Join us
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षा - चिंता - घाईगडबड आणि बरंच काही!! घाबरुन गेल्यामुळे होतात अगदीच शुल्लक चुका, पाहा कसे सावरावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2026 18:54 IST

Fear leads to very minor mistakes, see how to recover from pressure in exams : परीक्षेत घाबरुन जाऊ नका लक्षात ठेवा या गोष्टी.

परीक्षेचा पेपर हातात आला की अनेक विद्यार्थ्यांची हृदयाची धडधड वाढते. अभ्यास चांगला केलेला असतो, तयारीही केलेली असते, पण पेपर लिहिताना झालेल्या छोट्या-छोट्या चुका गुण कमी होण्यास कारणीभूत ठरतात. (Fear leads to very minor mistakes, see how to recover from pressure in exams )त्यामुळे केवळ अभ्यास पुरेसा नसून पेपर कसा लिहायचा याचंही नियोजन महत्त्वाचं असतं. परीक्षेत पेपर लिहिताना कोणत्या चुका टाळाव्यात आणि काय काळजी घ्यावी, हे समजून घेतलं तर यशाचा मार्ग नक्कीच सोपा होतो.

सर्वप्रथम प्रश्नपत्रिका हातात घेतल्यानंतर घाईघाईने लिहायला सुरुवात करू नये. अनेक विद्यार्थी पूर्ण प्रश्न न वाचता उत्तर लिहायला सुरुवात करतात आणि मध्येच लक्षात येते की प्रश्न काही वेगळाच होता. त्यामुळे पहिले पाच-दहा मिनिटे शांतपणे संपूर्ण प्रश्नपत्रिका वाचणे अत्यंत आवश्यक आहे. कोणते प्रश्न सोपे आहेत, कोणते थोडे अवघड आहेत आणि कोणत्या प्रश्नाला किती गुण आहेत, याचा अंदाज घेतल्यास वेळेचे योग्य नियोजन करता येते.

वेळेचे व्यवस्थापन ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. सुरुवातीला एखाद्या प्रश्नावर जास्त वेळ घालवला तर शेवटचे प्रश्न घाईघाईत लिहावे लागतात किंवा अपूर्ण राहतात. प्रत्येक प्रश्नासाठी साधारण किती वेळ द्यायचा, हे मनात ठरवून लिहिल्यास पेपर पूर्ण लिहिता येतो. शेवटी किमान पाच मिनिटे उत्तरपत्रिका तपासण्यासाठी राखून ठेवणेही गरजेचे आहे.

अनेकदा विद्यार्थी खूप मोठी आणि अनावश्यक माहिती लिहितात. प्रश्न जितका विचारला आहे तितकंच आणि मुद्देसूद उत्तर देणं महत्त्वाचं आहे. विशेषतः थोडक्यात उत्तर द्यायच्या प्रश्नांमध्ये जास्त विस्तार केल्यास वेळ वाया जातो. तसेच मोठ्या प्रश्नांमध्ये परिच्छेद व्यवस्थित मांडणे, आवश्यक तेथे उपशीर्षके देणे आणि अक्षर स्वच्छ ठेवणे गुण मिळवण्यासाठी उपयुक्त ठरते.

हस्ताक्षर स्पष्ट आणि वाचनीय असणे हीदेखील महत्त्वाची बाब आहे. घाईत लिहिताना अक्षर बिघडते, शब्द गाळले जातात किंवा वाक्य अपूर्ण राहतात. परीक्षकाला उत्तर समजलं नाही तर गुण कमी मिळण्याची शक्यता असते. म्हणून शक्य तितकं शांतपणे आणि नीटनेटके लिहिण्यावर भर द्यावा.

उत्तर लिहिताना क्रमांक बरोबर लिहिणेही तितकेच आवश्यक आहे. चुकीचा प्रश्न क्रमांक लिहिल्यास गोंधळ होऊ शकतो. नवीन प्रश्न नेहमी नव्या पानावर किंवा किमान स्पष्ट अंतर ठेवून सुरू करावा. गणित किंवा विज्ञानासारख्या विषयांमध्ये सूत्र, पायऱ्या आणि अंतिम उत्तर स्पष्टपणे दाखवणे महत्त्वाचे आहे.

काही विद्यार्थी परीक्षेच्या ताणामुळे सामान्य चुका करतात, जसे की युनिट लिहायला विसरणे, नकाशाला लेबल न देणे किंवा उदाहरण अपूर्ण ठेवणे. त्यामुळे शेवटी एकदा उत्तरपत्रिका नीट तपासणे अत्यंत गरजेचे आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे आत्मविश्वास. एखादा प्रश्न अवघड वाटला तरी घाबरू नये. पुढचा सोपा प्रश्न आधी लिहावा आणि नंतर वेळ मिळाल्यास अवघड प्रश्नाकडे परत यावे. घाबरल्यामुळे विचार करण्याची क्षमता कमी होते आणि साध्या चुका होतात. जे येत आहे ते ही आठवेनासे होते. न घाबरता बिनधास्त परीक्षा द्या.  

English
हिंदी सारांश
Web Title : Exam stress: Avoid mistakes, manage time, and stay confident.

Web Summary : Exam stress causes errors. Read the paper carefully, manage time effectively, and answer precisely. Neat handwriting and correct question numbers are vital. Stay confident to avoid silly mistakes and succeed.
टॅग्स :परीक्षादहावी12वी परीक्षापालकत्वविद्यार्थी