Junk Food Side Effects: अलिकडे पिझ्झा, बर्गर, चिप्स, फ्राइज आणि नूडल्स या सगळ्या गोष्टी खाणं खूप वाढलं आहे. लहान मुलं किंवा तरूणांमध्ये या पदार्थांची क्रेझ बघायला मिळते. खासकरून लहान मुलांना या गोष्टी खाणं खूप आवडतं. पण आपल्या कल्पनाही नसेल की, तोंडाला पाणी सोडणारे हे पदार्थ आपला जीवही घेऊ शकतात. काही दिवसांआधी एक घटना समोर आली. जास्त फास्ट फूड खाल्ल्याने अहाना नावाच्या १६ वर्षीय मुलीचा जीव गेला. या घटनेबाबत डॉक्टरांचं मत आहे की,जास्त जंकफूड खाल्ल्याने तिच्या आतडीला इन्फेक्शन झालं होतं आणि त्यात छिद्र पडली होती. ती एम्समध्ये रिकव्हर करत होती, पण अचानक तिची तब्येत बिघडली आणि हार्ट फेल झाला. यातच तिचा जीव गेला.
पिझ्झा, बर्गरने घेतला मुलीचा जीव
केवळ १६ वर्षाची असलेल्या अहानाला जराही अंदाज नव्हता की, पिझ्झा, बर्गर खाऊन तिचा जीवही जाऊ शकतो. पण कोणत्याही गोष्टी अति करणं घातकच असतं. वरून हे फास्ट फूड तर विषासारखे आहेत. कारण यांनी लठ्ठपणा, डायबिटीस, बीपी, शुगर, अपचन अशा समस्या होतात. आतडीवर तर यांचा प्रभाव सगळ्यात आधी बघायला मिळतो. कारण हे पदार्थ पचवण्यासाठी शरीराला जास्त मेहनत करावी लागते. एक बर्गर पूर्णपणे डायजेस्ट व्हायला २४ तास ते ७२ तास लागू शकतात. तेच नूडल्स २४ तासात तर पिझ्झा ८ तासांनी पचतो. अशात हे पदार्थ आतडीमध्ये जास्त वेळ अडकून राहतात. ज्यामुळे पचन हळूवार होतं. जडपणा, गॅस आणि अॅसिडिटी वाढते. आतडीमध्ये चांगले बॅक्टेरिया कमी होतात आणि वाईट बॅक्टेरिया वाढतात. ज्यामुळे आतडीचं नुकसान होतं. पुढे जाऊन लठ्ठपणा वाढतो आणि हृदयरोगाचा धोकाही वाढतो. इतकंच नाही तर आतड्यांवर फॅट जमा झाल्याने फॅटी लिव्हरसोबतच कोलेस्टेरॉलचा धोकाही वाढतो.
आतड्या खराब झाल्याची लक्षणं
ICMR च्या रिसर्चनुसार, १० कोटी लोकांना आतडीचा आजार आहे. IBS चा हा धोका १५ टक्के वेगाने वाढत आहे. आतडीचा आजार झाल्याची काही लक्षणं दिसून येतात. ज्यांकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. जसे की, गॅस, बद्धकोष्ठता, सतत डोकेदुखी आणि स्किन अॅलर्जीसोबतच वजन वाढणं ही आतडीचा आजार असल्याची काही लक्षणं सांगता येतील.
पचन सुधारा
पचन तंत्र सुधारण्यासाठी सकाळी झोपेतून उठल्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यावे, रोज अॅलोव्हेरा, आवळा खा. बाहेरचं खाणं टाळा. रात्री हलकं जेवण करा. हिरव्या पालेभाज्या, फळं खा, याने पचन तंत्र सुधारतं. तसेच आतडीही आतून साफ होते.
