Join us

ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2025 15:39 IST

एका हाय-फाय लग्नादरम्यान एका एनआरआय वधूने कार्यक्रमस्थळी असलेल्या फोटोग्राफरच्या टीमला जेवण देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली.

दिल्लीतील एका हाय-फाय लग्नादरम्यान एका एनआरआय वधूने कार्यक्रमस्थळी असलेल्या फोटोग्राफरच्या टीमला जेवण देण्यास नकार दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वधू आणि फोटोग्राफर टीममधील वाद सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. हे प्रकरण फक्त फोटोशूटबद्दल नाही तर जेवण आणि वेळेच्या स्लॉटबद्दल देखील आहे.

रिपोर्टनुसार, दिल्लीतील एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये लग्न करणाऱ्या वधूने फोटोग्राफरच्या टीमला जेवण देण्यास नकार दिला. तिने सांगितलं की फोटोग्राफी टीममधील लोकं हे पाहुणे नाहीत तर फक्त काम करण्यासाठी आले आहे. तसेच वधूने एका तासाचा ब्रेक देऊन टीमला जेवण्यासही परवानगी दिली नाही.

टीमला दिला १ स्टार 

अमेरिकेत काम करणाऱ्या या महिलेने गुगलवर टीमला १ स्टार रिव्ह्यू दिला. "२०२५ मध्ये, लग्न महाग झालं आहे आणि आमच्यासोबत काम करणाऱ्या वेंडर्सना हे समजून घ्यावं लागेल की ते तिथे काम करण्यासाठी आले आहेत, पाहुणे म्हणून लग्नाचा आनंद घेण्यासाठी नाही. 'वी डोन्ट से चीज' (WDSC) या फोटोग्राफी टीमने सुरुवातीला लग्नाच्या ठिकाणीच जेवण्याचा आग्रह धरला होता. मला त्यांची विनंती योग्य वाटली नाही" असं वधूने म्हटलं आहे.

 १.५ लाखांचा एक्स्ट्रा खर्च

वधूने तिच्या रिव्ह्यूमध्ये म्हटलं आहे की, फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या एका प्लेटची किंमत ६,००० रुपयांपेक्षा जास्त असते आणि जर प्रत्येक कार्यक्रमात ७-८ लोकांना जेवायला दिलं तर खर्च खूप वाढतो. फक्त खाण्यापिण्याचा खर्च सुमारे १.५ लाख होतो.

फोटोग्राफी टीमची नाराजी 

फोटोग्राफी टीम WDSC ची फोटोग्राफर आणि बिझनेस हेड रिचा ओबेरॉयने वधूच्या या वर्तनावर आणि रिव्ह्यूवर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. ती म्हणते की, लग्नाच्या दिवशी टीम १२-१५ तास सतत उभी राहते, जड कॅमेरे आणि उपकरणे उचलते आणि कोणत्याही ब्रेकशिवाय काम करते. रिचाने इन्स्टाग्रामवर म्हटलं की, "आम्ही जेवण ऑर्डर करण्याची आणि शेअर करण्याची ऑफर दिली होती, परंतु आम्हाला त्या ठिकाणी जेवण्याची परवानगी दिली गेली नाही. हा आमच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे."

"वधूने पाहुण्यांसोबत जेवू दिलं नाही"

हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना रिचा म्हणाली की, खर्च वाचवण्यासाठी फोटोग्राफरची टीम एकमेकांसोबत प्लेट्स शेअर करण्यासही तयार होती. पण वधूने त्यांना पाहुण्यांसोबत बसून जेवू दिलं नाही. वधूने टीमच्या जेवणाच्या वेळेचे स्लॉट देखील ठरवण्याचा प्रयत्न केला. "कधी जेवायचे हे तुम्ही कोणालाही सांगू शकत नाही. हा फक्त जेवणाचा विषय नाही तर आदर देण्याचा विषय आहे." फोटोग्राफर्सनी पूर्ण पेमेंट एडवान्समध्ये मागताच वधूला धक्का बसला. तिने बोलण्यास नकार दिला.  

टॅग्स :लग्नअन्नसोशल व्हायरलसोशल मीडिया