Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंधश्रद्धेचा कहर! भूत उतरवण्याच्या नादात आईनेच घेतला पोटच्या मुलीचा बळी, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 15:39 IST

चीनमधील एका न्यायालयाने एका महिलेला कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

चीनमधून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. दक्षिण चीनमधील एका न्यायालयाने एका महिलेला कारावासाची शिक्षा सुनावली आहे. या महिलेवर भूत उतरवण्याचा विधी करत असताना चुकून आपल्याच मुलीची हत्या केल्याचा आरोप आहे.

'साउथ चायना मॉर्निंग पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, ग्वांगडोंग प्रांतातील शेन्झेन न्यायालयाने जुलै महिन्यात 'ली' नावाच्या महिलेला ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली, जी नंतर ४ वर्षांसाठी सस्पेंड करण्यात आली. या महिलेच्या मोठ्या मुलीलाही शिक्षा सुनावण्यात आली आहे. न्यायालयाने हा निर्णय जुलै महिन्यात 'हलगर्जीपणामुळे झालेली हत्या' या आरोपाखाली दिला.

नेमकं प्रकरण काय?

वकिलांनी सांगितलं की, ली आणि तिच्या दोन्ही मुली भूतबाधेसारख्या अंधश्रद्धाळू विचारांनी प्रभावित होत्या. राक्षसांनी त्यांच्यावर हल्ला केला असून त्यांचा आत्मा विकला गेला आहे, असा त्यांचा समज होता. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये धाकट्या मुलीने अचानक आपल्याला भूतबाधा झाल्याचं सांगितलं आणि आई व बहिणीला जादू-टोणा करण्याची विनंती केली.

विधीदरम्यान काय घडलं?

भूत उतरवण्याच्या या अघोरी विधीदरम्यान, आई आणि मोठ्या बहिणीने लहान मुलीच्या छातीवर जोरात दाब दिला आणि तिला उलट्या व्हाव्यात म्हणून तिच्या घशात पाणी ओतले. मुलीला सुरुवातीला यामुळे थोडं बरं वाटलं, म्हणून तिने कुटुंबीयांना हा विधी सुरूच ठेवण्यास सांगितलं. मात्र, दुसऱ्या दिवशी सकाळी कुटुंबातील इतर सदस्यांना तिच्या तोंडातून रक्त येत असल्याचं दिसलं आणि त्यांनी पोलिसांना बोलावलं. डॉक्टरांनी घटनास्थळीच तिला मृत घोषित केलं.

न्यायालयाने आपल्या निकालात म्हटलं की, आई आणि बहिणीचा हत्या करण्याचा कोणताही हेतू नव्हता. उलट, आपण मुलीला मदत करत आहोत असे त्यांना वाटत होते. तरीही त्यांच्या कृत्यामुळेच मुलीचा मृत्यू झाला, जो कायद्यानुसार 'हलगर्जीपणा' मानला जातो.

या घटनेनंतर चीनमधील सोशल मीडियावर तीव्र पडसाद उमटले आहेत. लोकांनी अंधश्रद्धेचा मुकाबला करण्यासाठी विज्ञानाचं शिक्षण आणि जनजागृती वाढवण्याची मागणी केली आहे. एका युजरने म्हटलं की, "अशा अंधश्रद्धा पाळणारे लोक खूप हट्टी असतात. वास्तवाचा स्वीकार करण्याऐवजी, राक्षस खूप शक्तिशाली होता असाच त्यांचा समज होतो."

English
हिंदी सारांश
Web Title : Mother kills daughter during exorcism; tragic China incident.

Web Summary : In China, a mother received a suspended sentence for killing her daughter during an exorcism ritual. Driven by superstitious beliefs of demonic possession, the mother and elder sister performed a dangerous ritual, ultimately leading to the girl's death. The court ruled it manslaughter due to negligence.
टॅग्स :चीनगुन्हेगारीमृत्यूसोशल व्हायरल