शॉपिंग म्हणजे अगदी आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय. किती खरेदी करणार आणि कशाला हवंय, वापरत तर नाही असे असंख्य टोमणे ऐकूनही मस्त वस्तू , दागिने, कपडे आपण विकत घेतच असतो. एका दुकानात ५०० ला मिळणारी वस्तू दुसर्या दुकानातून २०० ला मिळाली की आनंद गगनात मावत नाही. (The cheapest place to shop is a train compartment!! But now you won't be able to do that because...)तसेच दुकानदाराने फिक्स रेट है कम नही होगा म्हटल्यावरही त्याला किंमत कमी करायला लावल्यावर मिळणारा आनंद काही औरच असतो. मुंबईसारख्या ठिकाणी अनेक गल्ल्या आहेत जिथे स्वस्तात मस्त कपडे, दागिने मिळतात. पण कानातले किंवा लहानसहान गोष्टी विकत घेण्याची सगळ्यात मस्त जागा कोणती असते माहिती ए? ती जागा म्हणजे कोणता मॉल किंवा मोठाले दुकान नसून ती जागा म्हणजे रेल्वेचा डबा. महिलांच्या डब्यात ३० ते ३०० पर्यंतच्या मस्त आणि सुंदर अशा गोष्टी मिळतात. बसल्या सिटवरुन छान शॉपिंग करायचा आनंद काही वेगळाच असतो.
शॉपिंगसाठी रेल्वेचा प्रवास करणे एक गोष्ट झाली पण प्रवास करता करता शॉपिंग करता येणे कसले भारी आहे. गेली कित्येक वर्षे या पद्धतीने विक्रेते रेल्वेमध्ये वस्तू विकत आहेत. अगदी एखाद्या मोठ्या मॉलमध्येही मिळणार नाहीत इतके सुंदर कानातले रेल्वेत मिळतात. त्यात चांगलीच व्हरायटीही पाहायला मिळते. पायात घालायचे अँकलेट असो किंवा गळ्यात घालायचा हार सारे यांच्याकडे असते. अंगठ्यांबद्दल तर विचारुच नका. लहान मुलांसाठी साहित्य तसेच पेन पेन्सिलही रेल्वेत मिळते. रेल्वेत केलेले शॉपिंग मैत्रिणींना दाखवताना मिळणारा आनंद काही औरच असतो. ३० आणि ४० रुपयात विकत घेतलेले सुंदर दागिने दाखवताना काहीतरी वेगळाच अभिमान वाटतो. पण आता हे शॉपिंग फक्त एक आठवण म्हणूनच राहणार आहे.
गेल्या काही दिवसांपासून तुम्हीही रेल्वेच्या डब्यात येणाऱ्या विक्रेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याच्या घटना पाहिल्याच असतील. रेल्वेत सामान विकण्याची परवानगी नाही असे रेल्वे कर्मचारी सांगतात. त्यामुळे हळूहळू हे शॉपिंग आता बंद होणार आहे हे नक्की. त्यामागील कारण किंवा इतर काही गोष्टी सामान्यांपर्यंत पोहचत नाहीत. डब्यातल्या महिलांच्या गप्पांमधून मात्र या गोष्टीबद्दल निराशा स्पष्ट दिसून येते.
