी सांगितलं की ऑस्टिनच्या मेंदूचा दाब मणक्याच्या मज्जारज्जूवर येत होता आणि स्पायनल फ्लूइडचा प्रवाह थांबला होता. त्यामुळे मेंदूची शस्त्रक्रिया करावी लागली. ऑपरेशन यशस्वी झाले आणि ऑस्टिन बरी होऊ लागली. पण काही दिवसांतच धक्का बसला. तीन वर्षांची दुसरी मुलगी अमेलिया हिला देखील हाच आजार असल्याचे समोर आले. तिच्या मणक्याची हाडे देखील ताणली गेली होती आणि तिलाही शस्त्रक्रिया करावी लागली. यानंतर सात वर्षांची ऑब्री आणि अकरा वर्षांची एडाली दोघींमध्येही तिच लक्षणं दिसली आणि तपासणीत त्यांनाही चिआरी मॉलफॉर्मेशन असल्याचे स्पष्ट झाले.
चारही बहिणींच्या यशस्वी सर्जरी
या चारही बहिणींच्या शस्त्रक्रिया यशस्वी झाल्या आहेत आणि आता त्या हळूहळू पूर्णपणे बऱ्या होत आहेत. त्यांची आई ऍशली म्हणाली, 'शेवटी आमच्या मुली आता आरामात श्वास घेऊ शकतात. हे आमच्यासाठी सर्वात मोठं समाधान आहे'.
