प्रत्येकालाच आपल्या वाढदिवसाला सर्वात सुंदर दिसायचं असतं. नवीन कपडे घालण्यासोबतच इतरांपेक्षा वेगळं दिसायचं असतं. पण हीच इच्छा कधी कधी जीवघेणी ठरू शकते. चीनमधील एका १६ वर्षांच्या मुलीला तिच्या वाढदिवसाला बारीक दिसायचं होतं. वजन कमी करण्यासाठी तिने दोन आठवडे फक्त उकडलेल्या भाज्या खाल्ल्या. यानंचर तिची प्रकृती बिघडली. उपचारासाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं, जिथे तिचे प्रकृती गंभीर होती.
चीनमधील मेई नावाच्या १६ वर्षांची मुलगी खूप आनंदात होती कारण तिचा वाढदिवस जवळ येत होता. वाढदिवशी नवीन ड्रेस घातल्यावर सर्वांनी तिचं कौतुक करावं अशी तिची इच्छा होती. पण मेईला वाटलं की ती थोडी जाड आहे आणि असा विचार करून ती दोन आठवड्यांआधीपासून कमी खाऊ लागली. ती दररोज फक्त थोड्या उकडलेल्या भाज्या खात असे आणि पोट साफ करणारी औषधे देखील घेत असे.
अचानक एक दिवस मेईचे हातपाय थरथर कापू लागले, तिला खूप अशक्तपणा जाणवू लागला आणि श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तिचं कुटुंब घाबरलं आणि तिला तातडीने रुग्णालयात घेऊन गेलं. डॉक्टरांनी रुग्णालयात तिचं रक्त तपासलं तेव्हा तिच्या शरीरात पोटॅशियम खूप कमी झाल्याचं आढळलं. पोटॅशियम आपलं हृदय आणि स्नायूंना योग्यरित्या कार्य करण्यास मदत करतं. जेव्हा ते खूप कमी होतं तेव्हा हृदयाचे ठोके थांबू शकतात किंवा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो.
डॉक्टरांनी ताबडतोब मेईला इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल केलं आणि तिच्यावर १२ तास सतत उपचार केले. डॉक्टरांनी सांगितलं की मेईची प्रकृती इतकी खराब झाली आहे की तिला कधीही हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. जर थोडासा उशीर झाला असता तर तिला तिचा जीवही जाऊ शकला असता. सोशल मीडियावर ही बाब व्हायरल होताच लोकांना मोठा धक्का बसला. त्यानंतर युजर्सच्या यावर वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही येऊ लागल्या. एका युजरने लिहिलं की, मेईने स्वतःलाच खूप वाईट वागणूक दिली.