भारतीय संस्कृतीतील सण आणि परंपरा नेहमीच जगभरात कौतुकास्पद ठरल्या आहेत. मात्र काही वेळा विदेशी दृष्टीकोनातून त्या विचित्र किंवा अजब भासतात हे ही खरे. त्यातून समज- गैरसमज टिका-टिपण्ण्या होतातच. (A foreign blogger said, "I am sorry India!" after He disrespected a traditional festival in Karnataka, see what really happened )सोशल मिडियामुळे त्याचे प्रमाणही वाढले आहे. अलीकडेच अमेरिकन युट्यूबर टायलर ऑलिव्हेरा (Tyler Oliveira) याने कर्नाटकातील 'गोरेहब्बा' या पारंपरिक उत्सवावर केलेला व्हिडिओ याचं उदाहरण ठरलं आहे.
'गोरेहब्बा' हा उत्सव दरवर्षी कर्नाटकातील गुमटापुरा गावात दिवाळीनंतर साजरा होतो. या उत्सवात गावकरी गायीच्या शेणाचे गोळे तयार करुन एकमेकांवर फेकतात. स्थानिकांच्या मते, हा सण धार्मिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. शेण हे पवित्र मानले जाते आणि या खेळातून शुभशकुन व आरोग्य लाभ मिळतो, अशी श्रद्धा त्यामागे आहे. मात्र टायलर ऑलिव्हेराने या उत्सवावर 'Inside India’s Poop Throwing Festival' या नावाचा व्हिडिओ तयार करुन सोशल मीडियावर पोस्ट केला. त्यात त्याने हॅजमत सूट घातला होता, आणि तो उत्सव म्हणजे त्याच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट अनुभव असल्याचेही त्याने सांगितले. या टिप्पणीमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त झाला. अनेकांनी त्याच्यावर भारतीय संस्कृतीची थट्टा केल्याचा आरोप केला.
त्याच्या पोस्टला लाखो व्ह्यूज मिळाले, पण त्याचबरोबर प्रचंड टीकाही झाली. काहींनी म्हटलं की, अशा प्रकारच्या व्हिडिओंमुळे पाश्चात्य प्रेक्षकांच्या मनात भारताबद्दल चुकीची प्रतिमा तयार होते. स्थानिक लोकांनीही नाराजी व्यक्त केली की, हा उत्सव केवळ 'अजब घटना' म्हणून दाखवला गेला, त्यातील श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकोपा याकडे दुर्लक्ष झाले. त्यानंतर टायलरने 'I am sorry, India' असं शीर्षक देऊन एक व्यंगात्मक व्हिडिओ पोस्ट करत आणखी खिल्ली उडवली. माफी खोटी वाटल्याने लोकांचा रोष अधिक वाढला.
या घटनेतून एक मोठा प्रश्न समोर येतो की परदेशी कंटेंट निर्माते जेव्हा भारतीय परंपरांवर व्हिडिओ करतात, तेव्हा त्यांना त्या प्रथांचा अर्थ आणि संदर्भ समजून घ्यायला हवा का? की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सर्व काही मान्य आहे? स्पेनमध्ये खेळला जाणारा टोमाटिना लोकप्रिय आहे, मात्र भारताच्या एका गावात साजरा होणारा सण मात्र जगभरात हास्यास्पद ठरला. याआधीही टायलर ने भारताची अनेकदा खिल्ली उडवली आहे. सोशल मिडियावर नेटकरी अनेकदृष्ट्या विचार मांडत आहेत.
