लहान मुलं जितकी निरागस असतात तितकीच ती खोडकरही असतात. कधीकधी ते त्यांच्या भन्नाट आणि गोड कृतींनी मन जिंकतात, तर कधी ते असा खोडसाळपणा करतात की हसणं थांबवणं अवघड होऊन जातं. त्यांच्या काही गोष्टींमुळे आई-वडिलांची बोलतीही बंद होते. चार वर्षांच्या एका मुलानेही असंच काहीसं केलं आहे, जे समजल्यावर तुम्हालाही थोडा धक्काच बसेल. आईने आईस्क्रीम खाल्लं म्हणून मुलगा नाराज झाला अन् त्याने थेट पोलिसांनाच बोलावलं.
अमेरिकेतील विस्कॉन्सिन राज्यात ही अजब घटना घडली आहे. माउंट प्लेजन्स परिसरातील पोलिसांना एक फोन आला. हा फोन रॅसिन काउंटी नावाच्या महिला पोलीस कर्मचाऱ्याने उचलला. "हॅलो, रेसीन काउंटी बोलत आहे" असं महिला पोलिसाने फोनवर म्हटलं. यानंतर एक छोटा मुलगा आपली तक्रार नोंदवतो. "माझी आई माझ्याशी खूप वाईट वागते" असे मुलाने सांगितलं.
"काय झालं?" असं पोलीस चिमुकल्याला विचारतात. यावर तो मुलगा म्हणतो, "या आणि माझ्या आईला घेऊन जा." रिपोर्टनुसार, कॉल रेकॉर्डिंगमध्ये पुढील संभाषण देखील ऐकू येतं. यामध्ये पोलीस विचारत आहेत, "तिथे काय झालं आहे?" याच दरम्यान, मुलाची आई त्याच्याकडे येते आणि त्याच्या हातातला फोन घेते. ती म्हणते, "याला फोन मिळाला आहे आणि तो फक्त ४ वर्षांचा आहे. मी त्याचं आईस्क्रीम खाल्लं म्हणून त्याने ९११ ला कॉल केला."
दोन महिला पोलीस अधिकारी या फोननंतर मुलाच्या घरी पोहोचल्या. त्यांनी खात्री केली की, हे प्रकरण फक्त आईस्क्रीम खाण्याशी संबंधित आहे आणि यामध्ये काहीही गंभीर नाही. मुलाच्या आईने सांगितलं की, आईस्क्रीम खाल्लं म्हणून तिचा मुलगा खूप नाराज होता, परंतु पोलीस आल्यानंतर आईने यासाठी जेलमध्ये जावं असं त्याला वाटत नाही. या घटनेच्या दोन दिवसांनंतर पोलीस पुन्हा मुलाच्या घरी आले. यावेळी त्यांनी मुलाला आईस्क्रीम देऊन आश्चर्यचकित केलं.