दररोज हजारो लोक लोकलमधून प्रवास करतात. याच दरम्यान वेगवेगळी माणसं भेटतात आणि किस्से घडतात. काही गोष्टींमुळे वाईट वाटतं, कधी आनंद होतो, कधी आपल्याला धक्का बसतो तर काही गोष्टी विचार करायला भाग पाडतात. यात दरम्यान अशीच एक घटना सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे.
ट्विटरवर एका युजरने एक हृदयस्पर्शी पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये ८० वर्षांचे एक आजोबा लोकलमध्ये काही खाद्यपदार्थ विकत असलेले पाहायला मिळत आहेत. या वयातही आजोबा लोकलच्या गर्दीत पदार्थ विकण्यासाठी फिरत होते. त्यांच्या हातात काही खाद्यपदार्थांची पाकिटं देखील पाहायला मिळत आहेत. विकण्यासाठी ते धडपड करत होते.
आजोबांची विचारपूस केली असता त्यांच्या संघर्षाची गोष्ट ऐकून कोणाच्याही डोळ्यात पाणी येईल. आजोबांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांना एक मुलगी आहे. आई-वडिलांना सोडून लंडनला गेली आहे. त्यामुळे त्यांना आता कोणाचाच आधार नाही. अशा परिस्थितीत त्याचा आणि त्याच्या पत्नीचा एकमेव आधार म्हणजे हे खाद्यपदार्थ. पत्नीचं वय ७० वर्षांपेक्षा जास्त आहे, ती घरी मोठ्या प्रेमाने आणि मेहनतीने खाद्यपदार्थ बनवते. मग आजोबा ते विकण्यासाठी घराबाहेर पडतात आणि लोकलमध्ये विकतात.
पोस्ट लिहिणाऱ्या व्यक्तीने स्वत: हे पदार्थ खाऊन पाहिले. त्याची चव अप्रतिम असल्याचं सांगितलं. हे पदार्थ फक्त गोडच नाहीत तर प्रेमाने ओतप्रोत भरलेले आहेत असं म्हटलं. "जर तुम्हाला कधी हे आजोबा भेटले तर खाद्यपदार्थ खरेदी करण्यासोबतच त्यांच्या स्वाभिमानाला सलाम करा. जर लोकांना मदत करायची असेल तर त्यांनी दिलेल्या नंबरवर संपर्क साधून ऑर्डर द्यावी" असं आवाहनही करण्यात आलं आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट तुफान व्हायरल झाली.