PM Modi letter: बंगळुरूमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेल्या ट्रॅफिकच्या समस्येची नेहमीच चर्चा होत असते. महानगरांमध्ये वाढत असलेलं ट्रॅफिक एक मोठी गंभीर समस्या आहे. ज्याबाबत लोकांकडून नेहमीच तक्रार केली जाते. पण सध्या बंगळुरूतील ट्रॅफिकबाबत एका ५ वर्षाच्या मुलीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेलं पत्र चर्चेचा विषय ठरत आहे. चिमुकलीचं हे पत्र मनाला तर भिडतंच, सोबतच शहरातील ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या प्रत्येक व्यक्तीचं दु:खं सुद्धा दर्शवतं.
रविवारी १० ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी बंगळुरूतील नम्मा मेट्रोच्या यलो लाइनचं उद्घाटन करण्यासाठी गेले होते. यावेळी या ५ वर्षीय चिमुकलीनं हातानं लिहिलेलं एक पत्र पाठवलं. ज्यात तिनं लिहिलं की, पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, खूप ट्रॅफिक आहे. आम्ही शाळा आणि ऑफिसमध्ये उशीरा पोहोचतो. रस्तेही बेकार झालेत. कृपया मदत करा.
या मुलीचे वडील अभिरूप चॅटर्जी यांनी तिचं हे पत्र सोशल मीडियावर शेअर केलं. काही तासातच याला ५.५ लाखांपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले. तर हजारो लोकांनी यावर कमेंट्स केल्या. आर्या नावाच्या या मुलीची पत्र पाहता पाहता सोशल मीडियावर व्हायरल झालं. पोस्टवर लोक आपल्या वेगवेगळ्या समस्या सांगू लागले. एका व्यक्तीनं लिहिलं की, लहान मुलांना हे समजवणं खूप अवघड असतं की, बेसिक सुविधा का नसतात.
एका दुसऱ्या यूजरनं लिहिलं की, त्यांच्या मुलीनं एकदा मुंबईतील रात्रीच्या वाढलेल्या आवाजाबाबत राष्ट्रपतींना पत्र लिहिलं होतं. ज्यानंतर पोलिसांनी ही समस्या दूर केली होती.
याआधी सुद्धा एका लहान मुलीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून तक्रार केली होती. २०२३ मध्ये १३ वर्षीय अस्मी सप्रेनं पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून प्रदूषणाबाबत चिंता व्यक्त केली होती.